तुमच्या घरात किंवा कार्यालयात सोबतच्या स्त्रिया, “किती उकडतंय, किती गरम होतंय, पंख्याचा वारा लागतच नाही, एसी लावा, एसीचे तापमान कमी करा…” वगैरे तक्रारी करत असतील तर त्यांमागे तथ्य आहे, स्त्रिया उगाच तसं बोलत नसतात.

सभोवतालच्या उष्ण तापमानाचा आरोग्यावर होणारा बरा-वाईट परिणाम अभ्यासताना असे दिसून येते की, पुरुषांच्या तुलनेत स्त्री-शरीरावर उष्ण तापमान अधिक विपरीत परिणाम करते. स्त्रियांवर उच्च तापमानाचा अधिक वाईट परिणाम का होतो याचे स्पष्टीकरण देताना जो महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो असा.

हेही वाचा – खराब कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यासाठी दिवसाला किती बदाम खावे? डॉक्टरांनी सांगितले, “प्रत्येक जेवणाआधी…”

पुरुष आणि स्त्रियांच्या पेहरावामध्ये – कपड्यांमध्ये असणारा फरक हे स्त्रियांच्या शरीरावर उष्णतेचा अधिक परिणाम होण्याचे मुख्य कारण असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. त्यातही भारतासारख्या ज्या देशांमध्ये स्त्री-शरीर अधिकाधिक झाकले जाईल असे कपडे घालण्याचा रिवाज आहे, तिथल्या स्त्रियांनी एकावर एक घातलेले अंगावरचे कपडे, (त्यात पुन्हा आधुनिक काळात हवेचे अजिबात आवागमन (व्हेंटिलेशन) होऊ न देणारी जीन्स) आणि त्याखालील अंतर्वस्त्रे यांमुळे शरीराला वारा लागत नाही आणि आतली उष्णता आतल्या आतच वाढत जाते. संपूर्ण शरीर झाकलेल्या कपड्यांमुळे बाह्य त्वचेला घाम निर्माण करून शरीराला थंड करण्याचा उपायसुद्धा करता येत नाही (जीन्समुळे तर अधिकच) त्यात पुन्हा स्वयंपाकघरात उष्णतेजवळ सरासरी दोन ते चार तास काम केल्यामुळे वाढणाऱ्या उष्म्यामुळे स्त्रियांचे शरीर अधिकच उष्ण होत जाते, जे विविध उष्णताजन्य विकारांना बळी पडू शकते.

उन्हाळ्यात स्त्रियांना अधिक गरम का होते, यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे. शास्त्रीय कारणाचा विचार करता स्त्रियांच्या शरीरामध्ये त्वचेखाली असणारी अधिकची चरबी त्याला जबाबदार असल्याचे लक्षात येते. त्वचेखाली अधिक मात्रेमध्ये असणार्‍या चरबीमुळे स्त्री-शरीराला सौष्ठव व सौंदर्य प्राप्त होते. हीच चरबी स्त्रियांच्या शरीराला अधिक ऊब देते. ऊब देण्याचा चरबीचा हा गुण हिवाळ्यात उपकारक सिद्ध होत असला तरी उन्हाळ्यात मात्र शरीराला सहजी थंड होऊ देत नाही व स्त्री-शरीर उन्हाळ्यामध्ये तुलनेने अधिक गरम राहते.

हेही वाचा – अंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? खरंच वाढतो हृदयविकाराचा धोका? जाणून घ्या

एकंदरच उन्हाळ्याचा आणि उष्ण तापमानाचा स्त्रियांच्या आरोग्यावर किती विपरीत परिणाम होत असेल, याची पुरुषांना कल्पनासुद्धा करता येणार नाही. मात्र त्याची कल्पना करून, त्यामागील कारणे ओळखून त्यामध्ये बदल व्हायला हवा. संस्कृतीला धक्का न लावता स्त्रियांना हवेशीर कपडे कसे मिळतील याची काळजी घ्यायला हवी. स्वयंपाकघरातली उष्णता कशी वाहून जाईल व स्वयंपाकघर कसे हवेशीर राहील यासाठी प्रयत्न व्हायला हवे. महत्त्वाचे म्हणजे, स्वयंपाकाची जबाबदारी घरातल्या प्रत्येक सदस्याने उचलायला हवी. घरातल्या सर्वांच्या उदरभरणासाठी अन्न तयार करणे, ही काही एकट्या स्त्रीची जबाबदारी नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्त्रियांनीसुद्धा पाणी व अन्य द्रवपदार्थ (चहा, कॉफी, मद्य वगळून) पित राहावे. केवळ दहा-बारा ग्लास पाणी पिऊन चालत नाही, शरीरातून घटलेले क्षार व ऊर्जा मिळायला हवी. त्यासाठी दिवसातून निदान एका शहाळ्याचे पाणी प्यावे. पाणी व थंडावा देणाऱ्या फळांचे सेवन करावे, जसे केळी, कलिंगड, काकडी, टरबूज, द्राक्ष, पेरू, वगैरे. दिवसातून एकदा तरी फळांचा रस प्यावा.