Cleaning tips: दिवाळी म्हणजे प्रकाश, उत्साह आणि स्वच्छतेचा सण. या सणापूर्वी घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करणे लोकांसाठी महत्त्वाचे असते. फक्त फर्निचर, खिडक्या किंवा मोकळी जागा नव्हे, तर घरातील छोट्या-मोठ्या वस्तूदेखील स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. घरात लगेच लक्षात येणारी आणि दररोज वापरली जाणारी वस्तू म्हणजे स्विच बोर्ड. अनेकदा आपण स्विच बोर्डांवर बसणारी धूळ , चिकट डाग आणि काळसरपणा याकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे ते जुने आणि गंजलेले दिसतात. पण, काही सोप्या उपायांनी आपण जुने स्विच बोर्ड नवीनसारखे चमकवू शकतो.
सुरुवात करण्यापूर्वी काळजी घ्या
स्विच बोर्ड स्वच्छ करताना सर्वप्रथम बोर्ड पूर्णपणे ऑफ करून घ्या. ओल्या हातांनी लाईव्ह स्विचला स्पर्श करणे टाळा. स्वच्छता करताना पायात नेहमी चप्पल किंवा सँडल घाला आणि स्वच्छ केल्यानंतर बोर्ड पूर्णपणे सुकू द्या. ओल्या हातांनी स्पर्श केल्यास पाणी किंवा धूळ लगेच स्विचवर चिकटू शकते.
टूथपेस्टचा वापर करून स्विच बोर्ड चमकवा
घरी सहज उपलब्ध होणारी पांढरी टूथपेस्ट जुने आणि गंजलेले स्विचबोर्ड चमकवण्यासाठी उपयुक्त आहे. स्विच बोर्डावर थोडी टूथपेस्ट लावा आणि जुन्या ब्रशच्या साहाय्याने हलक्या हाताने घासून साफ करा. काही वेळ ठेवून नंतर कोरडे मऊ कापड वापरून बोर्ड स्वच्छ करा. टूथपेस्टमुळे गंजलेले आणि पिवळसर झालेले भाग स्वच्छ होतात आणि बोर्ड चमकदार दिसतो.
नेल पेंट रिमूव्हरच्या मदतीने करा साफ
जर स्विच बोर्ड अधिक चिकट किंवा दाट गंजलेला असेल, तर नेल पेंट रिमूव्हर हे एक प्रभावी उपाय आहे. कॉटनच्या साहाय्याने थोडा रिमूव्हर बोर्डावर लावा. काही मिनिटांनंतर, ओल्या कापडाने ते स्वच्छ पुसून टाका. हळूहळू स्विच बोर्डवरील काळेपणा आणि चिकटपणा नाहीसा होईल आणि ते नवीनसारखे दिसू लागेल.
या दोन सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या उपायांनी आपण आपल्या घरातील स्विच बोर्ड दिवाळीसाठी आकर्षक, स्वच्छ आणि चमकदार बनवू शकता. याशिवाय, स्वच्छ बोर्ड वापरल्यास घरात एक उत्साही आणि ताजेतवाने वातावरण तयार होते. या दिवाळीला केवळ घराची सजावट नव्हे, तर घरातील प्रत्येक छोट्या वस्तूंची स्वच्छता सुनिश्चित करा आणि घर नव्यासारखे चमकवा.