पाऊस, एक रम्य ऋतू ज्याची आपण सर्व आवर्जून प्रतीक्षा करत असतो. कारणं खूप वेगवेगळी असू शकतात. त्यातील काही सर्वसामान्य आनंदमयी आणि आल्हाददायक कारणे म्हणजे हवेत येणार मस्त गारवा, हळूहळू सर्वत्र पसरू लागणारी मखमली हिरवळ, सुरवातीला येणार मातीचा मोहक सुगंध, खिडक्यांच्या काचेवरून ओघळणाऱ्या रेशीम धारा, झाडांवर नव्याने फुटणारी पालवी… इत्यादी. पण कधीकधी अतिवृष्टीमुळे आपल्या या प्रसन्न करणाऱ्या गोष्टींवर विरजण पडते. रस्त्यांवर, घराच्या अवतीभोवती होणारा चिखल, तुडुंब भरून वाहणारी गटारे, नाले आणि नद्या अशा सर्व कारणांमुळे आपण मानवी आणि प्राणीजन्य मैला व मूत्र यांच्या संपर्कात येतो. या अवांछनीय जलप्रवाहात आणि चिखलात जर रोगट प्राण्यांची मैला आणि मूत्र वाहत असेल तर त्यात असू शकतो लेप्टोस्पायरा…..

आणखी वाचा: दुभंगलेल्या मनाचा विकार

लेप्टोस्पायराविषयी आणि त्याचा प्रसार

“लेप्टोस्पायरा” हा शब्द ऐकल्यावर तुमच्या स्मरणप्रवाहातून पटकन स्पायरोगायरा हा शब्द गेला असेल. बरोबर ओळखलत तुम्ही. शालेयजीवनातील जीवशास्त्रात आपण हे ऐकले आहे कि स्पायरोगायरा या तंतुमय शैवालातील हरितलवके सर्पिल आकाराची असतात. त्यामुळे या शैवालास स्पायरोगायरा (सर्पिल आकाराचे) हे नाव पडले. लेप्टोस्पायारा ही सर्पिल आकाराची (थोडास खेचल्या स्प्रिंग सारखी), स्पायरोकिटी प्रसृष्टी मधील वैशिष्ट्यपूर्ण जीवाणू प्रजाती आहे. या जीवाणूच्या सुमारे २० उपजातीं पैकी काही उपजाती मानवात आणि प्राण्यांमध्ये रोगकारक आहेत. अशा रोगकारक लेप्टोस्पायरा जीवाणूंची आणि आपली भेट होते ती पावसाळ्यात. व या पावसाळी रोगास “लेप्टोस्पायरॉसिस” असे म्हणतात. या जीवाणू विषयी आणि त्याच्या या मोसमी रोगाविषयी थोडे जाणून घेऊ.

आणखी वाचा: Health Special: कोकोनट शुगर, मधुमेहींसाठी वरदान

सूक्ष्मजीवदृष्ट्या, सर्व लेप्टोस्पायरा अप्रभेद्य आहेत आणि लवचिक, घट्ट गुंडाळलेले, एकपेशीय, ऑक्सिजीवी, चल, कशाभिकायुक्त, अबीजाणुधारी, ग्रामनिगेटिव्ह प्रकारचे जीवाणू आहेत. या तंतुमय पेशींचे कमीतकमी एक टोक हुकच्या आकाराचे आहे. यजमान पेशीस अँकरिंग करण्यास ते उपयुक्त ठरते. याची लांबी सुमारे ६ ते २० मायक्रोमीटर(१००० मायक्रोमीटर = १ मिलीमीटर). याचा घेर सुमारे ०.१ ते ३ मायक्रोमीटर असते. हा इतका सडपातळ जीवाणू रोगट अथवा संक्रमित प्राण्यांच्या मूत्रातून पावसातील बांध फुटलेल्या पाण्यात व चिखलात सहज प्रवेश करतो.

आपण जेव्हा अश्या दूषित पाण्याच्या व चिखलाच्या सतत संपर्कात येतो तेव्हा त्वचेतील जखमा, नाकातोंडातील श्लेष्मल पटल किंवा दूषित पाणी पिणे, मृदा दूषित अन्न खाणे, दूषित पाण्यात वाढविलेल्या कच्या भाज्या खाणे या सारख्या अनेक मार्गातून लेप्टोस्पायरा मानवी शरीरात प्रवेश करतो. एकदा त्यांनी शरीरात प्रवेश केला कि रक्ताद्वारे शरीरात सर्वत्र पसरतात. अवयवांमध्ये त्यांचे शाकीय प्रजनन होऊन अनके पटीने गुणित होतात. सामान्यतः मध्यवर्ती मज्जासंस्था, मूत्रपिंड आणि यकृत या अवयवांत ते संचयित होतात.

