पालक होणं हे कधीही सोपं काम नाही. मुलं लहान असली तरी त्यांचा स्वभाव, इच्छा व भावना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. काही मुलं सहजपणे आपण सांगितलेल्या गोष्टी ऐकतात; तर काही मुलं हट्टी स्वभावाची असतात. अशा मुलांना हाताळताना पालकांना खूप संयम, समजूतदारपणा ठेवावा लागतो आणि त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते.
विशेषत: संयुक्त कुटुंबात, पालकत्वाची जबाबदारी आणखी वाढते. एकाच घरात अनेक मतं, नियम व परंपरा असतात, ज्यामुळे मुलांच्या वागण्यावर त्यांच्या पालकांचा मोठा प्रभाव पडतो. त्याशिवाय समाजाचा दबाव, शाळा, मित्र-मैत्रिणींचा प्रभाव या सगळ्या बाबींचा मुलांच्या स्वभावावर चांगला-वाईट परिणाम होत असतो.
हट्टी मुलं फक्त आव्हानच निर्माण करत नाहीत. त्यांच्या हट्टी स्वभावाला जर योग्य मार्गाने हाताळलं गेलं, तर तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक मजबूत आणि सकारात्मक गुण बनू शकतो. जर पालकांनी संयम ठेवून, मुलांच्या भावना समजून घेऊन, योग्य पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधला, तर मुलांचा हट्टीपणा त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देऊ शकतो. त्यामध्ये छोटे छोटे उपाय, कौतुक आणि प्रेमाने वेळोवेळी दिलेली शिकवण खूप उपयुक्त ठरते. हट्टी मुलांसोबत पालकत्व एक शिकण्याची प्रक्रिया बनते, जिथे पालक आणि मुलं दोघेही एकमेकांकडून शिकतात.
१. हट्टीपणाची मूळ कारणे समजून घ्या
मुले अनेकदा हट्टीपणे वागतात. कारण- त्यांना काहीतरी बोलायचे असते किंवा त्यांचे मत सिद्ध करायचे असते. उदाहरणार्थं- जर तुमच्या मुलाला गृहपाठ करायची इच्छा नसेल, तर त्यांच्यावर जबरदस्ती न करता, त्यांना विचारा, “आज शाळेनंतर तुला खूप थकवा आला आहे का?” अशा प्रकारे त्यांचं ऐकून घेऊन, त्यांना समजून घेण्यामुळे त्यांचा तणाव कमी होतो आणि त्यांच्यातील सहकार्य भावनेत वाढ होते. अनेक वेळा मुलांचे वेळापत्रक खूप व्यग्र असते, ज्यामुळे त्यांच्या मनावर ताण येतो आणि त्याची परिणती हट्टीपणात होते.
२. तुमचा अधिकार महत्त्वाच्या गोष्टींत वापरा
मुलं कधी कधी वेगळ्या कपड्यांमध्ये कार्यक्रमात जाण्याची इच्छा व्यक्त करतात. अशा परिस्थितीत त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची संधी द्या आणि तुमचा अधिकार फक्त महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरा. छोट्या छोट्या गोष्टींत त्यांच्या मतांचा आदर केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि विरोध करण्याची वृत्ती कमी होते.
३. आदराने आणि प्रेमाने संवाद साधा
मुलांशी बोलताना फक्त हे कर किंवा ते कर, असे आदेश देण्याऐवजी त्यांना कारण समजावून सांगा. उदाहरणार्थ, फक्त भाजी खा न म्हणता, भाजी खाल्ल्यास तुला ताकद येईल आणि मोठं होण्यास मदत होईल, असे सांगा. तसेच, जेवण बनविताना मुलांना समाविष्ट करून घेतल्यास त्यांना वाटतं की, ते निर्णयात सहभागी झाले आहेत. जेव्हा मुलांना आदराने आणि प्रेमाने समजावलं जातं, तेव्हा ते जास्त सहकार्य करतात आणि त्यांचा हट्ट कमी होतो.
४. शांत राहा आणि संयम ठेवा
जर मुलांचं अभ्यास करण्यात मन लागत नसेल, तर त्यांना रागावून किंवा जोर लावून, भाग पाडण्याऐवजी त्यांना शांतपणे सांगा- चला, आधी १५ मिनिट खेळू आणि मग एकत्र अभ्यास करूया. पालक जेव्हा संयम ठेवतात आणि शांत राहतात, तेव्हा मुलांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होतो आणि ते सहकार्य करण्यास तयार होतात.
५. त्यांच्या यशाचे कौतुक करा
मुलांच्या चुका दाखवण्याऐवजी त्यांच्या प्रयत्नांचे आणि यशाचे कौतुक करा. उदाहरणार्थ- मुलाने घरकाम केले असेल, तर म्हणा, तुझ्या मदतीमुळे घर खूप छान दिसतंय. तसेच, मुलांना लहानसहान भेटवस्तू किंवा त्यांना आवडणारी गोष्ट देऊन प्रोत्साहन द्या. त्यामुळे त्यांचे सकारात्मक वर्तन वाढते आणि ते तुम्हाला अधिक सहकार्य करतात.