Tongue Signs For Diseases: आपली जीभ ही शरीर आपल्याला देत असलेल्या संकेतांचा मुख्य केंद्रबिंदू असते. त्यामुळेच तुम्ही कधीही डॉक्टरकडे गेलात तरी तुम्हाला आधी जीभ दाखवण्यास सांगितले जाते. जिभेच्या रंगावरून, आवरणावरून डॉक्टरांना शरीराच्या अंतर्गत काय हालचाली होत आहेत याची कल्पना येऊ शकते. मुख्यतः शरीरात कोणते व्हिटॅमिन कमी आहे, कुठल्या आजारांची सुरुवात होत आहे, कुठले ऍसिड किती प्रमाणात आहे या सगळ्याचा आढावा केवळ जीभ पाहून घेता येतो. आज आपणही घरीच आपल्या जिभेच्या रंगावरून आजारांचे संकेत कसे ओळखू शकता हे पाहणार आहोत.
हेल्थलाईनच्या माहितीनुसार, बहुतांश लोकांना जिभेचा रंग पांढरा का पडतो याविषयी शंका असतात. याचे मुख्य कारण म्हणजे व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता. हे व्हिटॅमिन आपल्या मेंदू व मज्जासंस्थेला निरोगी ठेवण्याचे काम करतात. महिलांच्या बाबत याचा प्रभाव अधिक असतो कारण याचा थेट संबंध प्रजननक्षमतेशी सुद्धा जोडला जातो. व्हिटॅमिन बी १२ हा ऍनिमियापासून शरीराचे रक्षण करतो. जेव्हा शरीरात हे आवश्यक व्हिटॅमिन कमी होऊ लागते तेव्हा जिभेवर सर्वात आधी चिन्हे दिसू लागतात.
जिभेच्या रंग व प्रकारानुसार आजार कसे ओळखायचे (Tongue & Health)
लाल व खडबडीत जीभ (Red Tongue)
मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार लाल रंगाची जाड व खडबडीत जीभ ही बी १२ च्या कमतरतेची मुख्य लक्षण आहे. यास ग्लोसाइटिस असे म्हणतात. यामध्ये कधीकधी आपल्याला जीभ सुजल्यासारखी वाटू शकते.
पांढरी जीभ (White Tongue)
पांढऱ्या जिभेला जिओग्राफिक जीभ असेही म्हंटले जाते. मुख्यतः ऍसिडिटी व डिहायड्रेशनमुळे जीभ पांढरी पडू शकते. या दोन समस्यां तुमच्या जीवनशैलीत याबद्दल करून सुद्धा सोडवल्या जाऊ शकतात. पण काही गंभीर प्रकरणांमध्ये पांढरी जीभ हे ल्युकोप्लाकियाचे लक्षण असू शकते. तोंडात पुरळ किंवा बुरशीसारखा संसर्ग पसरु शकतो. दंतचिकित्सक ल्युकोप्लाकियाचे निदान करतात. काही प्रकरणे सौम्य असतात, तर काहींना कर्करोग होऊ शकतो.
पिवळी जीभ (Yellow Tongue)
अनेकदा जिभेचा रंग पिवळा असणे हे कमी गंभीर असते. बॅकटेरियाची संख्या वाढल्याने जीभ पिवळी पडते. अन्यथा आपण धूम्रपान करत असल्यास , तंबाखूचे सेवन करत असल्यास, विशिष्ट जीवनसत्त्वे घेत असल्यास, सोरायसिस किंवा अगदी दुर्मिळ घटनेत कावीळ झाल्यास जीभ पिवळी पडू शकते.
जिभेला फोड (Bumpy Tongue)
जीभेवर येणारे फोड हे बहुतांश वेळा तंबाखूच्या सेवनाने उद्भवतात. जर आपण अगदी गरम किंवा तिखट पदार्थ खात असाल तर यामुळे जीभ चुरचुरते व भाजते यामुळेच लाल रंगाचे फोड येऊ शकतात. जर वेदना किंवा फोड दोन आठवड्यांत दूर झाले नाहीतकाही प्रकरणांमध्ये हे कर्करोगाचे लक्षण सुद्धा असू शकते.
हे ही वाचा<< पुदिन्याच्या हिरव्या चटणीचे हे फायदे माहित आहेत का? उन्हाळ्यातील ८ त्रासांपासून झटक्यात होते सुटका
तुमची जीभ तुमच्या आरोग्याबद्दल देणारे संकेत वेळीच ओळखा. पांढरा, पिवळा किंवा लाल रंग असे बदल दिसल्यास किंवा जिभेवर फोड किंवा वेदना जाणवत असल्यास डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.