What To Eat Before Meals To Lose Weight : वजन कमी करण्याच्या बाबतीत, लोक सहसा जीवनशैलीत मोठे बदल करण्याच्या मागे धावतात आणि अगदी स्ट्रिक्ट डाएट करण्याचा विचार करतात. पण, कधीकधी जीवनशैलीतील लहान बदलांमुळे तुमच्या आरोग्यावर मोठा आणि चांगला परिणाम सुद्धा होऊ शकतो. एका न्यूरोसायंटिस्टचा सल्ला अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे; तर हा सल्ला म्हणजे जेवणापूर्वी मूठभर अक्रोड खाणे.
न्यूरोसायंटिस्ट रॉबर्ट डब्ल्यू. बी. लव्ह यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक कल्पना शेअर केली आहे; जी कदाचित सोपी वाटेल. पण, त्याचे काही आश्चर्यकारक आरोग्य फायदे सुद्धा असू शकतात. भूक कमी करण्यापासून ते वजन कमी करण्यास मदत करण्यापर्यंत जेवणापूर्वी लगेच मूठभर अक्रोड खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
रॉबर्ट डब्ल्यू. बी. लव्ह म्हणतात, जेवणाच्या आधी लगेच मूठभर अक्रोड खा. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होईल. यामुळे तुम्हाला भूक पण कमी लागेल आणि बोनस म्हणून तुमच्या मेंदूसाठी देखील उत्तम ठरेल. अक्रोडमध्ये फायबर, हेल्दी फॅट (निरोगी चरबी) जास्त असते. अक्रोडमधील फायबर पोटात जागा भरून टाकतं, त्यामुळे आपल्याला पटकन पोट भरल्यासारखं वाटतं. त्याचप्रमाणे अक्रोडमधील ओमेगा-३ फॅट्स मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले ठरतात.
अक्रोडांबद्दलचे संशोधन काय सांगते?
१. डायबिटीज, ऑबसेन्सिटी आणि मेटाबोलिजमबद्दल २०१७ मध्ये झालेल्या संशोधनानुसार अक्रोड खाल्ल्याने लोकांची भूक आणि खाण्याची ओढ कमी होते. कारण – अक्रोड खाल्ल्याने मेंदूतील भूक नियंत्रित करणारे भाग सक्रिय होतात.
२. २०२० चं रिव्ह्यू Nutrients जर्नलमध्ये सांगितल्यानुसार अक्रोडमध्ये ओमेगा – 3 आणि पॉलीफेनॉल नावाचे घटक असतात. यामुळे स्मरणशक्ती सुधारते, विचार करण्याची क्षमता वाढते आणि मूड सुधारतो.
३. अतिरिक्त संशोधन देखील सांगतात की, मध्यम प्रमाणात, अक्रोड खाल्ल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
म्हणून, “प्री-मील वॉलनट हॅक” म्हणजेच जेवणाआधी मूठभर अक्रोड खाणे तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकते.
अक्रोड पोषक तत्वांनी समृद्ध असण्याबरोबर कॅलरीजने देखील समृद्ध असते. अक्रोड जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजनाच्या संबंधित फायदे कमी होऊ शकतात. त्यामुळे तज्ज्ञ सामान्यतः मूठभर अक्रोड खाण्याची शिफारस करतात; सुमारे २८ ग्रॅम म्हणजेच ७ ते ८ अक्रोड.
अक्रोडची ॲलर्जी असलेल्या किंवा ज्यांना फॅट्सचे सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो त्यांनी ही ट्रिक फॉलो करू नये. जेवण आणि एखादी ॲक्टिव्हिटी करताना अक्रोड खाल्ल्यास तुमच्या शरीरासाठी उत्तम काम करू शकेल.
एकंदरीतच जेवणापूर्वी अक्रोड खाल्ल्याने भूक कमी लागण्यास, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास आणि मेंदूच्या आरोग्याला चालना देण्यासाठी ही एक सोपी, पुराव्यावर आधारित पद्धत आहे. अशाच पद्धतीने तुम्ही जर असे छोटे छोटे निर्णय घेतले तर तुमचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकणार आहेत.