प्रसाद निक्ते – response.lokprabha@expressindia.com
एखादं रम्य ठिकाण बघायला घराबाहेर पडणारे सगळेच असतात. पण फक्त खाण्यासाठी ठाण्याहून इंदूपर्यंतचा प्रवास करणारे माहीत आहेत?
आतापर्यंत घरच्यांबरोबर भारतभर भरपूर फिरलो. गाडी नव्हती तेव्हा ट्रेनने किंवा कधी विमानाने. त्यानंतर यथेच्छ गाडीने. अगदी कन्याकुमारीपर्यंत जाऊन आलो, खान्देश-विदर्भातला आधी न पाहिलेला महाराष्ट्र पाहिला. मध्य प्रदेशात थोडं फिरलो. पण अर्थातच या सगळ्या ट्रिप्स ती ठिकाणं आणि तिथल्या गोष्टी पाहण्यासाठी. कधी कुर्ग-मुन्नारसारख्या डोंगरभागातली जंगलं, कधी समुद्रकिनारे, कधी भीमबेटकाच्या हजारो वर्षांपूर्वीची भित्तिचित्र असलेल्या गुहा, तर कधी बदामी-गुलबग्र्यातल्या थक्क करायला लावणाऱ्या वास्तू. पण ठिकाण कुठलं का असेना, पाहण्यासाठी फिरणं हाच सामायिक हेतू. गेल्या जानेवारीत मात्र पाहणं बाजूला ठेवून निव्वळ खाण्यासाठी एक सहल केली, अर्थातच इंदूरला.
झालं असं की, अडीच-तीन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात गाडीने फिरायला गेलो होतो. इंदूर, ओंकारेश्वर, भीमबेटका, पंचमढी अशी पर्यटनाची ठिकाणं. शेवटचा मुक्काम इंदूरला होता. जाण्यापूर्वी तिथल्या सराफा बाजारच्या खाऊगल्लीविषयी ऐकलेलं होतं. पोहोचलो त्या दिवशी माझं पोट थोडंसं गडबडलं होतं. त्यामुळे बायको आणि मुलगी दोघीच तिथल्या छप्पन-दुकानच्या खाऊगल्लीला भेट देऊन आल्या होत्या. मग दुसऱ्या दिवशी तिघेही सराफा बाजारात जाऊन हादडून आलो. आतापर्यंत मुन्नारसारखं एखादं ठिकाण खूप आवडलं की ‘पुन्हा कधीतरी इथे यायचं’ असं परतण्यापूर्वी तिघेही ठरवायचो. पण पाहण्यासाठी म्हणून पुन्हा त्याच ठिकाणी अजूनपर्यंत तरी कुठे गेलो नाही. ‘सराफा बाजारला हादडण्यासाठी पुन्हा यायचं हां’ असं आम्ही मागच्यावेळी ठरवलं आणि गम्मत म्हणजे तीनच वर्षांत ते अमलातही आणलं.
या वर्षी जानेवारीत नवी गाडी घेतली. ती घेऊन कुठे तरी लांब जाऊन येऊया असं घरी आमचं बोलणं चाललं होतं. हाताशी दिवस मात्र चारच होते. मग लांबच्या अंतराची चारच दिवसांची ट्रिप कुठे करावी यावर खल चालू असताना अचानक इंदूरच्या खादाडीची आठवण झाली. एकदम परफेक्ट! शहर पाहिलेलं होतं. त्यामुळे काही न पाहता परत आलो याचं वाईट वाटायचं कारण नव्हतं. हॉटेलही माहितीचं होतं. त्यामुळे तीही शोधाशोध करायची गरज नव्हती. मुख्य अजेंडा खाणं हाच. त्यातही बायको आणि मुलीचं म्हणणं असं पडलं की, सराफा बाजारापुढे छप्पन-दुकानची खाऊगल्ली फारशी विशेष नाही. त्यामुळे उद्दिष्ट आणखी केंद्रित झालं. मग ठरलं! दोन रात्रीचा इंदूरमध्ये निवास. कुठेही भटकायचं नाही. दिवसा हॉटेलवर आराम, रात्री सराफा बाजारात खादाडी. ही इंदूरवारी निव्वळ खाण्यासाठी.
