Health Special “उन्हामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते, घाम वाढतो, थकवा येतो, घसा कोरडा होतो, तहान लागते, अंगाचा दाह होतो, गळून गेल्यासारखे होते, चक्कर येते, क्वचित बेशुद्धीसुद्धा येते, शरीरामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे विकृत झालेले पित्त रक्ताला दूषित करून रक्तस्त्रावाशी संबंधित विकृती निर्माण करते.” – १६ व्या शतकामध्ये लिहिलेल्या भावप्रकाश या ग्रंथात भावमिश्रांनी हे म्हटले आहे. आयुर्वेदाने दिलेला सल्ला पाळला तर ऊन्हाचा त्रास भरपूर कमी होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रीष्म ऋतूमध्ये पाळण्याजोगा एक महत्त्वाचा सल्ला आयुर्वेदाने दिला आहे, तो म्हणजे ऊन टाळण्याचा. खरं तर तीव्र ऊन हे सर्वच प्राणिमात्रांसाठी योग्य नाही. त्यातही ग्रीष्म ऋतूमधले ऊन हे आरोग्यासाठी अधिक घातक समजले जाते , कारण या दिवसांत सूर्यकिरणे अतिशय तीव्र असतात. त्यामुळे होताहोईतो ग्रीष्मातले ऊन टाळणेच योग्य. बाहेर जावे लागलेच तर डोक्याला ऊन लागू नये म्हणून टोपी हवीच. प्राचीन ग्रंथांमध्ये घराबाहेर पडताना डोके आच्छादल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे. अगदी गेल्या शतकापर्यंत म्हणजेच १९५०-६० पर्यंत सर्रास लोक टोप्या वापरत होते. प्रत्येक गावामध्ये टोपी विकणारे एक दुकान असायचेच. आजकाल खास टोपीची अशी दुकाने सहसा दिसत नाहीत. (कारण २१व्या शतकात लोक स्वतः टोपी घालत नाहीत,दुसर्‍याला मात्र घालतात.) दुर्दैवाने आज टोपी घालून बाहेर फिरणे लोकांना शोभनीय वाटत नाही, हे चुकीचे आहे.

हेही वाचा : 4 to 6 PM Snacks: या दोन तासात खाणं म्हणजे शरीराशी शत्रुत्व! डॉक्टर सांगतायत भूक लागलीच तरी काय खावं?

डोक्यावर टोपी घालणे बंद का झाले?

आपल्या देशात एक काळ होता जेव्हा समाजातील जवळपास प्रत्येकजण डोक्यावर टोपी घालत असे. ही जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा होती म्हणा वा फॅशन होती म्हणा; पण टोपी घालण्याचा सर्रास प्रघात होता, तो इतका की डोक्यावर टोपी घातल्याशिवाय घराबाहेर पडणे अप्रशस्त समजले जात असे. पुरुष टोपी घालत तशा स्त्रिया डोक्यावरुन पदर घेत किंवा इतर प्रांतांमध्ये डोक्यावरुन दुपट्टा घेत. आयुर्वेद शास्त्रानेही डोक्यावर आच्छादन घातल्याशिवाय बाहेर फ़िरणे अयोग्य मानले आहे. तो स्वातंत्र्यपूर्व काळ असल्याने तेव्हा पगडी, मुंडासे, फेटा, हॅट वगैरे वेगवेगळ्या स्वरुपामध्ये डोक्यावर टोपी घातली जात असे. टिळक-आगरकरांच्या काळात पुणेरी पगडी प्रसिद्ध होती. स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढाईमध्ये गांधींचा उदय झाल्यानंतर हळूहळू गांधीटोपी प्रसिद्ध झाली आणि सर्वसामान्य लोक गांधीटोपी घालू लागले होते. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान झालेले पंडीत जवाहरलाल नेहरु हे एक असे व्यक्तिमत्व होते की त्यांचा टोपीशिवायचा चेहरा पाहिल्याचे आपल्याला आठवत नाही.

