Hibiscus Flower Face Pack: सौंदर्याची काळजी घेण्यासाठी हल्ली बाजारात असंख्य रसायनयुक्त क्रीम, सिरम, पावडर उपलब्ध आहेत. पण, त्यामधून अनेकदा अपेक्षित परिणाम मिळण्याऐवजी त्वचेवर दुष्परिणामच अधिक होतात. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांचे लक्ष नैसर्गिक उपायांकडे वळत आहे. आयुर्वेदातही सांगितल्याप्रमाणे आपल्या घरच्या बागेत फुलणारी काही झाडे ही केवळ सौंदर्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही चांगली असते.

त्यापैकीच एक महत्त्वाचे फूल म्हणजे जास्वंद. जास्वंद हे फूल प्रामुख्याने पूजेसाठी वापरले जाते;पण याच फुलामध्ये त्वचेसाठी गुणकारी घटक लपलेले आहेत हे अनेकांना ठाऊक नसते. सौंदर्यतज्ज्ञांच्या मते, जास्वंदामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतात. हे घटक त्वचेतील कोलॅजनची पातळी वाढवून त्वचेला घट्टपणा, नैसर्गिक चमक व मऊपणा देतात. नियमित वापर केल्यास रसायनयुक्त उत्पादनांपेक्षा हे फूल अधिक परिणामकारक ठरते.

जास्वंदाचे फायदे

  • १. त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो.
  • २. सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
  • ३. चेहऱ्यावरील डाग, काळपटपणा व मुरमे कमी होतात.
  • ४. मृत त्वचा सहज निघून जाते
  • ५. त्वचा उजळ व तजेलदार दिसते

१. जास्वंद आणि मधाचा फेस पॅक

ज्यांची त्वचा सतत कोरडी आणि खरखरीत होते, त्यांच्यासाठी जास्वंद आणि मधाचा फेस पॅक उत्तम ठरतो. जास्वंदाच्या फुलामधील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषण देतात आणि मधामधील मॉइश्चरायझिंग घटक त्वचेतील हायड्रेशन टिकवून ठेवतात.

हा पॅक बनविण्यासाठी जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या आणि पानं बारीक वाटून घ्या. या पेस्टमध्ये एक चमचा शुद्ध मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावा आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. या पॅकमुळे त्वचेला हायड्रेशन मिळते आणि चेहरा मऊसर दिसतो. नियमित वापरामुळे त्वचेवरील कोरडे डाग आणि तेलकटपणा दूर होतो.

२. जास्वंद आणि दह्याचा फेस पॅक

चेहऱ्यावर सतत धूळ, प्रदूषण व तेलकटपणा साचल्यामुळे मृत त्वचेचे प्रमाण वाढते. अशा वेळी जास्वंद आणि दह्याचा पॅक खूप उपयोगी ठरतो. दह्यामधील लॅक्टिक अॅसिड त्वचेचे सौम्य एक्सफोलिएशन करते आणि जास्वंदातील व्हिटॅमिन सी त्वचेला नवचैतन्य देते.

हा पॅक बनवण्यासाठी जास्वंदाची पेस्ट करून, त्यात एक चमचा दही घाला. मग ते मिश्रण व्यवस्थित एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावा आणि १०-१५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा. या फेस पॅकने चेहरा नैसर्गिकरीत्या उजळतो. आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरल्यास त्वचा नेहमी तजेलदार दिसून, तिला आरोग्यदायिता प्राप्त होते.

३. जास्वंद आणि बेसनाचा फेस पॅक

मुरमे, त्वचेवरील डाग किंवा उन्हामुळे आलेला काळपटपणा यांसाठी जास्वंद आणि बेसनाचा फेस पॅक सर्वोत्तम मानला जातो. बेसन हे नैसर्गिक क्लिंजर असून, ते त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते. त्याचबरोबर जास्वंदातील अँटिऑक्सिडंट्स मुरमांची समस्या कमी करून, त्वचेवर एकसारखी चमक आणतात.

हा पॅक बनवण्यासाठी जास्वंदाची पाने व पाकळ्या वाटून घ्या आणि त्यात दोन चमचे बेसन मिसळा. थोडेसे गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. ती चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावा. हा पॅक वापरल्याने चेहऱ्यावरचा थकवा दूर होतो आणि त्वचा अधिक स्वच्छ व तजेलदार दिसते.