Paneer Tofu or Tempeh: काही वर्षांपासून शाकाहारी आहारात पनीर हा प्रथिनांचा मुख्य स्रोत आहे. परंतु, अलीकडे हळूहळू अनेक जण वनस्पती-आधारित आणि शाकाहारी आहाराकडे वळल्याने त्यांच्याकडून पनीरऐवजी आहारात टोफू, टेम्पेहचा समावेश केला जात आहे. या वर्षी सर्वाधिक मागणी असलेल्या अन्न गटाच्या बाबतीत प्रथिनेयुक्त पदार्थ चर्चेत येत असल्याने पनीर, टोफू व टेम्पेह या तीनपैकी कोणत्या पदार्थात प्रथिने सर्वाधिक प्रमाणात असतात हे जाणून घेण्यासाठी इंडियन एक्सप्रेसडॉट कॉमने नवी मुंबईतील मुख्य आहारतज्ज्ञ कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील प्रतीक्षा कदम यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

टोफू विरुद्ध पनीर

टोफू हे सोयाबीनपासून बनवले जाते. पनीर आणि टोफू हे दोन्हीही आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जातात. परंतु, कदम यांनी सांगितले की, पनीरच्या तुलनेत टोफूमध्ये जास्त पौष्टिक फायदे आहेत. त्यात केवळ प्रथिनेच जास्त नसतात; तर शरीराच्या वाढ आणि विकासासाठी आवश्यक असलेले सर्व नऊ आवश्यक अमिनो आम्ले असतात. “१०० ग्रॅम टोफूमध्ये सुमारे ८ ग्रॅम आणि ६५-७० ग्रॅम कॅलरीज असतात. तर पनीरमध्ये २६० कॅलरीज असतात.”

टेम्पेह विरुद्ध टोफू

कदम यांनी सांगितले की, पोषक घटक आणि प्रथिनांच्या बाबतीत विशेषतः टोफू आणि पनीरच्या तुलनेत टेम्पेह सर्वांत फायदेशीर आहे. प्रथिनांच्या प्रमाणाच्या बाबतीत टेम्पेहमध्ये प्रति १०० ग्रॅम अंदाजे १९ ग्रॅम प्रथिने असतात. त्यानंतर पनीरमध्ये १८ ग्रॅम व टोफूमध्ये अंदाजे १० ग्रॅम प्रथिने असतात,”

त्यांच्या मते, टेम्पेहमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. कारण- ते संपूर्णपणे आंबलेल्या सोयाबीनपासून बनवले जाते, ज्याचे अतिरिक्त आरोग्यदायी फायदे आहेत. कारण- त्यामुळे प्रो-बायोटिक्स पचन आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. त्याशिवाय टेम्पेह हे टोफू आणि पनीरपेक्षा वेगळे असून, ते आहारातील फायबरचा स्रोत आहे आणि ते संपूर्ण प्रथिने म्हणूनदेखील चांगले आहे. म्हणजे त्यात सर्व आवश्यक अमिनो आम्ले असतात.

सर्वांत आरोग्यदायी प्रथिने कोणती?

त्यांनी पुढे सांगितले की, पनीरमध्ये प्रथिनांसह कॅल्शियमही भरपूर प्रमाणात असते; परंतु त्यात संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते. ही बाब वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा हृदयरोग असलेल्या लोकांसाठी आदर्श नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे कदम यांनी सांगितले की, टोफू हे तिन्हीपैकी सर्वांत आरोग्यदायी आहे. कारण- त्यात चरबी आणि कॅलरीज कमी असतात; परंतु टेम्पेहच्या तुलनेत त्यात कमीत कमी प्रथिने असतात. म्हणूनच असा निष्कर्ष काढता येतो की, टोफू हा सर्वांत आरोग्यदायी प्रथिनांचा पर्याय आहे; विशेषतः वनस्पती-आधारित पोषक घटकांनी समृद्ध आणि हृदयाला अनुकूल अन्न शोधणाऱ्यांसाठी.