इंदूर शहर मला आधीही आवडलं होतं. यावेळी तर भारतातलं सर्वात स्वच्छ शहर असा देशभरातल्या सव्र्हेचा निकाल होता. आणि ते जाणवतही होतं. अगदी सराफा बाजारातही. इंदूर आवडण्यासाठी माझं अजून एक कारण. माझे वडील अहमदाबाद शहरात लहानाचे मोठे झाले. आम्ही मुलं ठाण्याला वाढलो असलो तरी दोघे काका गुजरातेतच. त्यामुळे लहानपणी अनेकदा अनेक दिवस अहमदाबादला राहिलेलो. तिथल्या जुन्या शहरातल्या बोळांमधून भरपूर फिरलेलो. का कुणास ठाऊक, मला इंदूरमध्ये नेहमी अहमदाबादची आठवण येते. आणि सराफा बाजारात तर विशेष, कारण अहमदाबादला जुन्या स्टॉक मार्केटच्या माणिकचौकमध्येही असाच रात्रीचा खादाडीचा बाजार भरतो.
इंदूरचा सराफा बाजार ही खरंच सराफांची पेठ आहे. एकमेकांना लागून असलेली सराफांची लहान-मोठी दुकानं. दिवसा इथे दागिन्यांची विक्री होत असते. आठच्या आधी खायला म्हणून तिथे गेलं तर काहीच विशेष दिसणार नाही. जी चाट किंवा मिठाईची दुकानं आहेत तेवढीच काय ती खादाडीची ठिकाणं दिसतील. किंवा एखाद दोन ठेले. पण आठ वाजले की सराफा बाजाराचा नूर बदलून जातो. सराफांची दुकानं बंद व्हायला लागतात. आणि मग त्यांच्या पुढय़ात ठेले लागायला लागतात. इंदूरकरांची आणि तिथे फिरायला आलेल्यांची पावलं या दिशेनं पडायला लागतात. आणि पाहता पाहता तिथे खाद्योत्सव सुरू होतो. अगदी रोजच्या रोज.
मला तसे वेगवेगळे जिन्नस खायला आवडतात. पण तरी मी काही खवय्या नाही. अगदी ठाण्यातली खाण्याची अनेक ठिकाणंसुद्धा माझ्यानंतर ठाण्यात राहायला आलेल्या एका खवय्या मित्रानं सांगितल्यावर मला समजली. पण असं असूनही त्या सराफा बाजारातल्या वातावरणानेच मी अगदी भारून जातो. तिथला माहोलच काही वेगळा असतो. केवळ मस्त काहीतरी हादडण्यासाठी शेकडोंनी आलेली ती माणसं पाहून मला गम्मत वाटते. त्या भागातली दीड-दोनशे मीटर लांब असलेली मुख्य गल्ली माणसांनी फुलून गेलेली असते. हातात असलेल्या कुठल्यातरी पदार्थाचा आस्वाद घेणारी किंवा ‘आता यानंतर काय खाऊया बरं’ असा विचार करत ठेले बघत िहडणारी मंडळी पाहणं यातसुद्धा मजा असते. खाण्यावर उतरण्यापूर्वी मी १५-२० मिनिटं निव्वळ ते ठेले आणि त्यांची गिऱ्हाईकं पाहात त्या गल्लीत एक फेरी मारून आलो.
