विजय काका, वय ६२, गेली १५ वर्षे टाइप २ डायबेटिसने त्रस्त आहेत. शुगर नियंत्रणात राहतेय, असा त्यांचा समज होता, पण गेल्या काही महिन्यांपासून तळपायाला अंगठ्याजवळ जखम झाली होती, जी भरून येईना. सुरूवातीला दुर्लक्ष केले, पण नंतर ती जखम खोलवर गेली आणि शेवटी डॉक्टरांनी त्यांना बोट कापण्याचा सल्ला दिला.
ही घटना काकांसाठी धक्कादायक होती, कारण त्यांचं म्हणणं होतं की जखम झाली आहे हेच मला कितीतरी दिवस कळल नाही. तर मी त्यावर उपाय कसे करणार. डायबिटीस मुळे तळपायाला संवेदना नव्हत्या आणि रोज पायांच सेल्फ ऍग्झामिनेशन करायचं असत हे माहिती नव्हत. त्यामुळे जखम एकदम वाढल्यानंतरच लक्षात आली होती. दुर्दैवाने डायबीटिस च्या रुग्णांमध्ये हे बऱ्याच वेळा घडतं . पायांची योग्य काळजी घेतली नाही तर लहान जखमसुद्धा गंभीर होऊ शकते.

डायबेटिसचा पायांवर होणारा परिणाम

डायबेटिक न्युरोपॅथी (Neuropathy) – संवेदना कमी होणे. बऱ्याच वर्षांपासून असलेल्या डायबेटिसमुळे पायांच्या नसांवर परिणाम होतो. पायांमधील संवेदना कमी होऊ लागतात. थंड-गरम असे तापमानातील बदल, वेदना, दाब, जखम याची जाणीव रुग्णाला होत नाही. त्यामुळे आपल्या तळपायाला जखम झाली आहे हेच रुग्णाला कळत नाही. कधी कधी चुकीची पादत्राणे, फाटलेली चप्पल किंवा तळपायाला विशिष्ट जागेवरच सतत भार येणे अशा गोष्टींमुळे त्वचेवर सतत ताण येतो जो नंतर जखमांमध्ये रूपांतरित होतो.

रक्तपुरवठा कमी होणे (Peripheral Arterial Disease)
डायबीटिसमुळे पायांमध्ये रक्तवाहिन्या अरुंद होतात. त्यामुळे जखमा भरून येण्याची प्रक्रिया मंदावते. पुरेसा रक्त प्रवाह नसल्यामुळे जखम भरून यायला वेळ लागतो आणि म्हणूनच इन्फेक्शनची शक्यता देखील वाढते. संसर्गाचा धोका वाढतो. रक्तातील साखरेचं च प्रमाण जास्त असल्याने जखमेमध्ये जंतुसंसर्ग होऊ शकतो आणि जखम बरी होण्याऐवजी पटकन खोल वर जाते. कधी-कधी हाडापर्यंत पोहोचते. ही स्थिती गंभीर असते. अशावेळी आवश्यक तितका पायाचा भाग काढून टाकावा लागतो. डायबेटिसच्या रुग्णांनी अतिशय सकारात्मकपणे आणि कसोशीने पायांची निगा राखणं आवश्यक आहे. वेदना ही आपल्या शरीराच्या नैसर्गिक सरंक्षणात्मक प्रणालीचा भाग असते. पण आपल्या पायातील संवेदना कमी झाल्यामुळे आपल्याला मुळात वेदना जाणवतच नाही. म्हणून आपल्या पायांच्या सुरक्षिततेसाठी आपल्याकडे पायांच्या नियमित तपासणीचा पर्याय भक्कम पर्याय उपलब्ध आहे.

पायांची निगा कशी घ्यावी?

