Brain Health Tips: शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे मेंदूला योग्य काळजी आणि व्यायामाची आवश्यकता असते, म्हणून आम्ही तज्ज्ञांना मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करण्यासाठी सहा मार्ग विचारले. दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील अंतर्गत औषधांचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंघला यांनी आम्हाला सांगितले की, जीवनशैलीतील बदल, मानसिक व्यायाम आणि निरोगी सवयींच्या संयोजनाद्वारे मेंदूचे कार्य सुधारता येते.

“मेंदूच्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे, कारण तो रक्त प्रवाह सुधारतो, संज्ञानात्मक कार्य वाढवतो आणि न्यूरोप्लास्टीसिटीला प्रोत्साहन देतो. आठवड्यातून अनेक वेळा चालणे, सायकलिंग किंवा पोहणे यांसारख्या मध्यम-तीव्रतेचा व्यायाम किमान २०-३० मिनिटे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढू शकते,” असे डॉ. सिंघला म्हणाले.

मानसिकदृष्ट्या सक्रिय राहणेदेखील तितकेच आवश्यक आहे – वाचन, कोडी सोडवणे किंवा नवनवीन गोष्टी शिकणे यांसारखे क्रियाकलाप मेंदूला आव्हान देतात आणि संज्ञानात्मक राखीव क्षमता निर्माण करण्यास मदत करतात, ज्यामुळे वयाशी संबंधित संज्ञानात्मक घट होण्याचा धोका कमी होतो.

मेंदूच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हे करा

ग्लेनीगल्स हॉस्पिटल, परळ, मुंबई येथील न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पंकज अग्रवाल यांनी खालील माहिती दिली:

रात्रीची पुरेशी झोप घ्या : प्रत्येकाने दररोज ७-८ तासांची झोप घेतली पाहिजे, जेणेकरून त्याचा मेंदू विश्रांती घेईल आणि तो पुन्हा स्थिर होईल. तुमच्या झोपेच्या दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नका. डॉ. सिंघला यांच्या मते, स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज रात्री ७-९ तासांची झोप घेण्याचे लक्ष्य ठेवून आणि झोपेचे नियमित वेळापत्रक राखल्याने मेंदूचे कार्य लक्षणीयरीत्या सुधारू शकते.

शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा : नियमित व्यायाम केल्याने मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढेल आणि स्मरणशक्ती सुधारेल.

मेंदूला चालना देणारे पदार्थ खा : संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. तुमच्या जेवणात मासे, काजू, बेरी, पालेभाज्या आणि संपूर्ण धान्ये यांचा समावेश करा. जंक, प्रक्रिया केलेले, तेलकट पदार्थ टाळा. डॉ. सिंघला म्हणाले की, फळं, भाज्या, संपूर्ण धान्य अशा प्रकारचा संतुलित आहार घेतल्यास मेंदूच्या आरोग्यास आवश्यक पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात.

मन सक्रिय ठेवा : कोडी सोडवा, पुस्तके वाचा, काहीतरी नवीन शिका किंवा मेंदूचे खेळ खेळा. नवीन भाषा, नृत्य किंवा फोटोग्राफी यांसारखे नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा. “सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि व्यस्त राहिल्याने मेंदूच्या कार्याला चालना मिळते आणि संज्ञानात्मक घट होण्याचा धोका कमी होतो,” असे डॉ. सिंघला म्हणाले.

सामाजिकदृष्ट्या जोडलेले रहा : मित्र आणि कुटुंबाशी बोलल्याने तुमचे मन प्रसन्न राहते आणि ताण कमी होतो. तुमच्या मित्रांना तुमच्या भावना मोकळेपणाने सांगा.

ताण कमी करा : ताण कमी करण्यासाठी आणि मेंदूचे आरोग्य वाढवण्यासाठी दीर्घ श्वास घेऊन ध्यान करणे किंवा योगासने करा.