Kareena Kapoor Khan Weight Loss Tips : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमीच तिच्या सुंदर लूकसह फिटनेसमुळे चर्चेत असते. अलीकडेच आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात करीनानं हजेरी लावली हती. या कार्यक्रमात बोलताना करीनानं तिच्या दुसऱ्या मुलाच्या म्हणजे जहांगीरच्या जन्मानंतर तिचं वजन २५ किलो वाढल्याचं सांगितलं. यावेळी तिनं पुन्हा पहिल्यासारखं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय केलं याविषयीही सांगितलं.
करीना सांगते की, मी स्वत:लाच एक गोष्ट सांगत राहिली की, मी अजूनही छान दिसते. जेहच्या जन्मानंतर एक क्षण असा आला, जेव्हा मला वाटले की, अरे देवा, मला आता परत वजन कमी करण्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतील; पण ते सर्व क्षणभरासाठी होतं. मी स्वत: माझं २५ किलो वजन वाढलं हे लक्षात येऊ दिलं नाही आणि सांगत राहिले की, मी अजूनही सुंदर दिसते.
त्यातून करीनानं स्वत:वर प्रेम करीत आपला आत्मविश्वास कसा टिकवून ठेवला हे स्पष्ट केलं. जब वी मेट या चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग तिनं सांगितला. ती म्हणाली की, मी अशी व्यक्ती आहे, जी प्रत्यक्षात मैं अपनी फेवरेट हूँ या नियमाचे पालन करते. आत्मविश्वास हा प्रत्येक स्त्रीसाठी जीवन जगण्याचा एकमेव मार्ग आहे.
तिनं पुढे म्हटलं की, तिनं कधीही स्ट्रिक डाएट प्लॅन फॉलो केला नाही किंवा वजन कमी करण्यासाठी कधी ती उपाशी राहिले नाही. ती सांगते, “अन्नाशी माझं अद्भुत नातं राहिलं आहे. म्हणून मला वाटतं की त्यामुळे मला खरोखर मदत झाली आहे. मी कधीही बारीक दिसण्यासाठी उपाशी राहण्याचा प्रयत्न केला नाही की, मी माझ्या स्वतःच्या त्वचेला घेऊन खूप कम्फर्टेबल होते.
गर्भधारणेनंतर बऱ्याच महिलांना वजन कमी करताना त्यांनी काय केले पाहिजे?
मानसशास्त्रज्ञ अंजली गुरसहाने यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, आपण कसे दिसतो यापेक्षा आपलं शरीर काय करू शकते यावर लक्ष केंद्रित करून सुरुवात करा. स्वतःला प्रश्न विचारा, ‘माझं शरीर आज माझ्यासाठी काय करू शकते?’ आणि फक्त आकारच नाही तर ऊर्जा, ताकद आणि गतिशीलता यासारख्या गोष्टींची जाणीव होऊ द्या. तुम्हाला शरीरात नेमके कोणते बदल करायचेत हे ठरवा.
गर्भधारणेपूर्वी तुमचे शरीर कसे होते, तसेच शरीर पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी इतर अर्थपूर्ण बदलांचा जरा विचार करा. जसे की, चांगली झोप, ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करा, कमी इच्छा आणि सुधारित भावनिक नियमन साधा.
चांगली मानसिकता राखण्यासाठी सोशल मीडिया फीड क्युरेट करा — ‘बाउन्स बॅक’ संस्कृतीला प्रोत्साहन देणारे अकाउंट्स अनफॉलो करा आणि प्रसूतीनंतरचा अनुभव प्रामाणिकपणे आणि चांगल्या प्रकारे शेअर करणाऱ्या क्रिएटर्सना फॉलो करा. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःशी खूप नम्रपणे बोला.
गुरसहाने सुचवतात की, खाताना चांगले विरुद्ध वाईट, असं लेबल लावणं सोडून द्या. कारण- अन्नाला कोणत्याही लेबलची गरज नसते. चिप्स वाईट नसतात आणि सॅलड खूप पौष्टिक असतात, असं नाही. अन्नाला शरीरासाठी इंधन, आराम व उत्सव म्हणून काम करू द्या. तुम्हाला भूक लागल्यानंतर काय खायला आवडतं ते ओळखा आणि त्यानुसार खाण्याचा प्रयत्न करा.
हे खावे, ते खाऊ नये, असे करण्याऐवजी नियमित पोषणावर लक्ष केंद्रित करा. उपाशी राहिल्याने अनेकदा थकवा येतो. म्हणून नियमितपणे खात जा. वजन वाढतंय म्हणून शरीराची आबाळ होऊ देऊ नका. तुम्हाला खाण्याची एक साधी पद्धत खूप फायदेशीर ठरू शकते. जसे की, प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा नाश्त्यात समावेश करा. दुपारच्या जेवणात कार्ब्स, भाज्या व लीन फॅट्सयुक्त पदार्थ खा. तसेच न लाजता संध्याकाळी नाश्ता करा.
सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे नियंत्रणाऐवजी आहारात संतुलन राखा, विशेषतः जर तुम्ही पालक असाल, तर तुमच्या आणि तुमच्या पाल्याच्या आरोग्याच्या दृष्टीने संतुलित आहार घेणं गरजेचं आहे.