Nutrients of Jackfruit: फणस फक्त खाण्यासाठीच चविष्ट नाही, तर आरोग्यासाठीही तो खूप फायदेशीर आहे. त्यात फायबर, जीवनसत्त्वे व अँटीऑक्सिडंट्ससह अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप चांगले असतात. त्यामुळे त्याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, काही पदार्थ फणसाबरोबर खाऊ नयेत? असे काही पदार्थ आहेत की, त्यासह फणस खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
फणसाबरोबर ‘हे’ पदार्थ खाणे टाळा
फणसासह मासे खाणे
फणस आणि मासे एकत्र खाणे खूप हानिकारक असू शकते. ते एकत्र खाल्ल्यामुळे त्वचेच्या समस्या, अॅलर्जी व पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. खरं तर मासे आणि फणस हे दोन्ही पदार्थ उष्ण आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे एकत्र सेवन केल्याने शरीरात उष्णता वाढू शकते आणि पचनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. या दोन्हींचे सेवन केल्याने अॅसिडिटी, गॅस किंवा पोटदुखीसारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात.
फणसासह दुग्धजन्य पदार्थांचे सेवन
फणसासह दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने गॅस, अपचन व अॅसिडीटीची समस्या वाढू शकते. उन्हाळ्यात हे दोन पदार्थ एकत्र खाणे खूप हानिकारक ठरू शकते. त्याव्यतिरिक्त त्वचेच्याही अनेक प्रकारच्या समस्या वाढू शकतात.
दारूचे सेवन
फणस खाल्ल्यानंतर वाइन किंवा बीअरसारखी अल्कोहोलिक पेये पिऊ नयेत. त्याचा प्रकृतीवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे पचनक्रियेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याशिवाय शरीरात विषारी पदार्थ जमा होण्याची शक्यता वाढते.