Causes Of Heart Attack in Youth: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आणि अनियमित खानपानामुळे हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) हा फक्त वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आता तरुण पिढीतदेखील ही समस्या भीषण वेगाने वाढताना दिसते आहे. एकेकाळी ४०-५० वर्षांनंतर होणारा हृदयविकार आता २५ ते ३० वर्षांच्या युवकांनाही ग्रासतो आहे.
राजीव गांधी रुग्णालयाचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित कुमार यांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “भारतामध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा वाढता वेग चिंताजनक आहे. दरवर्षी हजारो लोक या आजारामुळे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामागे अनियमित जीवनशैली, ताणतणाव, चुकीचं खानपान आणि व्यायामाचा अभाव हे प्रमुख घटक आहेत.”
का वाढतोय हृदयविकाराचा धोका?
डॉ. अजित कुमार सांगतात की, हृदयविकाराच्या मुख्य ७-८ कारणांपैकी सर्वांत मोठं कारण म्हणजे जीवनशैली (लाइफस्टाईल). त्याचप्रमाणे…
- झोपेचा अभाव
- जंक फूड
- व्यायामाची कमतरता
- सततचा मानसिक ताण
- धूम्रपान आणि दारूसेवन या सवयी हृदयाला थेट हानी पोहोचवतात.
त्याशिवाय कौटुंबिक इतिहास (आई-वडिलांना किंवा भावंडांना हृदयविकार असल्यास), मधुमेह, उच्च रक्तदाब आणि जास्त कोलेस्ट्राॅल हीसुद्धा हृदयविकाराची मोठी कारणं आहेत. या तिन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवल्या, तर हार्ट अटॅकचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.
शरीरातील ब्लॉकेज कसे वाढतात?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रक्तवाहिन्या शरीराचे तापमान आणि रक्तदाब सांभाळण्यासाठी जास्त मेहनत घेतात. त्यामुळे ब्लडप्रेशर आणि हृदयाची गती वाढते. त्यामुळे हृदयावर रक्त पंप करताना जास्त ताण येतो. अशा वेळी हृदयात ब्लॉकेज तयार होऊन झटक्याचा धोका वाढतो.
कसा टाळाल हृदयविकाराचा धोका?
हृदय सुस्थितीत ठेवण्यासाठी दररोज ३० ते ४५ मिनिटं चालणं, नियमित व्यायाम, साखरेचं नियंत्रण व तणावमुक्त जीवन अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर सांगतात, पायांची हालचाल ही तुमच्या हृदयाची सर्वांत मोठी मैत्रीण आहे. नियमित चालण्यानं आणि व्यायामानं रक्ताभिसरण सुधारतं, वजन कमी होतं आणि हृदय मजबूत राहतं.”
तसेच
- धूम्रपान व दारूसेवन पूर्णपणे टाळा
- भाज्या, फळं आणि ताजं अन्न सेवन करा
- पुरेशी झोप घ्या आणि स्क्रीन टाइम कमी करा
- ताणतणावावर नियंत्रण ठेवा
तज्ज्ञांचा इशारा:
“आजचा तरुण वर्ग पैसा, करिअर आणि सोशल मीडियाच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आहे. जर वेळीच सावध झालो नाही, तर येणाऱ्या दशकात तरुणांमधील हे हृदयविकारग्रस्तांची संख्या नियंत्रणाबाहेर जाईल,” असा गंभीर इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
सावध राहा! जीवनशैली बदला; अन्यथा ‘हार्ट अटॅक’ कोणत्याही क्षणी दार ठोठावू शकतो…
