Benefits of Drinking Okra Water:  हिरव्या भाज्यांमध्ये भेंडीच्या भाजीला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. भेंडी खाणे बहुतेक सर्वांनाच आवडते. ही भाजी प्रत्येक हंगामात बाजारात सहज उपलब्ध असते. अनेकप्रकारचे पौष्टिक तत्व आणि प्रोटीन असल्याकारणाने भेंडी आरोग्यासाठी फार फायदेशीर राहते. भेंडीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील रक्ताचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. याशिवाय अन्नपचनक्रियाही सुधारते. त्यामुळेच भेंडीला सुपरफूड मानलं जातं. पण, फक्त भेंडीची भाजीच नाही तर त्याचे पाणीदेखील खूप फायदेशीर असते असे काही तज्ज्ञ सांगतात. बेंगळुरू येथील अथ्रेया हॉस्पिटलच्या मुख्य पोषणतज्ज्ञ, अक्षिता रेड्डी यांनी भेंडीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात, याविषयी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

तज्ज्ञ सांगतात, “भेंडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. भेंडी आपल्याला अनेक आजारांपासून वाचविते. भेंडीची आपण सहसा भाजी करतो, पण खूप कमी लोकांना माहिती असेल की भेंडीचं पाणीही शरीरासाठी तितकचं फायदेशीर असते. भेंडीच्या भाजी व्यतिरिक्त त्याचे पाणीदेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एक ग्लास भेंडीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने शरीराला खूप फायदे होतात.”

१. मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी भेंडीचे सेवन लाभदायी आहे. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी दररोज भेंडीच्या पाण्याचे सेवन केल्यास त्यांच्या रक्तात वाढलेली साखर कमी होण्यास मदत होईल.

२. भेंडीचे पाणी ह्रदयाला निरोगी ठेवते. यातील पॅक्टिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. भेंडीतील विघळणारे फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाल्याने ह्रदयाशी निगडीत समस्या दूर होतात.

(हे ही वाचा : तुम्हाला मधुमेह असल्यास ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात )

३. भेंडीच्या पाण्यात फायबरचे प्रमाण पुरेसे असते. फायबर पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते. भेंडीच्या पाण्यात फायबर असल्याने पोट साफ करण्यात ते फायदेशीर ठरते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यात मदत होते.

४. अस्थमा रुग्णांसाठी भेंडीचे पाणी अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. किडनीच्या समस्या दूर करण्यासही हे पाणी उपयुक्त ठरते. 

५. भेंडीचे पाणी एक महिना सतत सेवन केल्याने तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता. भेंडीमध्ये भरपूर व्हिटॅमिन बी, सी, फॉलिक ॲसिड, फायबर इत्यादी असतात. हे वजन कमी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी तुमची भूक नियंत्रित करण्यास मदत करतात. 

एक गोष्ट लक्षात ठेवा, भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे भरपूर असले तरी प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. भेंडीचे पाणी सामान्यतः वापरण्यासाठी सुरक्षित असले तरी त्यामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात.

या पाण्याच्या जास्त सेवनाने मळमळ किंवा उलट्या यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. भेंडीची ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी भेंडीचे पाणी टाळावे. हे धोके कमी करण्यासाठी भेंडीचे पाणी कमी प्रमाणात सेवन करावे, असेही अक्षिता रेड्डी नमूद करतात.