दिवाळी म्हणजे आनंद, उत्साहाचा सण. या सणाचे आगमन होताच घराघरात स्वच्छता, सजावट आणि प्रकाशाचा उत्सव सुरू होतो. दिवाळी हा असा काळ असतो, जेव्हा प्रत्येक जण आपले घर देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी सुंदर रीतीने सजवतो. म्हणूनच दिवाळीत दारावर तोरण लावण्याची परंपरा खूप जुनी आणि शुभ मानली जाते. तोरण हे केवळ सजावटीचे चिन्ह नसून, त्यामागे धार्मिक आणि ऊर्जात्मक महत्त्वही आहे. असे मानले जाते की, तोरणामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो.

दिवाळीत कोणत्या पानांचे तोरण लावावे?

१. नागवेलीचे पान
दिवाळीत नागवेलीचे पानांचे तोरण लावणे अत्यंत शुभ मानले जाते. पान हे लक्ष्मीमातेचे आवडते मानले जाते. असे म्हणतात की, नागवेलीचे पान लावल्याने घरातील सर्व वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच यामुळे घरात सुख, शांती व समृद्धी नांदते.

२. आंब्याची पाने :
हिंदू धर्मातील प्रत्येक पूजाविधीमध्ये आंब्याची पाने विशेष महत्त्वाची असतात. आंब्याच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा तर असतेच. त्याचबरोबर ती वातावरण पवित्र ठेवतात. त्यामुळे आंब्याच्या पानांचे तोरण लावणे हे केवळ पारंपरिकच नाही, तर ऊर्जादृष्ट्याही महत्त्वाचे आहे.

३. अशोकाची पाने :
अशोकाच्या पानांचे तोरणदेखील दिवाळीत लावले जाते. या पानांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि वातावरण प्रसन्न होते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशोकाची पाने वापरणे अत्यंत मंगलकारी मानले जाते.

फुले आणि पानांपासून तोरण कसे बनवायचे?

दिवाळीत तुम्ही ५, ७, ११ किंवा २१ पानांचे सुंदर तोरण सहज घरी तयार करू शकता. सर्वप्रथम ताजी आणि स्वच्छ पाने घ्या. तीन पाने एकत्र ठेवून त्यांना स्टेपलरने जोडून एक छोटा बंच तयार करा. अशा प्रकारे पाच ते सात बंच तयार करा. नंतर एक मजबूत दोरा किंवा मोळीचा धागा घ्या. त्या दोऱ्यावर प्रत्येक बंच ठरावीक अंतरावर स्टेपलरने लावा. त्यामुळे एक सुंदर आणि टिकाऊ तोरण तयार होईल. तोरण अधिक आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही ताज्या झेंडू, गुलाब किंवा मोगऱ्याची फुलेदेखील जोडू शकता. त्यामुळे तोरण अधिक पारंपरिक आणि उत्सवी वाटते.

यंदा दिवाळीत बाजारातून तयार तोरण घेण्याऐवजी आपल्या हातांनीच पाने आणि फुले वापरून एक सुंदर तोरण तयार करा. तुमचे घर उजळेलच; पण त्यात एक वेगळी ऊब आणि पारंपरिकतेची झलकही दिसेल.