Diwali cleaning hacks: दिवाळीचा सण जवळ येत आहे आणि घरात या सणाची तयारी जोरात सुरू आहे. दिवे लावणे, रांगोळी, मिठाई यांमुळे घरातील वातावरण उत्साह आणि आनंदाने भरून जाते. त्या आनंदात लोक घराची स्वच्छता अन् रंगरंगोटी यांद्वारे घर सुशोभित करण्याचा प्रयत्न करतात. घराच्या कोपऱ्यापासून फर्निचर, भांडी, खिडक्या सगळं स्वच्छ करून, या सणाची तयारी केली जाते. पण, या तयारीत एका गोष्टीकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि ते म्हणजे पूजेची भांडी. विशेषतः तांब्याची आणि पितळेची भांडी, जी पूजा आणि धार्मिक विधींमध्ये वापरली जातात. नेहमीच्या वातावरणाचा परिणाम होत राहिल्याने ती काळसर होणे किंवा गंजणे सहज शक्य असते.

या काळेपणामुळे केवळ भांडी वाया जातातच, असे नाही, तर दिवाळीच्या सणाची भव्यता आणि आनंदही कमी होतो. मात्र, काळजी करू नका… काही साध्या घरगुती उपायांनी तुम्ही या भांड्यांना काही मिनिटांत नव्यासारखे चमकवू शकता. अशा उपायांनी नुसतेच भांडेच स्वच्छ होत नाही, तर घराला एक ताजेतवाने आणि आकर्षक स्वरूपदेखील मिळते, ज्यामुळे सणाच्या मजेसह उत्साहही द्विगुणित होतो.

१. तुरटी आणि लिंबाचा वापर
तांबे आणि पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुरटी आणि लिंबू वापरणे हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे. प्रथम एका भांड्यात लिंबाचा रस घ्या आणि त्यात तुरटी पावडर मिसळा. नंतर या मिश्रणाने भांडी हळुवारपणे स्वच्छ करा. त्यामुळे भांड्यांवरील काळा थर स्वच्छ करणे सोपे होते आणि भांडी चमकतात.

२. पिठाचा उपयोग
तुम्ही पीठ वापरून ही भांडीदेखील स्वच्छ करू शकता. मीठ व व्हिनेगरमध्ये मिसळून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट भांड्यावर लावा आणि हातांनी हळुवारपणे घासून घ्या. काही काळानंत, साचलेली घाण सहजपणे निघून जाते आणि भांडी स्वच्छ होतात.

३. लिंबू व मीठ
लिंबू आणि मीठ वापरणे हा आणखी एक सोपा उपाय आहे. एका लिंबाचे दोन तुकडे करा आणि त्यावर थोडे मीठ शिंपडा. आता या लिंबूने भांडी घासून घ्या. काही मिनिटांतच भांड्यांवरील काळा थर निघून जाईल आणि भांडी चमकदार दिसतील.

४. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा
जास्त गंजलेले किंवा काळे झालेले भांडे स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा उपयुक्त आहे. एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे व्हिनेगर मिसळून पेस्ट बनवा. त्यामध्ये थोडे पाणी मिसळा आणि तयार केलेली पेस्ट भांड्यांवर लावा. १० मिनिटे तसेच ठेवून, नंतर डिश वॉशने स्वच्छ करा.

दिवाळीपूर्वी जर तुम्ही हे घरगुती उपाय केले, तर तुमची पूजेची भांडी स्वच्छ आणि चमकदार दिसतील. या सोप्या उपायांनी भांड्यांवरी काळा थर सहजपणे निघून जातो आणि भांडी नव्यासारखी चमकू लागतात. म्हणूनच दिवाळीच्या तयारीसाठी भांडी स्वच्छ करणे ही एक महत्त्वाची, पण सोपी गोष्ट आहे.