How Many Steps In An 8 Hour Shift : बहुतेक ऑफिस कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून काम करावे लागते. त्यामुळे काही जण शरीराची हालचाल होण्यासाठी व्यायामशाळेत जातात. पण, एवढंच पुरेसं आहे का? तर नाही… तज्ज्ञ सांगतात की, दररोज चालणे आपण विचार करतो त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. कारण- त्यामुळे तुमची चयापचय क्रिया सक्रिय राहते, रक्ताभिसरण सुधारते आणि एकूणच आरोग्याला आधार मिळतो.

२०११ मध्ये दी इंटरनॅशनल जर्नल ऑफ बिहेवियरल न्यूट्रिशन अँड फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये प्रकाशित झालेल्या ‘तरुण मंडळींनी दिवसाला किती पावलं चालली पाहिजेत’ या शीर्षकाच्या एका अभ्यासात काही अत्यंत आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी चालण्याच्या काही पायऱ्यांचे टप्पे ठरवले आहेत, जे आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य आहेत. म्हणजेच थोडं थोडं जरी जास्त चाललं, तरी तुमच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होऊ शकतो, असं या अभ्यासात म्हटलं आहे.

अभ्यासात काय आढळले?

अभ्यासात असं आढळून आलं की, निरोगी तरुण मंडळी त्यांची जीवनशैली, कामाचा प्रकार आणि दिवसभर केल्या जाणाऱ्या कामांदरम्यान दररोज चार ते १८ हजार पावलं चालतात. पण, आपण दररोज १० हजार पावलं चाललं पाहिजे, असं ऐकून आहोत. तर, चालण्याचं ध्येय हा केवळ सोशल मीडिया ट्रेंड म्हणून नाही, तर प्रत्यक्षात आरोग्यासाठीही तो एक योग्य मापदंड आहे.

१. शारीरिक हालचाली आणि आरोग्याची काळजी या दृष्टिकोनातून दररोज ७,१०० ते ११,००० पावले चालण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.

२. त्यानंतर हळूहळू ही पावलं तुम्ही २००० ते २,५०० पर्यंत वाढवू शकता. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत मोठा फरक पडतो आणि सुधारणा दिसून येते.

३. सातत्य राखणे महत्त्वाचे आहे.

ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी गणित कसं असणार?

जर तुम्ही दिवसातून आठ ते नऊ तास डेस्कवर काम करीत असाल, तर बहुतेक वेळा प्रवास आणि छोट्या कामांमुळे तुम्ही दिवसातून चार ते सहा हजार पावलं चालता. पण, आरोग्यासाठी चांगल्या समजल्या जाणाऱ्या सात ते १० हजार पावलं चालण्याच्या लक्ष्यित ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी अजून थोडं चालणं आवश्यक आहे. म्हणून…

  • लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा.
  • एक ते दोन तासांनी पाण्याची बाटली किंवा वॉशरूमला जाण्यासाठी ब्रेक घ्या.
  • कॉलवर बोलताना चालत राहा.
  • तुमच्या ऑफिस किंवा कॅफेटेरियापासून थोडी दूर गाडी पार्क करा.

कामाच्या पद्धतीनुसार बदलते चालण्याची पद्धत…

  • म्हणजेच जर जास्त बसून राहण्याचं काम असेल, तर साधारण चार ते सहा हजार पावलं तुम्ही चालता.
  • ऑफिसच्या कामादरम्यान थोडं चालणं होत असेल, तर साधारण ७ हजार ते ८ हजार पावलं तुम्ही चालता.
  • ऑफिसच्या कामादरम्यान जास्त हालचाल होत असेल, तर नऊ ते १० हजारांपेक्षा जास्त पावलं चालता येतात.

चालणं का महत्त्वाचं?

जास्त चालण्यानं कॅलरीज बर्न होण्यापेक्षा जास्त फायदा होतो. संशोधनातून असं दिसून आलं आहे की, प्रत्येक अतिरिक्त हजार पावलं हृदयरोग आणि अकाली मृत्यूचा धोका कमी करतात. त्यामुळे मूड सुधारतो, लक्ष केंद्रित होतं आणि जास्त वेळ बसल्यानं येणारा थकवासुद्धा कमी होतो. पण, १० हजार पावलं चालण तुम्हाला जास्त वाटतं असेल, तर दररोज दोन हजार पावलं जास्त वाढवल्यामुळे दीर्घकालीन आरोग्यात लक्षणीय फरक पडू शकतो.

त्याचबरोबर ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसाठी सात ते १० हजार पावलं चालण्याचं ध्येय ठेवणं हे निरोगी राहण्याचा एक उत्तम मार्ग आहे.