Drinks to Prevent Liver Damage: दारू पिणं ही फक्त एक सवय असेल तर ती सहज बदलता येऊ शकते, पण जर ती लत बनली असेल तर बदलणं अगदी कठीण होऊन बसतं. दारू म्हणजे शरीरासाठी हळूहळू झिरपणारं विष. सुरुवातीला मेंदूवर परिणाम, मग शरीरात अनेक बिघाड आणि सर्वात आधी फटका बसतो तो यकृतावर. दीर्घकाळ दारू प्यायल्याने फॅटी लिव्हर, सिरॉसिस, अगदी लिव्हर फेल्युअरपर्यंत धोका निर्माण होतो. इतकंच नव्हे तर दारू हृदयाचे ठोके विस्कळीत करते, रक्तदाब वाढवते आणि मानसिक संतुलन ढासळवते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये तब्बल २६ लाख लोकांचा मृत्यू थेट दारूच्या सेवनामुळे झाला. २०० पेक्षा अधिक आजारांना कारणीभूत असलेली ही एकच वस्तू किती प्राणघातक आहे याची ही ठळक जाणीव.

पण प्रश्न असा की, दारूची सवय सोडून त्याला पर्याय काय? तर उत्तर आहे, काही घरगुती आरोग्यदायी पेय. ही पेय केवळ लिव्हरलाच सुरक्षित ठेवत नाहीत, तर हृदय, मूत्रपिंड आणि संपूर्ण शरीराला नवसंजीवनी देतात. चला तर मग पाहूया अशी कोणती ४ पेय आहेत, जी दारूच्या हानीपासून बचाव करु शकतात.

हे पेय तुमचं आरोग्य वाचवतील!

१. कंबुचा (Kombucha)

चीन-जपानमधून आलेलं हे प्राचीन आंबवलेलं पेय आज जगभर प्रसिद्ध आहे. काळी किंवा हिरवी चहा, थोडी साखर, यिस्ट आणि चांगले जीवाणू यांपासून ते तयार होतं. जसं दही किंवा किमची पचनशक्ती वाढवतात, तसं कंबुचातील प्रोबायोटिक्स आतड्यांना निरोगी ठेवतात. २०२४ च्या एका संशोधनात सिद्ध झालं की, कंबुचा रक्तदाब कमी करतो, कर्करोगापासून संरक्षण करतो, लिव्हरमधील विषारी घटक कमी करतो आणि शरीरात चरबी साठू देत नाही.

२. इन्फ्यूज्ड वॉटर (Infused Water)

सर्वात सोपं आणि सुरक्षित पेय म्हणजे पाणी. पण, त्याला नवा ताजेपणा द्यायचा असेल तर त्यात फळं, पालेभाज्या किंवा औषधी वनस्पती टाका. काकडी-पुदिना उन्हाळ्यात गारवा देतो, स्ट्रॉबेरी-तुळस चव आणि सुगंध वाढवतात, तर संत्र-रोझमेरी हे संयोजन प्रचंड ताजेतवाने करतं. यात साखरेची गरज नसते, त्यामुळे लिव्हरवर ताण येत नाही. इन्फ्यूज्ड वॉटर शरीरातील घाण बाहेर टाकून हायड्रेशन टिकवून ठेवतं.

३. हर्बल चहा (Herbal Teas)

हर्बल चहांमध्ये अनंत फायदे दडलेले आहेत. हिबिस्कस चहा यकृतासाठी अमृत मानला जातो, तो कर्करोग टाळू शकतो. पिपरमिंट चहा पचनशक्ती सुधारतो, दिवस उत्साही करतो; तर कॅमोमाईल चहा तणाव कमी करून गाढ झोप देतो. वेगवेगळ्या चवींमुळे आणि फायद्यांमुळे हर्बल चहा चांगला पर्याय आहे.

४. मॉकटेल्स (Mocktails)

मॉकटेलमध्ये अल्कोहोल नसते. फळांचे रस, ज्यूस किंवा सोडा यांच्या मिश्रणाने मॉकटेल बनवले जाते. मॉकटेल्स यात फळं, पुदिना, स्पार्कलिंग वॉटर, नैसर्गिक सिरप यांचा संगम असतो. मॉकटेल्स चवदारही असून लिव्हरला हानीही पोहोचवत नाहीत.

म्हणूनच जर दारूला कायमचा रामराम करायचा असेल तर हे ‘लिव्हर-फ्रेंडली ड्रिंक्स’ तुमच्या जीवनशैलीत नक्की सामावून घ्या. कदाचित उद्या उशीर होईल, पण आज घेतलेला हा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)