Balanced lunch for weight loss: शरीरासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी तुमचा दुपारचा आहार संतुलित असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळेवर आणि योग्य आहार घेण्याचे अनेक फायदे शरीराला होतात. संतुलित आहारामुळे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते, दुपारच्या वेळी येणारी मरगळ कमी होते आणि उत्पादकता वाढते. वजन कमी करण्यासाठी फारच क्लिष्ट डाएटचा अवलंब करावा लागतो असा गैरसमज आपल्यापैकी अनेकांचा आहे. तर खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये मोठे बदल करावे लागतील असाही काहींचा गैरसमज असतो. पारंपरिक भारतीय पद्धतीचे दुपारचे जेवण हे तुमचे वजनाचे ध्येय साध्य करण्यासाठी एक शक्तिशाली साधन ठरू शकते. भारतीय जेवण साधारणपणे भाज्या, डाळी आणि पातळ प्रथिने यांसारखे पोषकतत्वांनी परिपूर्ण असे असते. हीच पद्धत फॉलो करून संतुलित आणि वजन कमी करण्यास प्रभावी उपाय साधण्यासाठी दुपारच्या जेवणात तुम्ही बदल करू शकता.
काय सांगतात पोषणतज्ज्ञ?
पोषणतज्ज्ञ मोहिता मॅस्केरेन्हास यांनी संतुलित आहाराचे नियोजन करण्यासाठी एक सोपा फॉर्म्युला सांगितला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “तुमच्या घरच्या जेवणाच्या जागी काही नवीन फॅड आणण्याची गरज तुम्हाला नाही. त्याऐवजी शरीराच्या प्रथिने आणि कॅलरीजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहारात बदल करा. यामुळे तुम्हाला दीर्घकाळ फायदा होईल. २० ते २५ ग्रॅम प्रथिने आणि १० ग्रॅम फायबर असा संतुलित आहार असावा.”
“अर्धी काकडी, कोणत्याही पालेभाज्या किंवा भोपळ्याची भाजी, एक कप डाळ, चणे, राजमा, ग्रीक योगर्ट आणि दोन लहान चपात्या याचा आहारात समावेश करू पहा”, असे मोहिता सांगतात. अशाप्रकारचे दुपारचे जेवण तुम्हाला वजन कमी करण्यास नक्की फायदेशीर ठरू शकते. हे संतुलित दुपारचे जेवण प्रथिने, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे मिश्रण करते, त्यामुळे ते पौष्टिक आणि समाधानकारक ठरते.
भारतीय पाककृतींमध्ये विविध प्रकारचे आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत. ते आपल्या दैनंदिन जेवणात अगदी सहजपणे समाविष्ट करता येतात. मूग डाळ, मसूर डाळ, चणे, राजमा, काळे बीन्स यांसारखे पदार्थ प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात. यामुळे ते वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात.
तसंच तपकिरी तांदूळ, क्विनोआ आणि बाजरी यासारखे धान्य ऊर्जा आणि फायबर देतात, तर पालेभाज्या, भोपळी मिरची आणि गाजर यांसारख्या भाज्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी एखादे इन्टेन्स डाएट आणि अवघड व्यायाम प्रकारच करावेत हा गैरसमज चुकीचा ठरू शकतो.