तिथे गेल्यावर पहिल्याच ठेल्यावर खायला सुरुवात करणं चुकीचं. कारण तिथे मिळणारे केवढे ते पदार्थाचे प्रकार. आणि आपल्या पोटाची थली तर मर्यादित आकाराची. त्यामुळे आधी सव्र्हे करायचा. कुठे कुठे काय आहे, कुठल्या प्रकाराने पटकन पोट भरेल, कुठल्याने नाही, कुठला पदार्थ चवीखातर भरल्या पोटातही ढकलू शकू आणि कुठला नाही या सगळ्याचा विचार करून मग एकत्र स्ट्रॅटेजी ठरवायची. पोट डब्ब करणारा पदार्थ असेल तर तो दोघांमध्ये किंवा तिघांमध्ये एकच घेऊन थोडा थोडा चाखायचा. नसेल तर प्रत्येकाने जमेल तेवढं हादडायचं. पण ते करताना एकत्र खायच्या पदार्थासाठी प्रत्येकाने भूक ठेवली पाहिजे. नाहीतर मग जास्त होणार असेल तर तो इतरांना खाता येणार नाही. अशा प्रकारे एकदा टेहळणी करून कोण कधी काय खाणार आहे ते ठरवायचं आणि मग त्या खाद्यसेनेवर तुटून पडायचं. योजलेले सगळे पदार्थ खायला पाहिजेत. मधेच हार मानून चालणार नाही. स्वत हिंमत ठेवायची. वाटल्यास चार पावलं चालून घ्यायचं. आणि एखादा गडी कच खात असेल तर त्याला धीर द्यायचा.
ही लढाई काही सोपी नाही. केवढे ते खाण्याचे प्रकार. काही ठेल्यांवर पोहे होते. साबुदाण्याची खिचडी होती. पण महाराष्ट्रातून तिथे गेलेल्यांना त्यांचं काय कौतुक! पाणीपुरीही आपल्याकडे मिळते. पण तिथली पाणीपुरी मात्र खास. प्रत्येक ठेल्यावर स्टीलच्या दहा-बारा बरण्या. त्यात वेगवेगळ्या स्वादांचं पाणी. आलं, मोहरी, लसूण, पुदिना, जिरं िलबू, हजमा-हजम, रेग्युलर असे वेगवेगळे स्वाद. एक प्लेट पाणीपुरी म्हटली की या प्रत्येक स्वादाची एक एक पुरी. आता एवढय़ा बरण्या म्हटल्यावर वाकून प्रत्येकी बरणीत पुरी बुडवून काढणं शक्य नाही, म्हणून डावानं पुरीत पाणी भरतात. आणि त्यासाठी डावाला एक भोक पाडलेले. एकेका ठेल्यावर दहादहा गिऱ्हाईकं चिकटलेली. नेमकी कुणाची कुठल्या स्वादाची फेरी चाललेली आहे याचा गोंधळच व्हायचा. पण पाणीपुरीवालेही हुशार. समजा आधी उभे असलेल्यांच्या आलं, मोहरी, लसूण या फेऱ्या झाल्या आहेत आणि त्या वेळी आपण तिथे उगवलो, तर आपली पहिली पुरी पुढल्या पुदिनापासून सुरू होणार. त्यापुढच्या सगळ्या झाल्या की मग आपल्याला आधीच्या आलं, मोहरी, लिंबू या राहिलेल्या फेऱ्या त्याच क्रमात मिळणार. अर्थात असं करूनही कुणाचं खाणं कुठल्या फेरीपासून सुरू झालं आहे ते लक्षात ठेवावं लागतंच. प्रत्येकाची शेवटची फेरी कुठली हे त्या पाणीपुरीवाल्याच्या डोक्यात पक्कं असतं.
तिथल्या खास पदार्थामध्ये एक होता तो म्हणजे गराडू. सुरणासारखा कंद. आधी उकडून ठेवलेला असतो. मग त्याचे छोटेछोटे पातळ काप करून तळतात. त्यावर चाट मसाला घालून गरमागरम खायचा. अतिशय स्वादिष्ट आणि महागही. एका लहान बोलएवढय़ा द्रोणाचे एक माप ४० रुपयांना. पण असतो मात्र अगदी रुचकर. दुसरं एक म्हणजे खोबऱ्याचे आणि बटलेवाले पॅटिस. बटलेवाले म्हणजे मटारवाले. काहीतरी खास चव. त्यावर तिखट आणि गोड चटण्या. आणि चाट मसाला. त्याला जिरावन म्हणतात. बहुतेक पदार्थावर तो घातलेला असतो. हे खोबऱ्याचे आणि मटारचे पॅटिस खूपच चमचमीत.
