Bad Breath: कांदा किंवा लसूण खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येणे ही सामान्य गोष्ट आहे; पण त्या समस्येवर त्वरित मात करण्यासाठी काही प्रयत्न केल्याचे आणि चाचणीचे उदाहरण आहे का? इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने सोशल मीडियावर यासंबंधीचा एक शोध घेतला.
किचन आणि होम गाइड मंजू मित्तल यांच्या मते, तुम्हाला फक्त ग्लिसरिन आणि पाणी यांचे मिश्रण असलेले द्रावण तोंडात घेऊन चूळ भरायची आहे. “कोमट पाण्यात ग्लिसरिन घाला, ते मिसळा. आता ते तोंडात घेऊन व्यवस्थित चूळ भरा”, असे मित्तल यांनी म्हटले आहे.
हा उपाय फायदेशीर आहे का?
कांदा, लसूण यांच्या अधिक सेवनाने तोंडाला तीव्र वास येतो. कारण- त्यात विशिष्ट सल्फरयुक्त संयुगे असतात. जेव्हा हे घटक स्वयंपाकासाठी चिरले जातात किंवा सोलले जातात तेव्हा अॅलियम हा एक प्रकारचा एंझाइम सोडला जातो. तो अमिनो अॅसिड सल्फोक्साइडसारख्या संयुगांना सल्फेनिक अॅसिडमध्ये रूपांतरित करतो. “हे अॅसिड तीव्र, तिखट वास निर्माण करण्यास मुख्यत: कारणीभूत आहे. हा वास काहींसाठी त्रासदायक असू शकतो”, असे मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ रिया देसाई म्हणाल्या.
ग्लिसरिनमध्ये ग्लिसरॉल असते, जो रंगहीन व गंधहीन द्रव असतो आणि त्याला गोड चव असते. “ग्लिसरिन तोंडाला ओलावा देण्यास मदत करते. कारण- त्यात एक आर्द्रता देणारा घटक आहे, जो पाणी रोखू शकतो आणि त्या बदल्यात तोंड निरोगी ठेवतो. ग्लिसरिन जीवाणूंची वाढ रोखण्यास आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासही मदत करते. ग्लिसरिनवरआधारित माउथवॉश किंवा टूथपेस्ट खूप उपयुक्त ठरू शकतात,” असे देसाई म्हणाल्या.
आर्टेमिस हॉस्पिटल गुरुग्राम येथील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. शबाना परवीन यांनी यावर भर दिला की, उपाय म्हणून ग्लिसरिनचा पाण्यात मिसळून वापर करणे इतर ज्ञात पद्धतींपेक्षा कमी पारंपरिक आहे. शुगर-फ्री गम चघळल्याने लाळ उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे तोंडातील अन्नाचे कण आणि जीवाणू काढून टाकून, तोंड स्वच्छ करण्यास मदत होते.
काय लक्षात ठेवावे?
ग्लिसरिन असलेल्या पाण्याने गुळण्या करताना काळजी घ्यायला हवी. कारण- चुकून ग्लिसरिन गिळले गेल्यास अतिसार, पोटफुगी, गॅस व पोटदुखी यांसारख्या जठररोगसंबंधित समस्या उद्भवू शकतात. “ग्लिसरिन फायदेशीर असू शकते; परंतु ते सर्वांसाठी योग्य असू शकत नाही,” असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
त्याऐवजी तीव्र वास दूर करण्यासाठी दात कमीत कमी दोन मिनिटे घासून, योग्यरीत्या साफ करावेत किंवा माउथवॉशने गुळण्या कराव्यात .
परवीन म्हणाल्या की, भरपूर पाणी प्यायल्याने तोंड ओलसर राहण्यासही मदत होते आणि अन्नाचे कण निघून जातात आणि त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.
“जर तुम्हाला कांदे किंवा लसणामुळे होणाऱ्या आम्लयुक्त वासाचा किंवा तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास होत असेल, तर ते वारंवार खाणे टाळा किंवा अजिबात खाऊ नका. तीव्र वासाचे पदार्थ खाल्ल्यानंतर तोंडाला त्यांचा तीव्र वास येणे सामान्य आहे आणि ते गांभीर्याने घेऊ नये,” असे देसाई म्हणाल्या.