Physiotherapy Role in Ageing Health Special प्रतिवर्षी आठ सप्टेंबर हा जागतिक भौतिकउपचार दिन म्हणून साजरा केला जातो, यावर्षीची या दिवसाची संकल्पना ‘हेल्दी एजिंग’ (Healthy Ageing) अशी आहे. वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ फिजिकल थेरेपीने दिलेल्या आकडेवारीनुसार २०५० पर्यंत साधारणपणे २.१ अब्ज लोक हे ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे असतील. याच आकडेवारीनुसार २०२० ते २०५० मधे वयाची ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे असणाऱ्या व्यक्तीचं प्रमाण हे साधारणपणे ४२६ दशलक्ष इतकं असेल. वृद्धत्व टाळता येणं हे साहजिकच अशक्य आहे, पण वृद्धत्वाचा स्वीकार करुन जास्तीत जास्त स्वयंपूर्ण आणि अर्थपूर्ण जगणं नक्कीच शक्य आहे! या पार्श्वभूमीवर ‘हेल्दी एजिंग’ ही संकल्पना समजून घेणं महत्वाचं ठरेल.

वय वाढलंय म्हणून…

६५ वर्षे वयाचे निवृत्त आजोबा आमच्या बाह्यरुग्ण विभागात आले होते. निवृत्तीच्या सुरुवातीला त्यांना बऱ्याचदा वाटायचं – आता मी वयस्कर झालोय, मला विश्रांती घ्यायला हवी. ते बहुतेक वेळ घरात बसून वर्तमानपत्र वाचण्यात आणि टीव्ही पाहण्यात घालवत. काही महिन्यांतच त्यांना पाय दुखणे, कंबर स्टीफ होणे, आणि चालताना दम लागणे सुरू झाले. डॉक्टरांकडे गेले असता त्यांनी सांगितलं – “वय वाढलंय म्हणून हालचाल थांबवणं योग्य नाही. हालचाल हेच खरं औषध आहे!”

व्यायाम महत्त्वाचा…

या आजोबांनी आमच्याकडे आठवड्यातून ३ दिवस त्यांच्यासाठी ठरवून दिलेले व्यायाम केले, २० दिवस आमच्याकडे सलग आल्यानंतर आम्ही त्यांना घरी करण्यासाठी व्यायाम सांगितले, यासोबतच त्यांनी रोज सकाळी ४० मिनिटं चालायला सुरुवात केली. काही महिन्यांत त्यांची कंबर मोकळी झाली, पाय मजबूत झाले, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे – त्यांचा आत्मविश्वास परत आला. आता ते घरकामात मदत करतात, नातवंडांसोबत खेळतात, आणि वाचनालयात, बाजारात नियमित जातात.

हेल्दी एजिंग म्हणजे काय?

वाढत्या वयात आपल्या क्षमतांनुसार स्वतंत्र राहणं, दैनंदिन कामं करणं, सामाजिक जीवनात सहभागी होणे, आणि मानसिकदृष्ट्‍या देखील निरोगी राहणं या गोष्टी साधारणपणे ‘हेल्दी एजिंग’ या संकल्पनेत समाविष्ट आहेत.

वाढत्या वयात शरीरात कोणते बदल होतात?

वाढत्या वयाचा सर्वाधिक परिणाम स्नायू आणि हाडांच्या आरोग्यावर होतो, त्यासोबत मेंदूच्या कार्यात देखील संथपणा येऊ शकतो.

स्नायू (Muscles):

५०–६० वर्षांनंतर स्नायूंची ताकद कमी होऊ लागते, यामुळे त्यांचा आकार देखील लहान होतो, ते पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत त्यामुळे हालचाल मंदावते.

हाडं (Bones):

हाडांची घनता कमी होते (osteoporosis), हाडं ठिसूळ होतात आणि पडल्यावर फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

संतुलन (Balance):

सुरक्षित आणि सुत्रबद्ध हालचालींसाठी हात, पाय, डोळे, मेंदू यांच्यामध्ये अचूक सुसूत्रता आवश्यक असते. ती वयानुसार कमी होत जाते, याचा परिणाम शरीराचं संतुलन सांभाळण्याच्या क्षमतेवर होतो, हालचाली कमी सुत्रबद्ध आणि संथ होतात.

स्मरणशक्ती (Memory):

वय वाढलं की स्मरणशक्ती क्षीण होते, उच्च आकलन क्षमता (High Cognitive Function) देखील कमी होते.

यावर उपाय काय?

व्यायाम, आहार आणि झोप – आरोग्याचे तीन स्तंभ

व्यायाम: नियमित चालणे, सौम्य स्ट्रेचिंग, आणि स्नायू बळकट करणाऱ्या हालचालींनी शरीर सक्रिय राहतं.

आहार: प्रथिनं, कॅल्शियम, व्हिटॅमिन D आणि ओमेगा-३ हे पोषक घटक स्नायू आणि हाडांसाठी आवश्यक.

झोप: ७–८ तासांची शांत झोप शरीराची झीज भरून काढण्यासाठी (healing) आवश्यक असते.

फिजिओथेरपी कशी मदत करते?

फिजिओथेरपिस्ट वृद्ध व्यक्तींच्या हालचालींचं मूल्यमापन करून वैयक्तिक मार्गदर्शन देतात.
पडणे टाळण्यासाठी प्रशिक्षण (Fall Prevention): संतुलन आणि गती सुधारण्यासाठी विशेष व्यायाम.

स्नायूंची कार्यक्षमता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी व्यायाम: यामुळे पोटाचे आणि पायांचे स्नायू मजबूत होऊन चालणं सोपं होतं.

दैनंदिन हालचाली सुलभ करणं: खुर्चीतून उठणं, जिना चढणं, बाथरूम वापरणं यासारख्या गोष्टींसाठी सुरक्षित तंत्र शिकवणं.

वेदना नियंत्रण: फिजिओथेरपीतील तंत्रं (hot/cold packs, stretching, manual therapy) वेदना कमी करतात.

थोडक्यात, स्नायू, हाडं, संतुलन आणि स्मरणशक्ती या सगळ्याचं आरोग्य व्यायामाने टिकून राहतं.

योग्य आहार, पुरेशी झोप, आणि फिजिओथेरपीच्या मदतीने वृद्धत्वही आनंदी आणि सक्रिय होऊ शकतं.