जसजसा उन्हाळा जवळ येतो तसतसे उन्हाळ्यातील सर्वाची आवडती कैरी बाजारात दिसू लागते. आंबट गोड कैरीला तिखट-मीठ लावून खाण्याची मज्जा वेगळीच असते. उन्हाळा सुरू होताच अनेक घरांमध्ये सर्रासपणे कैरीचे सेवन केले जाते. कधी कच्ची कैरी खातात, कधी कैरीचे पन्हे केले जाते, कधी कैरीचे लोणचे केले जाते. आपण रोज कैरी खाल्ल्यास आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का? याच प्रश्नाचे उत्तर आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊ या.

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे कन्सलटंट जनरल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट असलेले डॉ. रंगा संतोष कुमार यांनी सांगितले की, “अँटिऑक्सिडंट म्हणून कैरी मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोप्रोटेक्टिव्ह (Gastroprotective) आहे.”

गॅस्ट्रोप्रोटेक्टिव्ह म्हणजे जठरासंबंधी श्लेष्मल त्वचेचे नुकसान होण्यापासून पोटाचे संरक्षण करण्यासाठी कार्य करणारी यंत्रणा.

“कैरी खाल्ल्याने आरोग्याच्या विविध पैलूंवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, याचे श्रेय कैरीत असलेल्या भरपूर पौष्टिक घटकांना दिले जाते. कैरीमध्ये आढळणारे मँगिफेरिन, एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जे यकृताच्या आरोग्यासाठी संभाव्य फायदे देणारे हेपेटोप्रोटेक्टिव्ह (hepatoprotective) गुणधर्म दर्शवते”, असे डॉ. कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा – कलिंगड, पुदिना, लिंबूचे शक्तिशाली डिटॉक्स ड्रिंक तुमची त्वचा उजळण्यास कशी मदत करते? तज्ज्ञांनी केला खुलासा

“कैरीमध्ये व्हिटॅमिन सीचे मुबलक प्रमाण असते, जे हेमोफिलिया (Haemophilia ) आणि ॲनिमिया (Anaemia) सारख्या रक्त विकारांचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. याव्यतिरिक्त ते रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते, रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवते आणि हिमॅटोपोईसिस (Haematopoiesis) प्रक्रियेस समर्थन देते”, असे डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले. हिमॅटोपोईसिस म्हणजे रक्तपेशी घटकांची निर्मिती करणे.

डॉ. कुमार यांच्या मते, “कैरीमध्ये कॅरोटीनोइड्सचे उच्च प्रमाण असते, जे डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी सुधारण्यास योगदान देऊ शकते. शिवाय, कैरीमध्ये असलेली पाण्याची पातळी शरीरातील निर्जलीकरण रोखण्यासाठी प्रभावी ठरते, विशेषत: उन्हाळ्याच्या महिन्यांत. कैरीच्या पौष्टिक रचनेमुळे हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे आणि स्कर्व्हीसारख्या समस्यांचे निराकरण करण्याची तिची क्षमता आहे.”

हेही वाचा – एअर फ्राईंग की तळणे? स्वयंपाकाची कोणती पद्धत आहे योग्य? डॉक्टर काय सांगतात…

स्कर्वी हा एक आजार आहे, जो तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी (एस्कॉर्बिक ॲसिड)ची तीव्र कमतरता असल्यास होतो.

“हे रसाळ फळ बद्धकोष्ठता आणि अपचन यांसह साामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (gastrointestinal) आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात; कारण त्यात फायबर घटक आणि पाचक गुणधर्म असतात”, असेही डॉ. कुमार यांनी सांगितले.

कैरी तुमच्या आतड्यासाठी चांगली आहे का?

“व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सच्या मिश्रणासह कैरी उत्कृष्ट प्रतिकारशक्ती वाढवणारा घटक म्हणून काम करते. हे घटक शरीराच्या संरक्षण यंत्रणेला समर्थन देण्यासाठी समन्वयाने कार्य करतात. तुमच्या आहारात कैरीचा समावेश केल्याने अनेक प्रकारचे आरोग्य फायदे मिळू शकतात. एकूणच आरोग्याला चालना मिळते आणि विविध शारीरिक कार्यांना समर्थन मिळते”, असे डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – घसा खवखवत असेल तर लिंबू आणि मधाचे सेवन करावे का? या घरगुती उपायाबाबत काय सांगतात डॉक्टर

काय लक्षात ठेवावे?

डॉ. कुमार यांनी सांगितले की, “कैरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि पेक्टिनचे प्रमाण जास्त असते, जे तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनासाठी फायदेशीर ठरू शकते. पण, कैरीमध्ये उरुशिओल (Urushiol) नावाचा पदार्थदेखील असतो, ज्यामुळे तोंड, घसा आणि पचनसंस्थेमध्ये दाह निर्माण होऊ शकते, विशेषत: मोठ्या प्रमाणात सेवन केल्यावर.याशिवाय, कैरीमध्ये सायट्रिक ॲसिडची उच्च पातळी असते त्यामुळे त्याचे जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात जळजळ आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.”