Urine Leakage: लघवीशी संबंधित कोणतीही समस्या खूप त्रासदायक ठरू शकते. चुकीचा आहार, पाण्याची कमतरता व बिघडलेला दिनक्रम यांमुळे युरिनरी सिस्टीमवर परिणाम होतो. लघवीच्या समस्यांमध्ये वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे, दुखणे किंवा लघवी झाल्यानंतरही थेंब थेंब मूत्र पडत राहणे अशा गोष्टी घडतात. अशा बहुतेक समस्या जीवाणूंमुळे होतात, ज्याला UTI (Urinary Tract Infection) म्हणतात. वेळेवर लक्ष न दिल्यास UTI चा संसर्ग वाढून दुखणे, ताप येणे किंवा संसर्ग मूत्रपिंडापर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला लक्षणे दिसताच उपचार आणि घरगुती काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

वारंवार लघवी लागणे, लघवीनंतरही पुन्हा लघवी होईल, असे वाटणे हे जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गाचे लक्षण असू शकते. लघवीशी संबंधित या समस्या मूत्रमार्ग संसर्ग, पुरुषस्थ ग्रंथी वाढणे, अतिक्रियाशील मूत्राशय, कमी पाणी पिणे, जास्त कडक चहा-कॉफी घेणे, मधुमेह, लैंगिक संपर्कातून होणारा संसर्ग (Sexually Transmitted Infection) आणि मूत्रमार्गात सूज येणे यांमुळे होऊ शकतात.

मूत्राशी संबंधित बहुतेक त्रास तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने कमी करू शकता. युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉ. अनिल शर्मा सांगतात की, जर तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल किंवा लघवी झाल्यानंतरही पुन्हा लघवीची इच्छा होत असेल, तर त्यासाठी एका साध्या वनस्पतीचा वापर करून उपचार करता येतो. कबाब चीनी नावाची ही वनस्पती शीतल चीनी म्हणूनही ओळखली जाते आणि ती सहज मिळते. कबाब चीनीमध्ये साखर मिसळून घेतल्यास तुम्हाला अधूनमधून लघवी होण्याच्या समस्येपासून आराम मिळेल. चला तर मग, जाणून घेऊ या की, हे पदार्थ लघवीच्या लिकेजची समस्या कशी सुधारतात.

कबाब चीनी लघवीच्या त्रासावर कशी उपयोगी?

कबाब चीनी ही एक अशी औषधी वनस्पती आहे, ज्याचा वापर आयुर्वेद आणि युनानी उपचार पद्धतीत केला जातो. ही वनस्पती एका मसालेदार बेरीसारखे असते, दिसायला गोल मिरीसारखे; पण त्याला मागे एक छोटा देठ असतो. त्याची चव थोडी कडू व तिखट असते. त्याचे सेवन केल्याने खोकला-कफ कमी होतो, श्वासाची दुर्गंधी कमी होते आणि पचनाशी संबंधित त्रास जसे गॅस, अपचन व अॅसिडिटी यापासून आराम मिळतो. हे हर्ब लघवीच्या त्रासांसाठीही खूप उपयुक्त आहे. व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गात हे फायदेशीर ठरते. कबाब चीनीमध्ये औषधी गुणधर्म भरपूर असल्यामुळे ते UTI, गॅस आणि इन्फेक्शन नियंत्रित करण्यात मदत करते.

थेंब थेंब लघवी येणे, वारंवार लघवी लागणे, जळजळ होणे किंवा मूत्रमार्ग संसर्गामध्ये कबाब चीनी एक उपयुक्त आयुर्वेदिक औषधी वनस्पती मानली जाते. तिचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास सूज कमी होते, इन्फेक्शन शांत होते आणि लघवीचा प्रवाह सुधारतो.

लघवीशी संबंधित समस्या जसे

  • वारंवार लघवी होणे
  • लघवी झाल्यानंतरही थेंब थेंब मूत्र पडत राहणे
  • लघवी करताना जळजळ होणे

या त्रासांमध्ये कबाब चीनी फायदेशीर ठरते. कबाब चीनीमध्ये असलेले नैसर्गिक अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म युरिनरी ट्रॅक्टमधील सूज कमी करतात आणि संसर्ग कमी करतात.

कबाब चीनी कशी घ्यावी?

या त्रासासाठी कबाब चीनी घेण्याचा सर्वांत सोपा आणि परिणामकारक उपाय असा आहे – १ ग्रॅम कबाब चीनी पावडर + २ ग्रॅम मिश्री पावडर (स्फटिकरूपी साखर) एकत्र करून हे मिश्रण दिवसातून दोन वेळा कोमट पाण्यासोबत घ्यावे. ते साधारण पाव चमचा एवढेच घ्यावे. त्याच्या सेवनामुळे जळजळ, वारंवार लघवी लागणे आणि मूत्रमार्ग संसर्गाची लक्षणे लवकर कमी होतात. तुम्ही या वनस्पतीचे एक-दोन दाणे सकाळी रिकाम्या पोटी चावून खाऊ शकता किंवा चार-पाच दाण्यांचा हलकासा काढा करून पिऊ शकता. त्यामुळे लघवीचा प्रवाह सुधारतो आणि नलिकेतील सूज कमी होते. नियमित सेवनाने दोन ते पाच दिवसांत आराम जाणवू लागतो.