आययूसी चार्जेसच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओने ग्राहकांकडून ६ पैसे प्रति सेकंद दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर काही वेळातच व्होडाफोन-आयडियाने एक मोठी घोषणा केली आहे. अन्य मोबाईल नेटवर्कवर कॉलिंगचे दर आकारण्याचा कंपनीचा कोणताही विचार नसल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. जिओने लँडलाईन आणि जिओ व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्राहकांना आपल्या नॉर्मल रिचार्ज व्यतिरिक्त आणखी एक रिचार्ज करावं लागणार आहे.

ऑफनेट आणि ऑननेट कॉलिंगसाठी ग्राहकांवर कोणत्याही प्रकारचं ओझं टाकण्याचा कंपनीचा विचार नाही. तसंच व्होडाफोन-आयडिया आपल्या कंपनीच्या नेटवर्कवर केलेल कॉल आणि अन्य कंपन्यांच्या नेटवर्कवर केलेल्या कॉलमध्ये फरक करत नसल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. दोन वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांनी जिओ लाँच करून टेलिकॉम सेक्टरमध्ये हाहाकार माजवला होता. कॉलिंगसाठी पैसे देणं ही संकल्पना बंद करून मोफत कॉलिंगची संकल्पना त्यांनी सुरू केली. तसंच त्यावेळी त्यांनी आयुष्यभरासाठी मोफत कॉलिंग देणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु ९ ऑक्टोबर रोजी रिलायन्स जिओने एक पत्रक काढून मोफत कॉलिंग बंद करणार असल्याची घोषणा केली.

कंपनीच्या या निर्णयानंतर ग्राहकांनी सोशल मीडियावरून आपला रोष व्यक्त केला आहे. १० ऑक्टोबरपासून जिओचं नवं रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आपल्या मुख्य रिचार्जसोबतच १०, २०, ५० आणि १०० रूपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. यामध्ये ग्राहकांना अनुक्रमे १२४, २४९, ६५६ आणि १,३६२ मिनिटांचा टॉकटाईम मिळणार आहे. तसंच प्रत्येक रिचार्जमध्ये ग्राहकांना अतिरिक्त डेटादेण्यात येणार आहे. जिओच्या या निर्णयानंतर अनेक ग्राहकांनी आता जिओ सोडून दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सेवा घ्यावी लागणार असल्याचं म्हटलं आहे.