ते रक्त आणि बहुतेक ऊतकांच्या रोगप्रतिकारक प्रतिसादाद्वारे अवयवातून साफ केले जातात परंतु मूत्रपिंडाच्या नलिका मध्ये काही काळ टिकून राहतात आणि अनेक पटीने वाढतात. संसर्गजन्य जीवाणू मूत्रात सोडले जातात. लेप्टोस्पायरॉसिस हा जगभरातील एक प्राण्यांमध्ये आढळणारा रोग आहे जो अनेक वन्य आणि पाळीव प्राण्यांना संक्रमित करतो. संक्रमित प्राण्यांच्या मूत्रद्वारे माणसांना संसर्ग होतो. मनुष्य-ते-मनुष्य असे संक्रमण अत्यंत दुर्मिळ आहे. चिखल, सांडपाणी व प्राणी यांच्या संपर्कात असणारा शेतकरी वर्ग, सार्वजनिक साफसफाई करणारे कामगार याना विशेषतः पावसाळ्यात या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

लेप्टोस्पायरॉसिसची लक्षणे

वेळीच उपचार न केल्यास, लेप्टोस्पायरॉसिसमुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते, मेंदूज्वर (मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती पडद्याची जळजळ), यकृत निकामी होणे, श्वसनाचा त्रास आणि मृत्यू देखील होऊ शकतो. संक्रमणानंतर २ दिवस ते ४ आठवड्यापर्यंत रोगाची लक्षणे दिसू लागतात. सी.डी.सी (सेन्टर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन) नुसार मानवांमध्ये, लेप्टोस्पायरॉसिसमुळे अनेक लक्षणे दिसू शकतात.

त्यातील प्रमुख लक्षणे पुढील प्रमाणे आहेत: उच्च ताप, डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायू दुखणे, उलट्या होणे, कावीळ (पिवळी त्वचा आणि डोळे), लाल डोळे, पोटदुखी, अतिसार, पुरळ येणे इत्यादी. याव्यतिरिक्त, काही लेप्टोस्पायरा संक्रमित व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे नसतात. वरील लक्षणांच्या पहिल्या टप्प्यानंतर रोग बरा झाला नाही तर रोगी दुसरा टप्प्यात प्रवेश करतो जो अधिक गंभीर आहे; व्यक्तीला मूत्रपिंड किंवा यकृत निकामी किंवा मेंदुज्वर होऊ शकतो. कोणताही औषधोपचार न केल्यास आणि केवळ सक्षम शारीरिक प्रतिकार क्षमतेच्या जोरावर हा रोग पूर्ण बरा होण्यास अनेक महिने लागू शकतात.

उपचार आणि प्रतिबंधक उपाय

लेप्टोस्पायरॉसिस रोखण्यासाठी अतिशय परिणामकारक प्रतिजैविके उपलब्ध आहेत कारण लेप्टोस्पायरा हा जीवाणू बऱ्याच प्रतिजैविकांनी संदमनित केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ डॉक्सीसाइक्लिन, एम्पीसिलिन किंवा अमोक्सिसिलिन. गंभीर लेप्टोस्पायरॉसिससाठी, शिरांतर्गत पेनिसिलिन-जी हे फार पूर्वीपासून डॉक्टरांच्या पसंतीचे औषध आहे. तसेच तिसर्‍या पिढीतील सेफॅलोस्पोरिन, सेफोटॅक्साईम आणि सेफ्ट्रियाक्सोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. अगदी अतिदक्षता विभागाचे (आय. सी. यू) समर्थन जरी असले तरीही गंभीर (दुसऱ्या टप्प्यातील) लेप्टोस्पायरॉसिसमध्ये ५०% पेक्षा जास्त रुग्ण मृत्युमान असू शकतो. अशा वेळी, साहायक उपचार आणि मूत्रपिंड, यकृत, रक्तविज्ञान आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या गुंतागुंतांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन महत्वाचे आहे.

लेप्टोस्पायरॉसिसचे प्रतिबंधक उपाय बरेच आहेत. त्यातील महत्वाचे म्हणजे प्राण्यांच्या मूत्राने दूषित होऊ शकणार्‍या पाण्यात न पोहणे किंवा न फिरणे किंवा संभाव्य संक्रमित प्राण्यांशी संपर्क ना ठेवणे. शेतकरी, सफाई कामगार, कोळी अशा सर्व व्यक्ती ज्यांचा सतत प्राणी, माती आणि चिखल याच्याशी संपर्क असतो त्यांनी योग्य पादत्राणे आणि हातमोजे वापरावेत. विशेषतः पावसाळ्यात चिखलातून वा सांडपाण्यातून चालावे लागल्यास घरी पोहचल्यानंतर पाय व हात साबणाच्या साहाय्याने स्वच्छ करणे गरजेचे आहे. विशेषतः पायास जखमा झालेल्या असल्यास पावसाळ्यात गम बूट वापराने जास्त हितावह असेल. वर नमूद केलेली पहिल्या टप्प्यातील काही लक्षणे दिसल्यास रक्त अथवा लघवीचे पी.सी.आर परीक्षण करून या रोगाचे निदान करता येते. व योग्य उपाय तातडीने सुरु करता येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर पावसाळा अधिक आनंददायी आणि चिंताविरहित करायचा असल्यास वरील प्रतिबंधक उपाय योजून लेप्टोस्पायरा जीवाणूंना दूर ठेऊ शकतो आणि लेप्टोस्पारॉसीस टाळू शकतो.