हिरव्या भाज्या हा आरोग्याचा खजिना मानला जातो. भाज्यांमध्ये आवश्यक असे पोषक घटक आणि जीवनसत्त्वे असतात, जी शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असतात. अशीच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असलेली भाजी म्हणजे दुधी; उन्हाळ्यात दुधी बाजारात खूप बघायला मिळेल. दुधीमध्ये व्हिटॅमिन-सी, सोडियम, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. पण, दर आठवड्याला दुधी खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? याच विषयावर हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ. दिलीप गुडे यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
डॉ. गुडे सांगतात, उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राखण्यासाठी जशी काही फळं खाणं गरजेचं असतं. तशाच काही भाज्यादेखील नियमित खाणे आवश्यक असते. दुधी आपल्या सर्वांसाठी फायदेशीर असून ते शरीर थंड ठेवते. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फोलेट इत्यादी प्रदान करते. दुधी वा लौकी ही एक भाजी आहे, जी बर्याच छोट्या उपचारांच्या गुणधर्मांची खाण आहे. दुधी हे एक वॉटर व्हेजिटेबल असून उन्हाळ्यात ते जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे. याशिवाय उन्हाळ्यात दुधी खाल्ल्याने आरोग्य तंदुरुस्त राहते. १०० ग्रॅम दुधी सुमारे १७ कॅलरीज आणि २.९ ग्रॅम फायबर देते आणि आठवड्यातून दोन किंवा तीनदा तुम्ही खाऊ शकता”, असे डॉ. गुडे म्हणाले.
(हे ही वाचा : नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात कोणती बाजरी खावी? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…)
दुधी खाण्याचे फायदे
१. दुधीमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पोटॅशियम रक्तवाहिन्यांच्या भिंती शिथिल करून बीपी नियंत्रित करण्यास मदत करते.
२. वजन कमी करण्यासाठीही दुधी खूप फायदेशीर आहे. दुधीमध्ये व्हिटॅमिन-सी, सोडियम, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. दुधी खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते.
३. दुधीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे उन्हाळ्यात निर्जलीकरण होण्यापासून प्रतिबंधित करते.
४. दुधी खाल्ल्याने किडनी निरोगी राहण्यास मदत होते. यामधे सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते किडनीसाठी खूप फायदेशीर असते.
दुधी खाताना कोणती काळजी घ्यावी?
दुधी शरीरासाठी फायदेशीर असली तरी संभाव्य दुष्परिणामांबद्दल जागरूक असणे महत्त्वाचे आहे.
१. काही लोकांना दुधीची अॅलर्जी असू शकते, सूज येणे, पुरळ उठणे किंवा खाज येणे, अशा समस्या उद्भवू शकतात.
२. दुधीमधील कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सामान्यत: तो सुरक्षित असला तरी रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. कारण- दुधीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी खालावू शकते. त्यामुळे यासाठी डाॅक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले.
३. विशेषतः जर दुधी कडू असेल, तर काही लोकांना पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दुधी निवडताना तो कडू असणार नाही, याची खात्री करून घ्या.