घरातील फरशी चमकदार ठेवण्यासाठी जवळपास प्रत्येक घरात मॉपचा वापर केला जातो. यात ड्राय आणि वेट अशा दोन प्रकारे मॉप असतात. पण, या मॉपचा सतत वापर केल्याने त्याचे कापड खूप खराब होते. यामुळे पुन्हा तोच मॉप फरशीवर फिरवल्यास फरशी खराब होते. अशावेळी मॉप कसा स्वच्छ करायचा असा प्रश्न पडतो. असा मॉप घाणीमुळे खूप काळा दिसतो, जो पुन्हा फरशीवर तसाच वापरणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरते. यामुळे फरशी पुसण्याचा मॉप घरच्या घरी कसा स्वच्छ करायचा जाणून घेऊ…

मॉप कपडा कधी बदलायचा?

फरशी पुसून झाल्यानंतर प्रत्येकवेळी मॉपचा कपडा स्वच्छ करत असाल तरी काळजी घेतली पाहिजे. तो वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे. दर दोन-तीन महिन्यांनी एकदा मॉप कापड बदलणे आवश्यक आहे.

मॉप वापरल्यानंतर तो कसा ठेवायचा?

जर तुम्ही फरशी पुसून झाल्यानंतर मॉप कापड कुठेही ठेवले असेल तर ही चूक पुन्हा करू नका. त्यामुळे कापड लवकर खराब होऊन त्यावर घातक जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो.

अशा परिस्थितीत प्रत्येक वापरानंतर मॉप कापड स्वच्छ पाण्याने धुवा आणि जमिनीपासून दूर थंड कोरड्या जागी ठेवा. कपड्यात ओलावा राहणार नाही याची खात्री करा.

खूप अस्वच्छ मॉप कसा स्वच्छ करावा?

फरशीवर मॉपिंग केल्यानंतर मॉपची बादली स्वच्छ धुवा. आता ही बादली गरम पाण्याने भरा, त्यात व्हाइट व्हिनेगरचे काही थेंब टाका आणि त्यात मॉप कापड भिजवा आणि १५-२० मिनिटे राहू द्या. नंतर जोपर्यंत यातील घाण निघत नाही, तोपर्यंत भिजवत ठेवा.

व्हिनेगरसह तुम्ही ब्लीचच्या मदतीनेही मॉप स्वच्छ करू शकता. मॉप कापडामध्ये जमा झालेले धोकादायक बॅक्टेरिया ब्लीचच्या मदतीने सहजपणे निघून जातात.

यासाठी बादलीत सम प्रमाणात पाणी आणि ब्लीच टाका. यानंतर मॉप सोल्युशनमध्ये भिजवा आणि १५ मिनिटे असेच राहू द्या. आता ते बाहेर काढून पाण्याने चांगले धुवून स्वच्छ करा.