Impact Of Sleep On HHeart Health: निरोगी शरीर आणि ऊजेचे संतुलन राखण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. परंतु, हल्लीच्या धावपळीच्या काळात अनेक जण आवश्यक तेवढी पुरेशी झोप घेत नाहीत. सुरुवातीला अपूर्ण झोपेचा आपल्या आरोग्यावर काहीही परिणाम जाणवत नाही; परंतु हळूहळू त्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात. विज्ञानावरूनही सिद्ध होते की, झोप ही एक जैविक गरज आहे. जर शरीराला योग्य रीत्या विश्रांती घेऊ दिली नाही, तर त्याचे परिणाम थकवा किंवा चिडचिडेपणाच्या पलीकडे जातात. दीर्घकालीन झोपेचा अभाव, सात तासांपेक्षा कमी झोपणे हे आता कर्करोग आणि हृदयरोग यांसारख्या जीवघेण्या आजारांशी जोडले जात आहे.

शरीर आणि झोपेचा संबंध

रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा झोपेदरम्यान तुमचे शरीर पेशी दुरुस्ती, संप्रेरक संतुलन व रोगप्रतिकार संरक्षण ही कार्ये करते. जेव्हा हे विस्कळित होते, तेव्हा पेशी नुकसानदायक ठरू शकतात. त्यामुळे शरीरात जळजळ वाढते आणि मग रोगप्रतिकार शक्ती रोगग्रस्त पेशी ओळखून नष्ट करू शकत नाही. ही बिघडलेली दुरुस्ती यंत्रणा हेच एक कारण आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांनी कमी झोपेचा कर्करोगाच्या वाढीव जोखमीशी संबंध जोडला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या कार्डिओलॉजी रिव्ह्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या अशाच एका अभ्यासात असे म्हटले आहे की, झोपेची कमतरता ही सार्वजनिक आरोग्याची वाढती चिंता आहे आणि झोपेची कमतरता आता उच्च रक्तदाब, कोरोनरी हृदयरोग व मधुमेहाशी जोडली गेली आहे.

परदेशातील जे लोक रात्री फक्त ६.८ तास झोपतात, त्यांना कोरोनरी हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचा धोका असतो.

या अभ्यासात झोपेचा कालावधी आणि मृत्युदर यांच्यातील U आकाराच्या संबंधांवर लक्ष केंद्रित केले गेले, म्हणजेच झोपेच्या खूप कमी किंवा जास्त अशा दोन्ही बाबींमुळे मृत्यूचा धोका वाढू शकतो. या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की, जे लोक ६-७ तासांपेक्षा कमी झोपतात, ते अनेक गंभीर समस्यांना सामोरे जाऊ शकतात.

  • उच्च रक्तदाब
  • हृदयरोग
  • मधुमेह
  • कर्करोग आणि
  • लवकर मृत्यू

कर्करोगाचा संबंध

अभ्यासातून असे आढळून आले आहे की, कमी झोपेमुळे मेलाटोनिनचे उत्पादन बदलते. मेलाटोनिन हे केवळ झोपेचे संप्रेरक नाही, ते तर एक मजबूत अँटिऑक्सिडंटदेखील आहे, जे ट्यूमरच्या वाढीला कमी करते. त्याची कमतरता पेशींमध्ये उत्परिवर्तनांना गती देऊ शकते आणि कर्करोगाच्या बदलांपासून शरीराच्या नैसर्गिक संरक्षणास धोका निर्माण करू शकते. अभ्यासातून असे आढळून आले आहे की, जे लोक सामान्यतः सात तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांच्यामध्ये स्तन, प्रोस्टेट व कोलोरेक्टल कर्करोगाचे उच्च दर ओळखले जाऊ शकतात. शिफ्टमध्ये काम करणारे लोक त्यांच्या झोपेच्या चक्रात सतत व्यत्यय आल्यामुळे असुरक्षित असतात; परंतु कर्करोगाची वाढ आणि झोप यांचाही आणखी एक संबंध आहे.

