Cutting Board Cleaning Hack : आजकाल बरेच लोक विळीवर भाज्या, फळं कापण्याऐवजी चॉपिंग बोर्डचा वापर करतात, ज्यामुळे किचनमध्ये दिवसातून अनेक वेळा चॉपिंग बोर्डचा वापर होत असतो. नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, दिवसभर स्वयंपाकघरात काही ना काही पदार्थ बनवणं सुरूच असतं. अशावेळी कापण्या-चिरण्यासाठी चॉपिंग बोर्ड बरा पडतो. पण, सतत वापरल्याने चॉपिंग बोर्ड चिकट, कळकट आणि अस्वच्छ दिसू लागतात. नियमित न स्वच्छ केल्यास त्याला वासही येतो.
यात जर तुमच्याकडे लाकडी किंवा प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड असेल तर तो कोणत्याही केमिकलशिवाय तुम्ही घरच्या घरी स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त हळद आणि मिठाची एक ट्रिक करायची आहे, ती कशी जाणून घेऊ…
चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी आवश्यक गोष्टी (How to Clean Cutting Board)
हळद पावडर
सैंधव मीठ
पाणी
स्वच्छ कापड किंवा स्पंज
चॉपिंग बोर्ड कसा स्वच्छ करायचा? (Easy Tips to Keep Your Cutting Board Clean and Hygiene)
चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी त्यावर थोडी हळद पावडर आणि सैंधव मीठ शिंपडा. त्यावर थोडे पाणी ओता, जेणेकरून त्याची पेस्ट बनेल. नंतर हळद आणि मिठाचे मिश्रण कापडाने किंवा स्पंजने बोर्डवर चांगले घासून घ्या. जिथे अस्वच्छ डाग दिसत असतील तर तिथे थोडे अधिक घासा. ही पोस्ट बोर्डवर १० मिनिटे तशीच ठेवा. नंतर चॉपिंग बोर्ड कोमट पाण्याने धुवा. तुम्हाला हवे असल्यास चॉपिंग बोर्डनंतर साबण लावूनही स्वच्छ करा, जेणेकरून हळदीचे डाग निघून जातील. आता चॉपिंग बोर्ड स्वच्छ कापडाने वाळवा.
प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी ट्रिक
प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा मीठ घ्या, आता हे मिश्रण थोडं पाणी घेऊन स्पंजच्या मदतीने चॉपिंग बोर्डवर घासा. अशाने बोर्डवरील तेलकट, चिकट डाग तर दूर होतीलच, शिवाय त्यातील वासही कमी होईल. यानंतर बोर्ड गरम पाण्याने धुवा आणि स्वच्छ कपड्याने पुसून ठेवा.
चॉपिंग बोर्ड वापरल्यानंतर तो स्वच्छ करून ठेवत जा, जेणेकरून त्याच्यावर कोणतेही कीटक फिरणार नाहीत आणि त्यावर घाणेरडे डागही पडणार नाहीत.