Dipika Kakar Diagnosed with Liver Tumour : : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया या कुकिंग रिअॅलिटी शोमधून तब्बल पाच वर्षांनंतर ती टेलिव्हिजनवर परतली होती. पण, अचानक ती या शोमधून बाहेर पडली आणि एकच खळबळ उडाली. काही दिवसांनी तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिमने तिला लिव्हरमध्ये ट्यूमर असल्याचे सांगितले.
तिच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. शोएबने ब्लॉग टायटलमध्ये लिहिलेय, “दीपिकाची तब्येत ठीक नाही, तिला पोटाचा त्रास आहे, तुमच्या प्रार्थनेची तिला आवश्यकता आहे.”
शोएब सांगतो, “जेव्हा मी चंदीगडमध्ये होतो तेव्हा दीपिकाच्या पोटात अचानक वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला आम्हाला वाटले की ते अॅसिडिटीमुळे होत आहे. पण, नंतर जेव्हा वेदना कमी झाल्या नाही, तेव्हा तिने आमच्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधला, ज्यांनी आमच्या वडिलांवरही उपचार केले होते. त्यांनी काही अँटीबायोटिक्स दिल्या आणि तिला रक्त तपासणी करण्यास सांगितले. त्यानंतर ती ५ मे पर्यंत अँटीबायोटिक्स घेत होती आणि मी परत आलो तेव्हा ती बरी होती.
त्यानंतर तो पुढे सांगतो, “बाबांच्या वाढदिवसानंतर, तिला पुन्हा एकदा वेदना जाणवू लागल्या आणि या दरम्यान तिच्या रक्त तपासणीचे रिपोर्टस आले, ज्यामध्ये तिच्या शरीरात इनफेक्शन झाल्याचे दिसले. डॉक्टरांनी आम्हाला पुन्हा भेटायला सांगितले आणि जेव्हा आम्ही त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला सीटी स्कॅन करण्यास सांगितले. त्यात असे दिसून आले की, दीपिकाच्या लिव्हरच्या डाव्या भागामध्ये ट्यूमर आहे. हा ट्यूमर टेनिस बॉलसारखा आकाराने मोठा आहे. आमच्यासाठी हे खूप धक्कादायक होते.” शोएब पुढे म्हणाला की, सध्या ट्यूमर सौम्य असल्याचे दिसून येत आहे, पण उपचार घेण्यासाठी ते आणखी काही रिपोर्ट्सची वाट पाहात आहेत.
लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर कशामुळे होऊ शकतो?
जीआय सर्जरी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन पीएसआरआय हॉस्पिटल येथील वरिष्ठ सल्लागार डॉ. भूषण भोळे द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “जेव्हा आपण लिव्हरचा ट्यूमर किंवा लिव्हरच्या आजाराविषयी बोलतो, तेव्हा ती समस्या सौम्य प्रकारची असू शकते किंवा अत्यंत धोकादायकसुद्धा असू शकते, म्हणजेच कर्करोगजन्यसुद्धा असू शकते.”
डॉ. भोळे पुढे सांगतात, “रुग्णाला ओटीपोटात वेदना, मळमळ, उलट्या, अॅसिडिटीची लक्षणे दिसतात आणि नंतर तुम्ही अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅनसारख्या काही तपासण्या करता, तेव्हा तुम्हाला लिव्हरमध्ये दुखापत असल्याचे आढळते, यालाच लिव्हर ट्यूमर म्हणतात.”
लिव्हर ट्यूमर कोणत्याही आकाराचे असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, “लहान लिंबूपासून टेनिस बॉलच्या आकारापेक्षा मोठे हे ट्यूमर असू शकते. “जेव्हा ट्यूमर सौम्य असतो, तेव्हा तो हेमॅन्गिओमा असू शकतो. जेव्हा ट्यूमरमध्ये असामान्य वाढ दिसून येते, तेव्हा हायपरप्लासिया असू शकतो किंवा तो सौम्य ट्यूमरसुद्धा असू शकतो, ज्याला एडेनोमा म्हणतात. हे सर्व प्रकार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसतात. गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांच्या लिव्हरमध्ये एडेनोमा सामान्य आहे.”
लक्षणे कोणती आहेत?
पीएसआरआय हॉस्पिटलमधील लिव्हर ट्रान्सप्लांट आणि सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे प्रमुख डॉ. मनोज गुप्ता सांगतात, “लिव्हरच्या ट्यूमरची लक्षणे चाचण्यांद्वारे समोर येतात. याचा अर्थ सुरुवातीच्या टप्प्यात लिव्हर ट्यूमरची कोणतीही लक्षणे नसतात. जेव्हा ट्यूमर वाढतो, तेव्हा शरीराच्या उजव्या वरच्या भागात वेदना जाणवू शकतात किंवा भूक अचानक न लागणे, वजन कमी होणे, थकवा येणे इत्यादी लक्षणे जाणवतात. या प्रकारात वेदना वाढतात आणि पायांवर सूज येते.” ते पुढे सांगतात की, उलट्या करताना रक्त येऊ शकते किंवा त्यामुळे ब्लॅक लॅटिन होऊ शकते किंवा व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते.
ट्यूमर सौम्य आहे की धोकादायक आहे हे कसे ठरवले जाते? प्रमुख चाचण्या आणि उपचार कोणते आहेत?
डॉ. भोळे सांगतात, “लिव्हरचे विशेष सीटी स्कॅन, एमआरआय आहेत, जे आपल्याला तो सौम्य लिव्हर ट्यूमर आहे की धोकादायक ट्यूमर आहे हे निदान करण्यास मदत करतात. या ट्यूमरचे स्वरूप काय आहे हे शोधण्यासाठी सीटी किंवा एमआरआयबरोबर रक्त चाचण्यासुद्धा त्याच वेळी केल्या जातात. जेव्हा निदानामध्ये ट्यूमर सौम्य आहे की धोकादायक आहे याबद्दल गोंधळ निर्माण होतो, तेव्हा बायोप्सीचा पर्यायसुद्धा उपलब्ध असतो, ज्यामध्ये लिव्हर ट्यूमरविषयी माहिती दिली जाते.”
उपचारांबद्दल डॉ. भोळे सांगतात, “उपचार पद्धत ही कोणत्या प्रकारचे लिव्हर ट्यूमर आहे यावर अवलंबून असते. सौम्य आहे की धोकादायक आहे हे तपासणे आवश्यक आहे. “दोन्हीवर उपचार केले जाऊ शकतात, पण त्यासाठी रुग्णांनी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे अपेक्षित आहे. गॅस्ट्रो आणि लिव्हतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि मी सांगितल्याप्रमाणे, सर्व ट्यूमरवर उपचार केले जाऊ शकतात.”