मूत्रपिंड हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. शरीरातील विषारी द्रव्ये आणि घटक बाहेर टाकणे, पाणी आणि खनिजांचे संतुलन राखणे, तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवणे — ही सगळी महत्त्वाची कामे मूत्रपिंड करत असते. पण चुकीची जीवनशैली आणि सकाळच्या काही सवयींमुळे हाच अवयव हळूहळू कमकुवत होऊ लागतो आणि “साइलेंट किलर” प्रमाणे नुकसान होऊ लागते.

डॉ. व्यंकट सुब्रमण्यम (Dr. Venkat Subramaniam) या सुप्रसिद्ध रोबोटिक यूरोलॉजिस्ट यांनी त्यांच्या इंस्टाग्राम रीलमध्ये अशाच पाच सकाळच्या चुकीच्या सवयींबद्दल सांगितले आहे, ज्या किरकोळ वाटतात, पण मूत्रपिंडावर दीर्घकाळात गंभीर परिणाम करतात.

सकाळी पाणी न पिण्याची सवय

रात्रभर ७-८ तास झोपेमुळे शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) निर्माण होते. या काळात मूत्रपिंडाला पाण्याशिवायच शरीरातील विषारी द्रव्य आणि घटक बाहेर टाकावे लागतात. जर सकाळचे पहिला पेय कॉफी किंवा चहा असेल, तर मूत्रपिंडावर आणखी ताण पडतो. संशोधनांनुसार, सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि मूत्रपिंडातून विषारी घटक नीट बाहेर टाकले जातात. यामुळे मूत्रपिंडाचा धोका कमी होतो.

टीप: दिवसाची सुरुवात पाण्याने करा, कॉफीने नाही.

लघवी रोखून धरणे

काही लोक सकाळी उठून थेट व्यायाम किंवा नाश्ता करण्यास सुरुवात करतात आणि शौचास जाणे पुढे ढकलतात. ही सवय मूत्रपिंडासाठी अत्यंत हानिकारक आहे. बराच काळ लघवी रोखून धरल्यास मूत्राशयावर दबाव वाढतो आणि त्यामुळे संसर्ग किंवा मूत्राशयात खडे होण्याचा धोका वाढतो. कोरियन जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिनमधील एका अभ्यासानुसार, जे लोक ३ तासांहून अधिक वेळ लघवी रोखून ठेवतात, त्यांच्यात रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते.

टीप: सकाळी उठताच मूत्र विसर्जन करा. कधीही ते पुढे ढकलू नका.

रिकाम्या पोटी वेदनाशामक औषधे घेणे

अनेक जण सकाळी डोकेदुखी, स्नायू दुखणे किंवा थकवा यासाठी पेनकिलर (उदा. आयबूप्रोफेन) घेतात — तेही काही न खाता. पण ही सवय मूत्रपिंडासाठी “साइलेंट किलर” ठरते. रिकाम्या पोटी औषधे घेतल्याने ती थेट रक्तात शोषली जातात आणि मूत्रपिंडावर ताण येतो. डॉक्टरांच्या मते, सकाळी पेनकिलर घेण्यापूर्वी काहीतरी खाणे आवश्यक आहे, तसेच गरज नसताना किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.

टीप: औषध घेण्यापूर्वी हलका आहार घ्या.

व्यायामानंतर पाणी न पिणे

सकाळी व्यायाम करणं चांगली सवय आहे, पण घाम गाळल्यानंतर पाणी न पिणं म्हणजे शरीराला निर्जलीकरणाकडे ढकलणे. व्यायामादरम्यान शरीरातून सोडियम आणि इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. त्यामुळे व्यायामानंतर योग्य प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स (जसे ORS किंवा नैसर्गिक लिंबूपाणी) घ्यावेत. जर्नल ऑफ न्यूट्रिएंट्समधील अभ्यासानुसार, सोडियम आणि कार्बोहायड्रेटयुक्त पेय शरीराला सामान्य पाण्यापेक्षा लवकर रिहायड्रेट करतात.

टीप: व्यायामाआधी आणि नंतर भरपूर पाणी प्या.

नाश्ता टाळणे

वजन कमी करण्यासाठी किंवा वेळ वाचवण्यासाठी अनेकजण नाश्ता करत नाहीत. पण हे मूत्रपिंडासाठी वाईट ठरू शकते.
रिकाम्या पोटी राहिल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि दिवसभरात प्रोसेस्ड स्नॅक्स किंवा जास्त सोडियमयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ नेफ्रोलॉजीच्या अहवालानुसार, जास्त मीठ सेवन केल्याने मूत्रपिंडाचा आजाराचा धोका वाढतो आणि रक्तदाब वाढतो.

टीप: सकाळचा नाश्ता जरूर घ्या — मग तो ओट्स, फळं किंवा अंडी असो.