डॉ. अश्विन सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुर्वेदानुसार ग्रीष्म हा आदानकाळातला ऋतू आहे, जेव्हा निसर्गतः शरीराला बल देणार्‍या चंद्र व जल या तत्त्वांची शक्ती कमी झालेली असते. याउलट शरीराचे बल हिरावून घेणार्‍या सूर्याची तीव्रता-उष्णता वाढते, जी शरीरामधला स्निग्धांश-ओलावा-शीतलता खेचून घेते. परिणामी शरीर एकीकडे कोरडे पडत जाते, शरीरातला जलांश घटत जातो; तर दुसरीकडे शरीरामध्ये उष्णता वाढीस लागते. त्याच्या परिणामी मनुष्य एकीकडे घटणार्‍या जलाची पूर्ती करण्यासाठी अधिकाधिक द्रवपदार्थांचे सेवन करतो, तर दुसरीकडे वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड आहाराचे सेवन करू लागतो. द्रवपदार्थांच्या व थंड पदार्थांच्या अतिसेवनामुळे ग्रीष्म ऋतूमध्ये मंद असलेला अग्नी अधिक मंद होत जातो, परिणामी भूक मंदावते. त्यामुळे अन्नसेवनाचे प्रमाण कमी होते, सेवन केलेल्या अन्नाचे पचनसुद्धा व्यवस्थित होत नाही. साहजिकच शरीराला अशक्तपणा येऊ लागतो.

आपण जो आहार सेवन करतो, तो शरीराला बल देतो. आहार हा गोड, आंबट, खारट, कडू, तिखट व तुरट अशा सहा चवींचा असतो. या सहा रसांपैकी प्रत्यक्षात शरीराला बल देणारे रस कोणते? तर गोड, आंबट आणि खारट. ग्रीष्म हा असा ऋतू आहे, जेव्हा या शरीराला शक्ती देणार्‍या तीन रसांचा निसर्गतः क्षय होतो. याचा अर्थ असा की, पाण्यामध्ये हे तीन रस निर्बल होतात, त्यामुळे त्या पाण्यावर पोसलेल्या वनस्पतींमध्येसुद्धा गोड, आंबट व खारट हे तीन रस सबल नसतात. अंतिमतः त्या वनस्पतींचे सेवन करणार्‍या आणि त्या पाण्याचे प्राशन करणार्‍या प्राण्यांमध्येसुद्धा ते तीन रस बलनिर्मिती करू शकत नाहीत व प्राणिमात्र अशक्त होतात.

आणखी वाचा-रुग्ण आणि डॉक्टर दोघांनाही आचारसंहिता हवी का? कशासाठी?

शरीरामध्ये वाढलेल्या उष्णतेला कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये घामाचे प्रमाण वाढते. एका मर्यादेमध्ये आलेला घाम शरीराला आतून थंडावा देतो, मात्र जेव्हा घामाचे प्रमाण अत्याधिक होते, तेव्हा शरीरामधील द्रवांश व त्याचबरोबर क्षारसुद्धा कमी होतात. हेसुद्धा अशक्तपणाला कारणीभूत ठरते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special why do we get weak in summer dc mrj
First published on: 24-05-2023 at 07:30 IST