  1. दररोज पायांची तपासणी करा
    लांब दांडी असलेल्या आरशाने पायांची रोज न चुकता तपासणी करा. हे आरसे अशा पद्धतीने बनलेले असतात की आपल्याला त्याची दांडी हातात धरून तळपायाची व्यवस्थित तपासणी करता येते. या तपासणीत पायांवर कोणतीही जखम, फोड, फाटलेली त्वचा, बोटांची दुखापत आहे का हे पाहा. अशी जखम आढळल्यास त्वरित उपचार करा. स्नानानंतर पाय व्यवस्थित कोरडे करा, विशेषतः बोटांमधील जागा नीट स्वच्छ पुसून घ्या. बोटांमधील जागेवर ओल राहू देऊन नका.
    २. मऊ आणि सैल पादत्राणे वापरा
    तळवा मऊ असलेली आणि पायाला पूर्ण कव्हर करणारी चप्पल वापरा. टोकदार बूट, उंच टाचेच्या चपला किंवा सॅंडल टाळा. सिमलेस सॉक्स वापरा- जेणेकरून त्वचेवर घर्षण होणार नाही आणि दाब येणार नाही.
  2. दररोज कोमट पाण्याने पाय धुवा
    पायावर गरम पाणी घेऊ नका. तापमानाची संवेदना बोथट झाल्याने भाजण्याचा धोका असतो.
    डॉक्टरांच्या सल्ल्याने सौम्य साबण वापरा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. खडी, दगड असलेले पृष्ठभाग आणि उन्हाने तापलेल्या जमिनीवर अनवाणी चालू नका.
  3. नखांची काळजी घ्या
    नखे सरळ कापा, नखाला टोक राहू देऊ नका.
    जर नख अति वाढलेले, आत वाढलेले असेल तर स्वतः न काढता तज्ज्ञांकडून कापून घ्या.
  4. धूम्रपान आणि मद्यपान टाळा
    या सवयी अत्यंत घातक ठरू शकतात. मद्यपानामुळे रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात वाढते आणि धुम्रपानामुळे रक्ताभिसरण आणखी कमी होते.

फिजिओथेरपी उपचार

चालणे, पायाची सौम्य हालचाल, स्ट्रेचिंग याने पायातील रक्ताभिसरण सुधारते.

फिजिओथेरपीस्टच्या सल्ल्याने संवेदना वाढवणारे व्यायाम (सेनसरी रीएजुकेशन) आणि तोल सांभाळण्याचे व्यायाम (बैलेंस एक्झरसाइजेस) केल्यास पायांचे कार्य चांगले राहते.

संवेदना वाढवणारे व्यायाम
डायबेटिक न्युरोपथीमुळे कमी झालेली संवेदना पुन्हा वाढवण्यासाठी फिजिओथेरपीमध्ये विविध टेक्सचर वापरले जातात – उदा. वाळू, गवत, थोडा गरम/थंड पृष्ठभाग यावर चालणे. यामुळे मेंदूला नवीन संवेदना ओळखण्यासाठी चालना मिळते.

रक्ताभिसरण वाढवणारे व्यायाम
फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने हे व्यायाम दिवसभरात २–३ वेळा केल्यास रक्तप्रवाह सुधारतो.

तोल सांभाळण्याचे व्यायाम (बैलेंस एक्झरसाइजेस)
हे व्यायाम पडण्याचा धोका कमी करतात आणि चालण्याचा आत्मविश्वास वाढवतात.

चालण्याच्या पद्धती सुधारणे (Gait Training)
न्युरोपथीमुळे व्यक्तीच्या चालण्याची पद्धत बदलू शकते. फिजिओथेरपिस्ट व्यक्तीच्या चालण्यातील बदल ओळखून योग्य चालण्याची पद्धत शिकवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हलक्या स्वरूपाचे कार्डिओ व्यायाम
वॉकिंग, सायकलिंग किंवा जलतरण – हे गुडघ्यांवर ताण न देता शरीर active ठेवतात आणि रक्तप्रवाह सुधारतात.
थोडक्यात डायबिटिस च्या रुग्णांना पायांमध्ये जखम झाल्यास त्वरित फिजिओथेरपिस्ट किंवा डॉक्टरांचा किंवा डायबेटिक फूट केअर तज्ज्ञ यांचा सल्ला घ्या. जखम स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करू नका. पायांची देखभाल ही दैनंदिन दिनचर्येचा भाग असू द्या. योग्य काळजीने गंभीर जखमा, हॉस्पिटलायझेशन किंवा पाय गमावण्याचे प्रसंग टाळता येऊ शकतात.