तंदुरुस्त राहण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल अनेक जण सल्ले देत असतात. तेव्हा कोणता सल्ला ऐकावा याबद्दल अनेकांचा गोंधळ उडतो. मात्र, व्यायाम किंवा योगासने करताना, प्रत्येकाचे आहाराकडे लक्ष असणे आवश्यक असते. त्यासाठी व्यक्ती योगा डाएट करू शकते. त्यामध्ये फक्त व्यायामामध्ये आणि झोपण्यापूर्वी दोन तास अन्नपदार्थ खाऊ नये एवढे लक्षात ठेवायचे. त्यामुळे सकाळी योगासने करताना शरीरातील सर्व ऊर्जा आपण करीत असणाऱ्या आसनांकडे केंद्रित होण्यास मदत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  1. ‘अमृता’सारखे असणारे अन्न खावे

अमृत हा शब्द अ आणि मृत्यू यांच्या संयोगातून तयार झालेला आहे; ज्याचा अर्थ मृत्यू न होऊ शकणारा, असा होतो. भाजी, फळे, धान्य यांसारखे पदार्थ जितके ताजे असतील तितकेच ते तुम्हाला ऊर्जा आणि पोषक घटक देऊ शकतात. मात्र, त्यांच्यातील ताजेपणा गेला किंवा पदार्थ शिळे झाले की, त्यासोबत पोषक घटकदेखील कमी कमी होऊ लागतात. तुम्ही जरी अशा गोष्टी टिकून राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवलेल्या असतील तरीही त्यांच्यातील उपयुक्त घटक कमी होतात. मात्र, तुम्ही जर साखर किंवा पॉलिश केलेल्या धान्यांचा विचार केलात, तर असे प्रक्रिया केलेले पदार्थ अधिक काळ टिकून राहतात. कारण- ते ‘मृत अन्न’ असते. त्यामुळे असे पदार्थ खाणे शक्य तितके टाळावे, असा सल्ला योगा तज्ज्ञ, कामिनी बोबडे यांनी द इंडियन एक्स्प्रेससाठी आरोग्याविषयक लेखाद्वारे दिला आहे.

हेही वाचा : ‘या’ पदार्थांमध्ये ५० पेक्षाही कमी कॅलरीज; आहारात आवर्जून समावेश करण्याचा आहारतज्ज्ञांचा सल्ला…

२. तुमचे शरीर हेच तुमचे आहारतज्ज्ञ

तुमच्या आरोग्यासाठी काय चांगले आणि काय वाईट हे तुमचे शरीर सर्वांत चांगले सांगू शकते. कुटुंबातील व्यक्तींना चालणारा पदार्थ, हा तुमच्या शरीरासाठी उपयुक्त असेलच, असे नाही. त्यामुळे पदार्थ खाल्ल्यावर तुमचे शरीर त्यास कसा प्रतिसाद देत आहे याकडे प्रत्येकाचे लक्ष असणे गरजेचे असते. उदाहरण द्यायचे झाले, तर काहींना शेंगदाण्याचा त्रास होऊ शकतो; घरी मांसाहार करीत असतील तरी एखाद्या व्यक्तीला ते पदार्थ पचण्यास त्रासदायक ठरू शकतात. योगा करताना शरीरात बदल होत असतात. त्यामुळे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या आणि शरीरास कुठल्या गोष्टी अधिक फायदेशीर ठरू शकतात हे लक्षात घ्या.

३. हलका आणि सकस आहार करा

आपला आहार हा कायम हलका, तरीही पोषक आणि सकस असणे गरजेचे आहे. आता हे करण्यासाठी सोपा उपाय आहे. जेवताना हे गणित लक्षात ठेवा. पदार्थ खाताना अर्धे पोट अन्नाने आणि पाव भाग पाण्याने भरावे. उरलेली जागा सर्व गोष्टी पचण्यासाठी आणि हवेसाठी ठेवावी. जेवण झाल्यांनतर तुमचे शरीर जड किंवा आळसावलेले राहू नये याची काळजी घ्या.

४. हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात

आपल्या आहारामध्ये न चुकता, हंगामी म्हणजेच सीझनल फळे-भाज्या यांचा समावेश करावा. निसर्गाला कोणत्या वातावरणात कुठले पदार्थ उगवायचे ते बरोबर माहीत असते. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाच्या शरीराला खूप फायदा होतो. हिवाळ्यामध्ये पालक, मटार, गाजर इत्यादी पदार्थ उपलब्ध असतात. उन्हाळ्यात आंबा हे सर्वांना आवडणारे फळ मिळते. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांचे सेवन करावे.

हेही वाचा : बैठ्या कामामुळे पोटावरची चरबी वाढतेय? आहारतज्ज्ञांचा सल्ला ऐका, स्वतःला केवळ या तीन सवयी लावा…

५. शाकाहार, मांसाहार की व्हेगन पदार्थ?

तुम्ही खात असणाऱ्या पदार्थांचा शरीरावर कसा परिणाम होत आहे? तसेच पोट आणि आरोग्य त्या पदार्थांना कसा प्रतिसाद देत आहे, त्यानुसार तुमचा आहार ठरवा. काहींना व्हेगन पदार्थ अजिबात चालणार नाहीत किंवा काहींना ते खूप मदत करतील. प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते. त्यामुळे तुमचे शरीर जे संकेत देत आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका.

तसेच अनेकदा उपवास केल्याने शरीराला फायदा होतो, असे म्हणतात. मात्र, योगासनांचा सराव करताना अतिउपवास करणे टाळण्याचा सल्ला योगा तज्ज्ञ, कामिनी बोबडे यांनी दिला असल्याची माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या आरोग्यासंबंधित लेखातून मिळते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga diet how to take all the benefits of yoga with healthy and correct diet check out dha
First published on: 27-01-2024 at 15:03 IST