Cancer Symptoms on nails: कर्करोग हा भारतात आजार आणि मृत्यू यांच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. भारतात कर्करोगाच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एनआयसीपीआरच्या (National Institute of Cancer Prevention and Research) आकडेवारीनुसार, देशात अंदाजे २.५ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. दरवर्षी ७ लाखांहून अधिक नवीन कर्करोग रूग्णांची नोंद होते. तसंच अंदाजे ५,५६,४०० लोक कर्करोगाशी संबंधित गुंतीगुंतीमुळे मृत्यूमुखी पडतात.
कर्करोगाच्या उपचारपद्धतींमध्ये मोठी प्रगती झाली असली तरी अनेक केसेसमध्ये कर्करोग शेवटच्या टप्प्यात असल्याने उपचार करणे अवघड होते. कर्करोग रोखण्याचा आणि नियंत्रित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे जागरूकता, प्रतिबंध आणि वेळेवर लक्षणं ओळखणे.
कर्करोगाची लक्षणं त्याच्या प्रकारानुसार दिसून येतात. काहीवेळा याकडे दुर्लक्ष केले जाते, मात्र याबाबत जागरूकता असेल तर वेळीच उपचार करता येतात. साधारण लक्षणांपेक्षा काही कर्करोगाची लक्षणे शरीरातील काही अशा अवयवांमार्फत दिसून येतात, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. तुम्हाला ठाऊक आहे का तुमच्या नखांमध्ये कर्करोगाची काही लक्षणे दिसू शकतात. नखांची दुखापत, संसर्ग किंवा पौष्टिक कमतरतेशी जोडले जातात. मात्र, अलीकडील संशोधनात असे दिसून आले की, नखांमधील काही बदल हे गंभीर आजारांचे अगदी कर्करोगाचेही लक्षण असू शकते. अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेमधील शास्त्रज्ञांनी नखं आणि कर्करोग यांच्यातला संबंध शोधला आहे. यामार्फत भविष्यात कर्करोगाचे लवकर निदान करण्यास मदत करू शकतो.
नखांमधील बदल कर्करोगास कारणीभूत?
शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, काही लोकांच्या नखांमध्ये विशिष्ट बदल हा BAP1 ट्यूमर प्रिडिसपोजिशन सिंड्रोम नावाच्या अनुवांशिक विकाराचे लक्षण असू शकते. हा आजार BAP1 जनुकातील म्यूटेशन अर्थात उत्परिवर्तनामुळे होतो आणि त्यामुळे व्यक्तीची त्वचा, डोळे, किडनी आणि फुप्फुसांच्या किंवा पोटाच्या अस्तरात कर्करोगाचा ट्यूमर होण्याचा धोका वाढतो. शास्त्रज्ञांनी हा अभ्यास करण्यासाठी ज्या लोकांना समाविष्ट करून घेतले होते, त्यांना हा अनुवांशिक सिंड्रोम होता. तपासणी दरम्यान असे आढळले की, त्यांच्यापैकी बहुतेकांच्या नखांमध्ये ऑन्कोपापिलोमा नावाचा एक विशिष्ट बदल होता.
ऑन्कोपापिलोमा (Onychopapilloma) म्हणजे काय?
ऑन्कोपापिलोमा ही नखांमध्ये ट्यूमरसारखी स्थिती असते. त्यामुळे नखांवर लांब, पांढऱ्या किंवा लांब रेषा तयार होतात. नखे किंवा त्याखालील भाग जाड होतो. हे सहसा फक्त एका नखावर परिणाम करते, मात्र BAP1जनुकातील म्यूटेशन असलेल्या लोकांमध्ये हे बदल अनेकांमध्ये दिसून आले आहेत.
डॉक्टरांचा सल्ला
जर एखाद्या व्यक्तीला अनेक नखांमध्ये हे बदल होत असतील आणि त्याच्या कुटुंबात त्वचेचा कर्करोग किंवा मेलेनोमाचा इतिहास असेल, तर त्यांनी BAP1 सिंड्रोमसाठी तपासणी करून घ्यावी असा सल्ला डॉक्टर देतात.
शास्त्रज्ञांनी कसा लावला शोध?
नखांच्या चाचणीद्वारे BAP1 सिंड्रोमचे लवकर निदान शक्य आहे हे सिद्ध करून शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. आनुवांशिक चाचणीदरम्यान एका रूग्णाने नखांमध्ये सौम्य बदल नोंदवले, त्यामुळे शास्त्रज्ञांनी इतर व्यक्तींच्या नखांची तपासणी केली आणि हा शोध समोर आला.
वेळीच कर्करोगाचे निदान होते
नखांच्या बायोप्सीमध्ये हे बदल BAP1 जनुकातील म्यूटेशनशी संबंधित असल्याचे सिद्ध झाले. यामुळे डॉक्टरांना रूग्णांमध्ये कर्करोगाची सुरूवातीची लक्षणे ओळखता येतील आणि लवकर उपचार सुरू करता येतील. BAP1 जनुकातील बदल शरीरातील कर्करोगाच्या विकासावर कसा प्रभाव पाडतात आणि नवीन तपासणी किंवा उपचार पद्धती कशा विकसित करता येतील हे समजून घेण्याचं शास्त्रज्ञांचं उद्दिष्ट आहे.
या लक्षणांवर लक्ष ठेवा
या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, तुमच्या नखांमध्ये होणारे छोटेसे बदलदेखील शरीरात होणाऱ्या गंभीर बदलांचे लक्षण असू शकतात. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला तुमच्या नखांमध्ये कोणतेही असामान्य बदल म्हणजे रंग बदलणे, रेषा येणे किंवा जाड होणे त्यावेळी त्याकडे दुर्लभ करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
