खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हल्ली लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसतेय. त्यासोबतच अनेक आजारही वाढत आहेत यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक जण डिटॉक्स डाएटचा पर्याय निवडत आहेत. त्यात अनेक जण फक्त फळे खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण, ७२ तास फक्त फळे खाऊन शरीरावर काय परिणाम होतात तुम्हाला माहित आहे का? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना गुरुग्राममधील नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. पंकज वर्मा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
तीन दिवस आहारात फक्त फळांचा समावेश करणे याला ‘फ्रुटेरियन डाएट’ म्हटले जाते. अशा प्रकारचा आहार जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सयुक्त वाटू शकतो. पण खरेच या आहारामुळे आपल्याला विविध फायदे मिळतात? याच मुद्द्यावर मेडिटेशनबायनेचर इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे; ज्यात तीन दिवस फळांवर राहिल्याने काय होऊ शकते याबद्दलची माहिती दिली आहे.




१) पोस्टनुसार फळांचा आहार सेवन केल्यास १२ तासांनंतर तुम्हाला पचनासंबंधित त्रास दूर झाल्याचा अनुभव येईल.
२) तुमचे शरीर फळांमध्ये असलेले पोषक घटकांचे पचन करून आणि शोषून घेण्यास सुरुवात करील; ज्यामुळे पोटासंबंधित आजारापासून आराम मिळेल. जसे की, पोटदुखी आणि पोट फुगणे.
३) २४ तासांनंतर शरीरातील नको असलेले फॅट्स बर्न होण्यास सुरुवात होईल.
४) तुमचे शरीर पौष्टिक केटोसिसच्या अवस्थेत प्रवेश करील म्हणजे ते संचयित चरबीचा ऊर्जास्रोत म्हणून वापर करण्यास सुरुवात करील. पण, अशा प्रकारच्या डाएटचा तुम्हाला खरेच फायदा होतो का? याविषयी खाली डॉक्टरांनी आपली मते दिली आहेत.
७२ तास फळांवर राहणे खरेच फायदेशीर ठरते का?
डॉ. पंकज वर्मा यांच्या माहितीनुसार, ७२ तास फक्त फळांचे सेवन केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतात. सकारात्मक बाजूने विचार केल्यास फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स व फायबर्स असतात, जे सुधारित पचन, ऊर्जा पातळी वाढवण्यास व तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. फळांमधील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेशन ठेवण्यास मदत होते.
पण फळांचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. कारण- केवळ फळांवर अवलंबून राहिल्याने विविध आरोग्यविषयक समस्या उदभवण्याचा धोका वाढू शकतो, असे योगसूत्र होलिस्टिक लिव्हिंगच्या संस्थापक शिवानी बाजवा यांनी सांगितले.
आहारात केवळ फळांचा समावेश केल्यास शरीरास आवश्यक प्रथिने, चरबी, विशिष्ट जीवनसत्त्वे व खनिजे यांसारख्या आवश्यक पोषक घटकांची कमतरता जाणवू शकते. डॉ. वर्मा यांच्या माहितीनुसार, स्नायूंच्या मजबूतीसाठी प्रोटीन्सची खूप गरज असते, तर हार्मोन्स आणि विविध शारीरिक कार्यांसाठी फॅट्सची आवश्यकता असते. पण, शरीरास ठरावीक कालावधीत योग्य पोषक घटक न मिळल्यास स्नायूंचे नुकसान होऊ शकते. तसेच तुम्हाला थकवा जाणवू शकतो.
फळांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे उर्जा वाढूही शकते किंवा कमीही होऊ शकते; ज्यामुळे चिडचिडेपणा वाढतो आणि एकाग्रता कमी होऊ शकते, असेही डॉ. वर्मा म्हणाले.
आहारात केवळ फळांचा समावेश केल्यास उदभवणारे संभाव्य धोके
वजन वाढणे
काहींना सुरुवातीला वजन कमी होत असल्याचे जाणवू शकते; पण फळांमधील नैसर्गिक साखर वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. विशेषत: फळांचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास हा धोका अधिक वाढतो.
मधुमेहाची चिंता
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आहारात फळांचा समावेश केल्यास सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण- त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त आहे; ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. स्वादुपिंड आणि किडनीचे विकार असलेल्यांनाही यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.
दात किडणे
फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने आणि आंबटपणामुळे दात किडण्याचा धोका वाढतो. संत्र्यासारखी काही फळे दातांचे आरोग्य खराब करू शकतात.
पोषक घटकांची कमतरता
फ्रुटेरियन आहारामुळे जीवनसत्त्व बी-१२, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, आयोडीन व ओमेगा-3 फॅटी अॅसिड यांसारख्या महत्त्वाच्या पोषक घटकांची कमतरता होऊ शकते. या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, रोगप्रतिकारक शक्ती बिघडणे व कमी कॅल्शियमच्या बाबतीत ऑस्टिओपोरोसिस होऊ शकते .
अशक्तपणा
शरीरात आवश्यक जीवनसत्त्वे, चरबी व प्रथिने नसल्यामुळे प्रामुख्याने फळांवर अवलंबून राहिल्याने अशक्तपणा येऊ शकतो. महत्त्वपूर्ण कार्यांसाठी ऊर्जा वाचवण्याच्या प्रयत्नात यामुळे चयापचय क्रिया मंद होऊ शकते.
फळांचे सेवन केल्याने तात्पुरते समाधान मिळू शकते; परंतु सतत प्रथिने आणि चरबीच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते. त्यामुळे लवकरच भूक लागू शकते किंवा खाण्याची लालसा वाढू शकते. फळांचा आहार घेताना त्यातील संभाव्य तोटे टाळण्यासाठी फळांची निवड आणि त्यात विविधता असणे आवश्यक आहे.
फळांमध्ये अत्यावश्यक पोषक घटकांचा समावेश असला तरी संपूर्ण आरोग्यासाठी संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार महत्त्वाचा असतो. डॉ. बाजवा यांच्या म्हणण्यानुसार, दीर्घकाळपर्यंत फ्रुटेरियन आहार तुमच्या शरीरास आवश्यक पोषक घटक देऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा आहार सुरू करताना आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण- सकस आणि पौष्टिक आहाराचा एक भाग म्हणून फळांचा समावेश करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
अल्प काळासाठी फळांच्या आहाराचे फायदे मिळू शकतात. परंतु, संतुलित व वैविध्यपूर्ण आहार आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानला जातो आणि त्यातूनच आपल्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक पुरवता येतात, असेही डॉ. वर्मा म्हणाले.