scorecardresearch

Health Tips : नोकरी करणाऱ्या महिलांचं ‘असं’ असावं डाएट

उत्तम आरोग्यासाठी काही खास टीप्स

Health Tips : नोकरी करणाऱ्या महिलांचं ‘असं’ असावं डाएट

महिला नोकरीसाठी बाहेर पडण्याचे प्रमाण सध्या मोठे आहे. पुण्या-मुंबईसारख्या शहरांबरोबरच इतर शहर आणि खेड्यांतही महिला नोकरी करताना दिसतात. कुटुंब आणि नोकरी करताना त्यांची तारेवरची कसरतच होते. याचा परिणाम अनेकदा त्यांच्या आरोग्यावरही होतो. त्यामुळे ही कसरत करत असताना महिलांनी काही गोष्टी मुद्दाम लक्षात ठेवायला हव्यात. तर मग घर, जॉब, आणि स्वतःची काळजी हे सर्व एका वेळी कसे बरं साधता येईल हे पाहूया.

१. दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची काही तयारी आदल्या दिवशी करून ठेवावी. यात डाळी भिजत घालणे, कडधान्य भिजवून ठेवणे, भाज्या निवडून ठेवणे हे करता येईल.

२. शक्यतो स्वतःच्या डब्यात पोळी बरोबर भाजी ऐवजी उसळी घेणे, ज्यामुळे स्टॅमिना जास्त राहील.

३. आपल्या बरोबर एखादं फळ, चिक्की, गुळशेंगदाणा लाडू, राजगिरा वडी हे कायम ठेवावे. भूक लागली असं वाटल्यास पटकन तोंडात टाकता येतं.

४. दोन दिवसातून एकदा तरी नारळ पाणी प्यावे.

५. आहारात दूध, पनीर, दही, ताक यांचा समावेश आवर्जून करावा.

६. अनेक महिला घरातील कामे, इतरांचे डबे भरणे आणि स्वत्ःचे आवरणे या घाईत नाष्ता न करता बाहेर पडतात. मात्र सकाळी आवर्जून पोटभर खाणे अत्यंत गरजेचे आहे.

७. सकाळी उठल्यावर स्वयंपाकाची तयारी करता करता चहा न घेता एक फळ आवर्जून खावे.

८. संध्याकाळी घरी आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करताना लिंबु सरबत घ्यावे. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी अॅंटीऑक्सिडंटस मिळतील व ताजेतवाने वाटेल.

९. वेळेचे नियोजन करून आपली सर्व कामे करावीत. दुसऱ्या दिवशीच्या वेळांचे व कामाचे नियोजन आदल्या दिवशी करावे. त्यामुळे खाण्यापिण्यावर परिणाम होणार नाही.

१०. रोज झोपताना कडधान्य आठवणीने भिजत घालावीत. सकाळी उठल्यावर कुकरला लावून त्याची भाजी/ उसळ पटकन होते व डब्यात सर्वांना देता येते.

११. तरुण मुलींना कॅल्शियमबरोबरच आयर्नची नितांत गरज असते. पाळी सुरु झाल्यानंतर सुरुवातीपासूनच जर त्या मुलीच्या पौष्टीक खण्यापिण्याकडे लक्ष दिले गेले तर पुढे पाळीचे त्रास होत नाहीत.

१२. पौगंडावस्था आणि तरुण वयोगटातील मुली बऱ्याचदा आपल्या दिसण्याबद्दल खूप जागरूक असतात. यातून बऱ्याच मुली विचित्र आहार पद्धती अवलंबतात. काहीच न खाणे, फक्त फळे खाणे, बाजारातील शेक पिऊन वजन कामी ठेवणे असे प्रयत्न त्या करत असतात. या सगळ्या दिसण्याच्या गडबडीत त्या स्वतःच पोषण करायला विसरून जातात. आणि ज्या वया मध्ये पोषणाची अधिक गरज असते त्याच वयात त्या शरीराला चांगले घटक देत नाहीत. या वयात साठवलेले कॅल्शियम म्हातारपणी उपयोगी येत असते. अभ्यास, नोकरी, कुटुंब अशा वेगवेगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होताच असतो. म्हणून योग्य आहार या वयातमध्ये घेणं अतिशय महत्वाचे आहे.

१३. मेनोपॉझच्या वयोगटात महिलांना कॅल्शियम गरजेचे असतेच पण त्याबरोबरच प्रथिनांचीही तितकीच आवश्यकता असते. या वयातील महिलांना मधुमेहासारखे इतर आजार असतील तर त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आहारा बरोबर त्यांना मानसिक आधाराची अत्यंत गरज असते.

सकाळी नाश्त्याला उपयोगी होतील अशी एक पटकन होणारी व बरेच प्रकार होतील अशी पाककृती.
रात्री दलिया +मूग डाळ+ उडीद डाळ भिजवावे. सकाळी आलं लसूण कोथिंबीर मिरची घालून वाटावे. लगेच या मिश्रणाचे डोसे, उत्तपे, वडे, आप्पे, इडल्या असे पदार्थ बनवू शकता.

श्रुती देशपांडे, आहारतज्ज्ञ

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2017 at 10:10 IST

संबंधित बातम्या