Diabetes And Milk Consumption: मधुमेह हा असा आजार आहे, जो कधीही पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. नियमित योग्य आहाराचे सेवन, विश्रांती या गोष्टीच मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतात. मधुमेहींच्या आहाराबाबत त्यांच्या घरातील लोक खूप काटेकोर असतात. जास्त गोड पदार्थ आणि ज्या पदार्थांमध्ये नैसर्गिक साखर असते असे पदार्थ त्यांनी खाण्यावर बंधनं घातली जातात. चहा-कॉफीचे सेवन शक्यतो कमी केले जाते. अशा वेळी त्यांनी दूध तरी प्यावे की नाही? कॅल्शियमने समृद्ध असलेल्या दुधात चरबी आणि कार्बोहायड्रेट्सदेखील असतात. सामान्य लोकांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो; परंतु दूध मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले आहे की नाही याबाबत जनरल फिजिशियन डॉ. चैतन्य चल्ला यांनी माहिती दिली आहे. डॉक्टरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि मधुमेहाच्या रुग्णांचा आहार कसा असावा हे सांगितले आहे.

मधुमेहाचे रुग्ण दूध पिऊ शकतात का?

  • डॉ. चैतन्य चल्ला म्हणतात की, मधुमेहाच्या रुग्णांनी दुधाचे सेवन मर्यादित करावे. दूध स्वीकार्य आहे; परंतु ते मर्यादित प्रमाणात सेवन करावे. कारण- ते आम्लयुक्त असते.
  • मधुमेहींसाठी साखर ही विषासारखी आहे आणि त्यांनी ती टाळावे. डॉक्टरांचा सल्ला आहे की, मधुमेहींनी त्यांच्या आहारात फायबरचा अधिक प्रमाणात समाविष्ट करणे आवश्यक आहे. तुमच्या आहारात भाज्यांचा समावेश करा आणि मांसाचे प्रमाण कमी करा.
  • गोड पदार्थांचे सेवन मर्यादित करण्याचा प्रयत्न करा. आंबा आणि टरबूजसारखी फळे कमी खा, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो.
  • मधुमेहाच्या रुग्णांनी पॅक केलेले फळांचे रस पिणे टाळावे. त्यामध्ये फक्त साखर आणि पाणी असते.
  • जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले आणि रिफाइंड पदार्थ खाणेदेखील टाळावे. केवळ शुद्ध केलेले पदार्थच नाही, तर प्लास्टिकच्या भांड्यातील पदार्थ खाणेदेखील टाळावे.

मधुमेहात कोणते धान्य खावे?

डॉ. म्हणतात की, मधुमेहासाठी धान्य निवडताना विशेष काळजी घेतली पाहिजे. विशेषतः नाचणी टाळली पाहिजे. मधुमेहींसाठी बाजरी फायदेशीर आहे. तुम्ही क्विनो देखील खाऊ शकता. कारण- ते रक्तातील साखरेची पातळी कमी करते.