Water Per Day For Kidney : किडनी हे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. त्याच्या मदतीने शरीरात साचलेली घाण बाहेर पडते. किडनीचा त्रास हा गंभीर आजारांपैकी एक आहे. जर तुम्ही किडनी निरोगी ठेवली, तर तुमचे एकंदर आरोग्य चांगले राहते. किडनी रक्त फिल्टर करण्याचे काम करते. मात्र, सोबतच आपल्या अवयवांच्या योग्य कार्यासाठी अन्न आणि पाणीदेखील आवश्यक आहे. किडनीचे योग्य कार्य करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन टाळता येते आणि किडनीच्या अनेक आजारांचा धोका कमी होतो.
२०१३ मध्ये इराणी डॉक्टर व शास्त्रज्ञांनी केलेले एक संशोधन पब्मेड सेंट्रलवर प्रकाशित झाले होते, ज्यामध्ये असे म्हटले होते की, डिहायड्रेशन दूर करण्यासाठी पाणी सर्वोत्तम असेल. पाण्याचे तापमान सुमारे १६ अंश सेल्सिअस म्हणजेच ६० अंश फॅरेनहाइट असावे.
पाण्याअभावी किडनीच्या समस्या
किडनीच्या चांगल्या कार्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास डिहायड्रेशन होऊ शकते आणि याचा सर्वांत आधी किडनीवर वाईट परिणाम होतो. पाण्याअभावी शरीरात वाईट कचरा जमा होऊ लागतो, ज्यामुळे किडनीचे नुकसान होते. त्याशिवाय कमी पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोकाही वाढतो. पाण्याअभावी मूत्रमार्गाच्या संसर्गाचा म्हणजेच यूटीआयचा धोका वाढू शकतो आणि किडनी निकामी होण्याचा धोकादेखील वाढू शकतो.
दररोज किती पाणी प्यावे?
किडनीच्या आरोग्यासाठी दररोज ३-४ लिटर पाणी प्या. आदर्श मानकांनुसार, निरोगी व्यक्तीने दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यावे. जर तुम्हाला किडनीचा गंभीर आजार असेल, तर तुम्ही जास्त पाणी पिणे टाळावे. कारण- हा नियम सर्वांनाच लागू होत नाही. किडनी निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे शरीरात कचरा जमा होण्यापासून रोखले जाते आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढले जातात.
ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातील संशोधकांच्या मते, पुरेसे द्रवपदार्थ प्यायल्याने किडनी शरीरातून सोडियम, युरिया व टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे दीर्घकालीन किडनीचा आजार होण्याचा धोका कमी होतो.