Melatonin helps in better sleep: मेलाटोनिन हे एक नैसर्गिक हार्मोन आहे. पिनियल ग्रंथी हे हार्मोन निर्माण करतात. याला स्लीप हार्मोन असेही म्हटले जाते. कारण हा हार्मोन आपले सर्केडियन रिदम अर्थात झोपेचं-जागण्याचं चक्र नियंत्रित करते. गेल्या अनेक वर्षांत मेलाटोनिनवर जगभरात व्यापक वैज्ञानिक अभ्यास केले गेले आहेत. यात त्याचे फायदे आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. आता यासाठी पूरक आहार काय घ्यावा याबाबतही माहिती उपलब्ध आहे.
अभ्यास काय सांगतो?
अमेरिकेच्या नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या अभ्यासानुसार, ज्यांना झोप येण्यास त्रास होतो किंवा जेट लॅगचा त्रास होतो अशा लोकांमध्ये मेलाटोनिनचे कमी प्रमाण झोप सुधारण्यास मदत करू शकते. या अभ्यासातून असे दिसून आले की, मेलाटोनिन झोपेतील व्यत्यय टाळते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. ज्यांना लांबचा प्रवास करावा लागतो किंवा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करावे लागते त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. संशोधनातून असे दिसून आले की, मेलाटोनिन सप्लिमेंट्स घेतल्याने जेट लॅगची लक्षणे कमी होऊ शकतात आणि शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना चांगली झोप येते.
मेलाटोनिन अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करते
मेलाटोनिन केवळ झोपेला मदत करत नाही, तर अँटी-ऑक्सिडंट्स म्हणूनदेखील काम करते. ते शरीरातील मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करते, जे कर्करोग, ह्रदयरोग आणि वृद्धत्वाशी संबंधित आजारांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. २०२०च्या एका अभ्यासानुसार, मेलाटोनिनचा वापर अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या न्यूरोलॉजिकल रोगांशी लढण्यासाठी देखील केला जातो.
थेरपी
२०२०-२१ मध्ये कोविडच्या आजारादरम्यान मेलाटोनिनचा एक सहाय्यक थेरपी म्हणून अभ्यास करण्यात आला. काही प्राथमिक संशोधनातून असे दिसून आले की, मेलाटोनिन जळजळ कमी करू शकते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकते. त्यामुळे ते कोविडशी लढण्यास उपयुक्त ठरते.
मेलाटोनिनचे दुष्परिणाम
मेलाटोनिन हे साधारणपणे सुरक्षित मानले जाते. असं असतानाही याचे काही संभाव्य दुष्परिणाम आहेत. यामध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, दिवसा झोप येणे आणि मूड स्विंग यांचा समावेश आहे. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता किंवा इतर औषधे घेणाऱ्यांनी मेलाटोनिन सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मेलाटोनिन वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय काय
रात्रीच्या वेळी खोलीत मंद प्रकाश ठेवणे यासारख्या काही सोप्या उपायांनी शरीरात या हार्मोनची नैसर्गिक पातळी वाढू शकते. विशेष म्हणजे मोबाईल फोन आणि लॅपटॉपमधून येणारा निळा प्रकाश टाळा. सूर्यप्रकाशात वेळ घालवल्याने शरीराची सर्केडियन लय सुधारते. झोपण्यापूर्वी अति आहार किंवा कॅफिन टाळा आणि झोपण्याची वेळ निश्चित करा.
मेलाटोनिन हे एकूणच फायदेशीर
मेलाटोनिन हे केवळ एक संप्रेरक नाही, तर शरीराच्या जैविक घड्याळाचा एक भाग आहे. संशोधनातून असे दिसून आले की, या हार्मोनमुळे केवळ झोप सुधारत नाही तर एकूण आरोग्यही सुधारते.