How to Check Blood Pressure at Home : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. रक्तदाब हा असा दीर्घकालीन आजार आहे, ज्यासाठी वारंवार तपासणी करणे गरजेचे आहे. ज्या लोकांना उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नियमित रक्तदाब तपासणे गरजेचे आहे. रक्तदाब कमी होणे किंवा वाढणे दोन्हीही आरोग्यासाठी धोकादायक आहे.
सध्या दिवसेंदिवस रक्तदाबाशी संबंधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. उच्च रक्तदाबाच्या समस्येकडे दीर्घ काळासाठी दुर्लक्ष केले तर ह्रदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब कंट्रोल ठेवण्यासाठी रक्तदाब दिवसातून दोनदा तपासणे खूप गरजेचे आहे. दिवसातून दोनदा रक्तदाब चेक करण्यासाठी डॉक्टरकडे जाणे अवघड वाटत असेल तर तुम्ही घरीच रक्तदाब चेक करू शकता. पण, तुम्हाला घरी रक्तदाब कसे तपासायचे माहितीये का? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

मुंबईच्या सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये सल्लागार कार्डियक सर्जन डॉ. बिपीन चंद्र भामरे सांगतात की, लोकांना रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत माहीत नाही, ज्यामुळे चुकीची रीडिंग येते, जे आरोग्यास घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, चुकीची बैठी जीवनशैली किंवा लघवी थांबवून ठेवणे यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे रीडिंग बदलू शकते. तज्ज्ञांनी सांगितल्या प्रमाणे घरात रक्तदाब कसा तपासावा?

घरच्या घरी रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत

१. सर्वात आधी रक्तदाब तपासण्यापूर्वी नेहमी मूत्राशय खाली करा. लघवी करून आल्यानंतर बीपी चेक करावा, तेव्हाच योग्य रीडिंग येईल.

२. रक्तदाब तपासण्यापूर्वी पाच मिनिटे शांत बसावे आणि आराम करावा.

३. रक्तदाब तपासण्यासाठी अशा खुर्चीचा वापर करा, ज्यामध्ये पाठीला आराम मिळेल आणि तुमचे दोन्ही पाय जमिनीवर सरळ स्थिर राहतील.

४. रक्तदाब तपासताना पायांना क्रॉस करू नका.

५. रक्तदाब तपासताना आपल्या हातापासून खांद्यापर्यंतचा भाग सरळ असावा. तुम्ही हाताला उशीचा आधार देऊन ठेवू शकता.

६. रक्तदाब तपासण्याचा स्फिग्मोमॅनोमीटर (कफ) योग्य आकाराचा असणे आवश्यक आहे आणि या कफला योग्य प्रकारे हाताला बांधले पाहिजे.

७. रक्तदाब तपासताना घाबरू नये. कोणताही ताण तणाव घेऊ नये आणि निवांत राहण्याचा प्रयत्न करावा.

८. रक्तदाब तपासण्यापूर्वी ३० मिनिटांपर्यंत बोलू नये, कॉफी पिऊ नये आणि धूम्रपान करू नये.

९. डॉ. भामरे सांगतात, एकाच वेळी दोनदा रक्तदाब तपासावे आणि मध्ये एक मिनिटाचे अंतर ठेवावे. त्यानंतर दोन्ही वेळचे सरासरी काढावे. दररोज एकाच ठराविक वेळेला रक्तदाब तपासणी केली तर अधिक चांगले.

१०. घट्ट कपडे परिधान करू नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. भामरे सांगतात, नियमित वेळेला रक्तदाब तपासल्याने व्यक्तीला आरोग्याविषयी जागरुक राहण्यास प्रेरणा मिळते. यामुळे व्यायाम, संतुलित आहार आणि तणाव नियंत्रित ठेवणे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास मदत होते.