डॉ. नितीन पाटणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्या बालपणी रक्त तपासणाऱ्या लॅब्ज खूपच कमी होत्या, गावाकडे तर नव्हत्याच. त्यामुळे अनेक जण रक्ततपासणीसाठी मुंबईत यायचे, कुणा नातेवाईकांकडे वस्तीला राहायचे. सकाळी रक्त तपासणीला देऊन मग गावाला जायचे. रिपोर्ट आले की ते पोस्टाने गाव पाठवले जायचे. ते रिपोर्ट पाहून गावातील डॉक्टर इलाज करायचे. तेव्हा रोगसुद्धा बहुतेक संथ असावेत, कारण रक्ताच्या आठवड्यापूर्वीच्या रिपोर्टवर डॉक्टर औषध द्यायचे. असे असूनदेखील रोगही बरा व्हायचा किंवा मधुमेद नियंत्रणात तरी राहायचा. अशाच एका पाहुण्याच्या साखरेचा रिपोर्ट आणायला लॅबमध्ये पिटाळण्यात आले होते. हे पाहुणे आमच्या घरी बसल्या बसल्या झोपत होते. ते पाहून मला खूप मजा येत होती. रात्री भयंकर घोरायचे आणि दिवसा झोपायचे तेही बोलता बोलता. मी त्यांचा रिपोर्ट आणायला लॅबमध्ये गेलो. मी रिपोर्ट घेतला आणि बालसुलभ आगाऊपणे डॉक्टरांना विचारले, ‘कसे आहेत रिपोर्ट?’

‘तू औषध देणार आहेस?’ डॉक्टर.

‘नाही, आई विचारेल, डॉक्टरना विचारायचेस तरी, म्हणून विचारतोय,’ मी.

मग डॉक्टरांनी रिपोर्ट बघितले, बहुतेक साखर खूप जास्त असावी. ते एकदम ताठ झाले आणि म्हणाले, ‘अरे पेशंट आहे की साखरेची गोण? इतके दिवस काय झोपा काढतोय काय हा?’

या प्रश्नाला मी मोठ्याने ‘हो सारखा झोपत असतो’ असे सांगितले. आता यात काय चुकले कुणास ठाऊक, डॉक्टरांनी हातात रिपोर्ट कोंबले आणि लॅबच्या बाहेर काढले. तेव्हापासून झोप आणि मधुमेद यांचा काही तरी संबंध असतो हे लक्षात होते.

आणखी वाचा-उन्हाळ्यात स्त्रियांना अधिक गरम का होते?

जायफळ घालून श्रीखंड खाल्ल्यावर जसे अंगावर येते, गुंगी येते तसे; मधुमेद असेल तर जरा कुठे जास्त खाणे झाले की अंगावर येते, झोप येते. झोपेत मात्र बरेचदा विचित्र स्वप्ने पडतात, रात्री घाईची लघवीला जाण्याची भावना होऊन, झोपमोड होत राहते. रात्रीच्या जागरणांची सवय लागली तर, उत्तररात्री आणि दुसऱ्या दिवशी गोड आणि तळलेल्या पदार्थांवरील वासना वाढते, त्यातून स्थूलता आणि मधुमेद होण्याची शक्यतादेखील वाढते. अमेरिकेमधील २३ शहरांमध्ये मिळून एक सर्व्हे केला, ज्यात तीन हजारांपेक्षा जास्त लोकांचा अंतर्भाव होता. या चाचणीचा अहवाल, ‘असोसिएटेड प्रोफेशनल स्लीप सोसायटी’ या संस्थेने प्रसिद्ध केला, ज्यात नमूद करण्यात आले आहे की जंक फूड खायला मिळाले नाही तर जे अस्वस्थ होतात, (क्रेव्हिंग असते जंक फूडचे ) त्यांच्यामध्ये झोप न घेतल्यास मधुमेद होण्याचे प्रमाण खूप जास्त असते.

आणखी वाचा-ऋतुमानानुसार डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

‘बीएम्.सी. पब्लिक हेल्थ’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका कोरियन चाचणीत, एक लाखांहून जास्त लोकांची निरीक्षणे नोंदवली गेली, त्यांच्यामध्ये एक मजेशीर बाब पुढे आली आहे. सहा तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या लोकांमध्ये मधुमेदाचे प्रमाण वाढतेच, पण दहा तासांपेक्षा जास्त झोपणाऱ्यांमध्येही मधुमेदाचं प्रमाण तितकेच वाढलेले दिसते. भारतात ज्या लोकांना मधुमेद असतो, त्यात बहुतेकांना ‘टाइप टू’ या स्वरूपाचा मधुमेद असतो. ज्यामधे ‘इन्सुलिन रेसिस्टन्स’ म्हणजे इन्सुलिन जास्त पाझरूनदेखील त्याचा प्रभाव कमी असतो. हे घडण्यामागे अनेक कारणे असतात, त्यातील एक कारण, ‘रात्री झोपताना, दिवा सुरूच ठेवून झोपणे’ हे असते.

मधुमेद आणि घोरणे यांचा संबंध तर वेगळाच. या घोरण्यात पण दोन मुख्य घराणी आहेत. आवाजी आणि अवाजवी. आवाजी घोरणाऱ्यांना स्वत:ला त्रास नसतो, पण सोबत असणाऱ्यांना सराव होईपर्यंत त्रास असतो. अवाजवी घोरणाऱ्यांना मात्र झोपेत प्राणवायू कमी पडतो. त्याला ओएस्ए (ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅपनिया) म्हणतात. यांच्यामध्ये रक्तदाब, स्थूलता आणि मधुमेद होण्याची शक्यता खूप जास्त असते. या लोकांना नुसती साखर नॉर्मल असून चालत नाही तर वजनावर नियंत्रण राखणे हे अत्यंत गरजेचे असते. यातही कहानी में ट्विस्ट आहेच. ज्या लोकांना इन्सुलिन घ्यावेच लागते, त्यांच्यामध्ये घोररोग चालू होऊ शकतो. म्हणून मधुमेद होऊ नये किंवा झाला असल्यास वाढू नये म्हणून आहार, व्यायाम, औषधे यांच्या बरोबरीने सात ते आठ तास बिनघोर झोप, तीसुद्धा ‘मालवून टाक दीप’ हे गाणे ऐकत आणि ऐकवत घ्यायला हवी. आता हे गाणे ऐकून झोप उडणार असेल तर मात्र इलाज नाही!

(टीप: डॉ, नितीन पाटणकर यांनी सांगितल्यानुसार शरीरात मेद वाढल्याने मधुमेहाचा त्रास उद्भवण्याचा धोका असतो त्यामुळे मधुमेह हा शब्द मधुमेद असा लिहिलेला आहे.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly is the relationship between diabetes and sleep dc mrj
First published on: 24-05-2023 at 08:30 IST