प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp विरोधात सोशल मीडियामध्ये मोहिम सुरू आहे. गोपनीयता भंग होत असल्याने अनेक युजर्स व्हॉट्सअ‍ॅपला रामराम ठोकून सिग्नल आणि टेलिग्राम यांसारख्या अन्य अ‍ॅप्सकडे वळलेत. जगभरातून व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीला होत असलेला विरोध सिग्नल अ‍ॅपच्या मात्र चांगलाच पथ्यावर पडला आहे.

सिग्नल अ‍ॅपच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली असून अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सिग्नल अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅपवरही मात केली आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सच्या यादीत सिग्नल अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकून भारतातील अव्वल फ्री अ‍ॅप बनल्याची माहिती सिग्नल अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलीये. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपसोडून सिग्नल अ‍ॅपवर गेलेल्या युजर्सना मात्र आपला व्हॉट्सअ‍ॅपचा डेटा कसा ट्रान्सफर करायचा हा प्रश्न सतावतोय. जर तुम्हालाही WhatsApp चे ग्रुप चॅट्स Signal अ‍ॅपवर ट्रान्सफर करायचे असतील तर काय करायचं हे जाणून घेऊया :

– सर्वात पहिले गुगल प्ले-स्टोअरवरुन Signal अ‍ॅप डाउनलोड करुन इंस्टॉल करा
– नंतर Signal वर एक ग्रुप क्रिएट करा, यात किमान एका व्यक्तीला अ‍ॅड करा
– नंतर Signal च्या ग्रुप सेटिंग्समध्ये जाऊन Group link पर्यायावर टॅप करा
– यानंतर ग्रुप लिंकवर टॉगल ऑन करुन Share पर्यायावर टॅप करा. तुम्हाला एक ग्रुप लिंक येईल.
– आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चॅट ओपन करा आणि ग्रुप लिंक पेस्ट करा

आणखी वाचा- WhatsApp ला झटका, भारतातील टॉप फ्री अ‍ॅप बनलं Signal; काय आहे खासियत?

दरम्यान,पेस्ट केलेल्या लिंकला अ‍ॅक्सेस करणारा कोणताही युजर अ‍ॅडमिनच्या परवानगीनंतरच Signal ग्रुपमध्ये चॅटिंग करु शकतो आणि अ‍ॅडमिन कधीही लिंक बंदही करु शकतो अशी माहिती सिग्नलने ट्विटरद्वारे दिली आहे.