हेही वाचा : ‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; उन्हाळयात पुरुषांसाठी धोका कसा वाढतो, उपाय काय करावे? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

पाश्चात्यांचे अंधानुकरण

१९५०-६० च्या आसपास टोपी घालणे हा प्रकार कमी होऊ लागला. इतर अनेक गोष्टींप्रमाणेच पाश्चात्त्यांचे अंधानुकरण हे कारण यामागे असावे. एकोणिसाव्या शतकात हॅट घालण्याची फ़ॅशन ब्रिटनबरोबरच संपूर्ण युरोप व अमेरिकेमध्ये होती. १९४० नंतर मात्र डोक्यावर हॅट घालण्याची स्टाईल कमी कमी होत गेली, ज्यामागे कार हे एक कारण असावे. १९२० पर्यंत अमेरिकेमध्ये लोकसंख्येच्या केवळ एक टक्का लोकांकडे कार होत्या. साहजिकच बहुतांश लोक कामकाजासाठी चालण्याचा वा घोडागाडीचा अवलंब करत होते आणि त्यामुळेच ऊन, पाऊस, वारा वगैरेपासून संरक्षण होण्यासाठी टोपीची आवश्यकता भासत होती. अन्य कारणे म्हणजे विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पुरुष रोजच्या रोज डोक्यावरुन अंघोळ करत नव्हते. त्यामुळे डोक्यावरील केसांमध्ये धूळ वगैरे कचरा जाऊन ते खराब होण्याची भीती होती. नित्यनेमाने डोक्यावरुन अंघोळ करु लागल्यावर केसांचे आरोग्य सुधारल्यानेही टोपीची गरज वाटेनाशी झाली असावी. याच सुमारास पुरुषांच्या केसांच्या आकर्षक रचना (hair styles) केल्या जाऊ लागल्या.टोपीखाली केस लपल्यानंतर त्यांची रचना वगैरे करण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र एकाहून एक सुंदर केशरचना केल्यावर त्यावर टोपी घालण्यात काय हशील? पाश्चात्त्यांचे अनुकरण करणार्‍या भारतीयांनीसुद्धा स्वातंत्र्यानंतरच्या दशकभरातच टोप्या वापरणे बंद केले, डोक्यावर टोपी घालणे उष्ण कटिबंधाच्या देशामध्ये शरीरासाठी उपकारक असूनही!

डोक्यावर टोपी घालण्याचे फ़ायदे

कडक उन्हामध्ये फ़िरत असताना डोक्यावर थेट तीव्र सूर्यकिरणे पडू नयेत म्हणून टोपीचे संरक्षण निश्चित उपयोगी पडते. टोपीचा एक मोठा फ़ायदा म्हणजे डोक्याचे लहानसहान आघातांपासुन रक्षण. रस्त्यावर चालताना वा अन्य कुठेही डोक्यावर होऊ शकणार्‍या आघातांपासून डोक्याला वाचवण्यात टोपी निश्चित उपयुक्त ठरत होती. त्यातही ज्यांच्या डोक्यावर केस नाहीत त्यांनी टोपी घातल्यास केसांचा संरक्षक स्तर डोक्याला थेट मार लागण्यापासून वाचवतो तशीच टोपी संरक्षक स्तराप्रमाणे उपयोगी पडते. या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांनी टोपी घालणे किती आवश्यक आहे हे इथे समजते. ज्यांच्या डोक्यावर केस आहेत त्यांच्या डोक्यासभोवताली टोपीमुळे दुहेरी संरक्षक कवच तयार होईल.टोपीमुळे चेहर्‍यावर सावली पडते,पण त्यासाठी टोपी मोठ्या आकाराची असायला हवी.

हेही वाचा : Health Special: नसलेल्या अवयावशी जुळवून घेताना.. (अॅमप्यूटेशन नंतरच पुनर्वसन)

डोळ्यांचे रक्षण

टोपीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे टोपीमुळे होणारे डोळ्यांचे रक्षण. थेट डोळ्यांमध्ये शिरणार्‍या सूर्यकिरणांना अटकाव करण्यास टोपी निश्चित उपयुक्त सिद्ध होते. सूर्यकिरणांचा डोळ्यांवर विशेषतः नेत्रपटलावर होणारा दुष्परिणाम तर सिद्धच आहे. त्यांना अडवण्यासाठी टोपी मात्र तशाच आकाराची हवी. डोक्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गोलाकार टोपीमुळे डोळ्यांच्या भोवतालच्या नाजूक त्वचेवर पडण्यापासून सूर्यकिरणांना अडवता येऊ शकते. डोळ्यांभोवतालची त्वचा ही नाजूक असल्याने ती सूर्यकिरणांना अधिक संवेदनशील असते. सूर्यकिरणांमुळे डोळ्यांखालची त्वचा अधिक गडद व सुरकुत्यांनीयुक्त होऊन वय वाढल्याची लक्षणे दिसू शकतात. टोपीमुळे त्याला प्रतिबंध करता येतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why wear a cap in summer what are its benefits hldc css
First published on: 28-05-2024 at 15:04 IST