मग कचोऱ्या होत्या, लस्सी होती. तिथे जोशी नावाच्या माणसाचं एक दुकान फार प्रसिद्ध. त्यांच्याकडे हे प्रकार होते. आणि त्यांच्याकडचा दहीवडा खूप लोकप्रिय. पण एकतर लोकांची झुंबड एवढी की आता दंगल चालू होते की काय असं वाटावं. आणि दुसरं असं, की मी सुरुवातीच्या टेहळणीत कोपऱ्यावरच्या एका दुकानात गरमागरम गुलाबजाम आणि मूगडाळ हलवा हेरून ठेवला होता. त्यामुळे मग जोशींचं चक्रव्यूह भेदायच्या नादाला न लागता त्या मिठाईवाल्याकडे जाऊन गोडावर डल्ला मारला. याव्यतिरिक्त मुगाची भजी, भुट्टेका कीस, शिकंजी वगरे इतर अनेक प्रकार होते. पण सगळ्या धुमाळीत अधूनमधून दिसणाऱ्या चायनीज नूडल्सच्या गाडय़ा मात्र अगदीच विसंगत वाटत होत्या.
इंदूर शहर म्हणून जसं आवडलं तशी तिथली माणसंही वागाबोलायला छान वाटली. बोलण्यात नम्रता, आपुलकी. त्यांचं शुद्ध िहदी ऐकायला कानांनाही गोड वाटतं. स्वच्छ शहरांच्या यादीत पहिला नंबर लागल्याचे फलक रस्त्यांवर दिसत होते. पण त्याचा अभिमान आणि कौतुक लोकांमध्येही जाणवल्यासारखं वाटलं. कायद्याचा वचक हे कारण असेलच. पण सगळे ठेलेवाले आपणहूनही आलेल्या गिऱ्हाईकांना खाण्याच्या कागदी किंवा प्लॅस्टिकच्या ताटल्या रस्त्यावर न टाकता डब्यात टाकण्याची विनंती करत होते. अर्थातच त्यामुळे सगळीकडे स्वच्छ होतं आणि म्हणून खादाडीचा निखळ आनंद घेता येत होता.
आठ-साडेआठच्या सुमारास तिथे जाऊन दोन-एक तास त्या गल्लीत िहडत होतो. कितीही खाऊ म्हटलं तरी शेवटी पोटात ठासून ठासून किती ठासणार. मुक्त खादाडी करून तिघेही आहारलो. खादाडीचा समारोप पानाने केला. दहा वाजून गेले होते. आम्ही आमची चढाई आवरती घेतली असली तरी अजून नव्याने खवय्यांचे जत्थे तिथे येत होते. ठेलेवाल्यांची गडबड चालूच होती. रात्री अकरा-साडेअकरापर्यंत ती अशीच चालू राहणार होती. रात्रीच्या चार तासांचा सगळा खेळ. यातले अनेकजण दिवसा दुसरं काही काम करत असतील. आणि रात्री इथे आलेल्या गिऱ्हाईकांना आपले खास पदार्थ खिलवून तृप्त करून परत पाठवत असतील. जिभेचे लाड पुरवायला आलेली त्यांची ही गिऱ्हाईकं. काही इंदूरचेच, काही आसपासचे. काही फिरायला आलेले असताना खायला बाहेर पडलेले, तर काही आमच्यासारखे केवळ खाण्यासाठी म्हणून ६०० किलोमीटरची मजल करून आलेले. पण रात्री सगळे ‘चला मस्त काहीतरी खाऊया’ या एकाच विचाराने बाहेर पडलेले. मला तर वाटतं, रात्री आठ वाजल्यानंतर इंदुरातले सगळे रस्ते सराफा बाजाराकडेच जातात.
सौजन्य – लोकप्रभा