How to remove darkness on skin: सौंदर्याची काळजी घ्यायची म्हणजे ती फक्त चेहऱ्याची घ्यायची, असा आपला समज असतो. त्यामुळेच शरीराच्या इतर भागांना जो काळजीचा स्पर्श हवा असतो, तो मिळत नाही. त्याचा परिणाम मग दिसू लागतो. आपल्या हाताचे कोपरे आणि गुडघे बघितले की, काळवंडलेली अवस्था बघून यावर काय उपाय करायचा, असा प्रश्न पडतो. अनेक वेळा धूळ, माती, घाम, टॅनिंग किंवा नीट साफसफाई न केल्याने गुडघे, कोपरे आणि घोट्यांचा रंग काळासर दिसू लागतो. त्यामुळे कपडे घालताना किंवा लोकांमध्ये बसताना लोकांना लाज वाटते. अशा वेळी महागड्या क्रीमएवजी स्वयंपाकघरात असणाऱ्या काही गोष्टींनी हा प्रश्न सहज दूर होईल.
बर्याच वेळा आपण चेहऱ्याची काळजी घेण्याकडे लक्ष देतो; पण हात, पाय, गुडघे, कोपर किंवा टाच याकडे दुर्लक्ष केलं जातं. काही लोकांचे हात-पाय स्वच्छ दिसतात; पण गुडघे, कोपरे किंवा टाचा मात्र काळसर दिसतात. हा काळसरपणा दिसायला जरी छोटासा वाटला, तरी तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम करू शकतो. त्यामुळे अनेकदा आवडते कपडे घालताना किंवा बाहेर पडताना संकोच वाटतो. या भागांवरचा काळेपणा कमी होण्याएवजी जास्त वाढत जातो. उन्हाळ्यात घाम जास्त येणं, त्वचेवर मृत पेशी साचणं किंवा ओलसरपणा यांमुळे हे डाग अधिक दिसू लागतात. हा काळेपणा कमी करण्यासाठी घरच्या घरी सोपे उपाय करता येतात. टोमॅटो वापरून बनवलेला डी-टॅन पॅक यासाठी उपयोगी ठरतो. त्याचा नियमित वापरामुळे टॅनिंग कमी होतं आणि काही दिवसांत त्वचा उजळ व मऊसर दिसू लागते.
टोमॅटोपासून डी-टॅन पॅक बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
- टोमॅटो
- कॉफी
- तांदळाचे पीठ
- दही
- लिंबू
पॅक बनवण्याची पद्धत
- टोमॅटो कापून त्याचा पल्प तयार करा. नंतर त्यात कमी प्रमाणात कॉफी टाका आणि त्याचबरोबर तांदळाच पीठ टाकून एकत्र मिसळा.
- नंतर त्यामध्ये दही आणि लिंबाचा रस टाका. आता या सर्व गोष्टी नीट मिसळून घ्या. मग तयार झालेली पेस्ट जिथे काळपटपणा दिसतो, त्या भागावर लावा.
- १० ते १५ मिनिटं ती तशीच राहू द्या. नंतर गुलाबपाण्यानं स्क्रब करा. कपड्यानं हलकेच पुसा आणि मग साध्या पाण्यानं धुवा.
फायदे
हा पॅक त्वचेला ताजेपणा देतो. कारण- टोमॅटोमध्ये फ्लेवोनॉइड्स व पेक्टिन असतात, ज्या मृत पेशी काढून टाकतात आणि त्वचेचा पोत सुधारतात. त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेची स्वच्छता करतात. त्याशिवाय टोमॅटोमध्ये असलेलं व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन हे घटक त्वचेला हानिकारक रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि चेहरा उजळ व निरोगी दिसायला मदत करतात.