एका अभ्यासात प्रकाशित झालेल्या ४५+ वयोगटातील १४,८०० हून अधिक लोकांचा डेटा विश्लेषित केला गेला आणि सरासरी ६.९ वर्षे त्यांचे अनुसरण केले गेले. कर्करोगाच्या घटनांशी संबंधित त्यांची रात्रीची झोप, दिवसाची झोप आणि एकूण झोपेचा कालावधी यांचे मूल्यांकन करण्यासाठी :

रात्री सहा तासांपेक्षा कमी झोप : कर्करोगाचा धोका ४१% वाढवतो

दिवसा झोप न घेणे : कर्करोगाचा धोका ६०% वाढवतो

एकूण सात तासांपेक्षा कमी (दिवसा + रात्रीची झोप) : कर्करोगाचा धोका ६९% जास्त

कमी झोपेमुळे कर्करोगाचा धोका कसा वाढतो?

शरीरात मेलाटोनिनची पातळी कमी : मेलाटोनिन शरीराच्या अंतर्गत घड्याळाचे नियमन करते आणि त्यात कर्करोगविरोधी गुणधर्म असतात.

रोगप्रतिकार शक्ती कमी होणे : झोप रोगप्रतिकार शक्तीला कर्करोगाच्या पेशी शोधण्यास आणि नष्ट करण्यास मदत करते.

सर्केडियन लय व्यत्यय : शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात येणारे अडथळे हार्मोनल संतुलन बदलू शकतात आणि ट्यूमरच्या वाढीस चालना देऊ शकतात.

कमी झोपेचा हृदयावर प्रभाव

जेव्हा झोपेचा वेळ कमी केला जातो तेव्हा रक्तदाब जास्त काळ वाढलेला राहतो. त्यामुळे धमन्यांवर ताण येतो, जळजळ वाढते व प्लेक जमा होण्यास गती मिळते. शेवटी या सर्वांमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. कमी झोपेमुळे ग्लुकोज चयापचयातदेखील व्यत्यय येतो आणि कॉर्टिसोलसारखे ताण संप्रेरक वाढतात, ज्यामुळे हृदय आणि रक्तवहिन्यासंबंधीच्या प्रणालीवर परिणाम होतात. युरोपियन हार्ट जर्नलसारख्या जर्नल्समधील अहवाल वेळोवेळी दर्शवितात की, कमी झोपेचा वेळ आणि वाढत्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या मृत्युदरात महत्त्वपूर्ण संबंध आहे.

हृदयरोग आणि कर्करोग हे एक सामान्य कारण : दीर्घकालीन सूज. झोपेचा अभाव शरीरातील दाहक रसायनांचे प्रमाण दुप्पट करतो, ज्यामुळे रोगाच्या प्रगतीसाठी सुपीक जमीन मिळते. जर कोलन, धमन्या आणि रोगप्रतिकार शक्तीवर दाहक अक्षाने सतत दबाव आणला, तर आनुवंशिक दुखापत, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणि अवयव निकामी होण्याची शक्यता १० पट वाढते.

झोपेच्या चांगल्या सवयी निर्माण करणे

चांगली बातमी अशी आहे की, झोपेचे आरोग्य तुमच्या हातात आहे. रात्री सात ते नऊ तास चांगली झोप घेणे ही प्रतिबंधात्मक उपायांपैकी एक आहे. झोपण्याची ठरावीक वेळ पाळणे, दुपारनंतर कॅफिन न पिणे, अंधारात आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करणे, असे किरकोळ बदल केल्याने झोपेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारू शकते. झोप म्हणजे वेळ वाया घालवणे नाही, ती तुमच्या शरीराच्या आजारांपासून बचाव करण्याची पहिली पायरी आहे. ती वगळल्याने, तुम्ही नकळत स्वतःला कर्करोग आणि हृदयरोगांना बळी पडता; जे अन्यथा टाळता येऊ शकतात. झोपेचा विचार दीर्घ आयुष्यासाठी एक औषध म्हणून करा.