Morning Signs of Kidney Problems: आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. पण, त्यापैकी एक असा अवयव आहे जो दिसत नाही, जाणवत नाही; मात्र त्याच्याशिवाय शरीराचं अस्तित्वच उरणार नाही आणि तो अवयव म्हणजे मूत्रपिंड (Kidney)! शरीरातील घाण, विषारी द्रव्यं आणि टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं काम हे मूत्रपिंड करतं. पण जर ह्याच अवयवात बिघाड झाला, तर तुमच्या शरीराचा संपूर्ण समतोल बिघडू शकतो.

मूत्रपिंडाचं आरोग्य टिकविण्यासाठी योग्य आहार, पुरेसं पाणी आणि संतुलित जीवनशैली आवश्यक आहे. पण, आजच्या धावपळीच्या जगात हे सगळं शक्य होत नाही. त्यामुळेच मूत्रपिंडाच्या आजारांचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय आणि सर्वांत भीतीदायक म्हणजे हे आजार शरीरात गुपचूप वाढतात; पण लक्षणं दिसली की, बहुतेक वेळा उशीर झालेला असतो. नोएडाच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या नेफ्रॉलॉजी विभागाच्या वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. अनुजा पोरवाल यांच्या मते, “मूत्रपिंडाची समस्या सुरुवातीला अत्यंत सौम्य वाटते; पण दुर्लक्ष केल्यास ती जीवघेणी ठरू शकते.”

मग कोणती आहेत ते संकेत; जे सांगतात की, तुमचं मूत्रपिंड संकटात आहे? पाहू या एकेक करून…

१. सकाळी उठताच थकवा आणि अशक्तपणा

जर रोज सकाळी उठताच अंगात त्राण नसल्यासारखं वाटतं, अशक्तपणा जाणवतो, असं लक्षण असेल, तर ती सामान्य बाब नाही. मूत्रपिंडाकडून नीट काम होत नसल्यास शरीरात टॉक्सिन्स साचत जातात. त्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही आणि मग सातत्याने थकवा जाणवत राहतो.

२. लघवीत बदल जाणवणे

लघवीमध्ये फेस येणे हे किडनीच्या समस्येचे लक्षण असू शकते. लघवी करताना तीव्र किंवा वेदना किंवा कळ आल्यासारखं जाणवत असतील तर ते किडनीच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. लघवीचा रंग लाल किंवा फिकट गुलाबी दिसल्यास किडनी इन्फेक्शन, किडनी फेल्युअर आणि ब्लॅडर इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते.

३. पोटाला सूज

सकाळी उठल्यावर पोटाला सूज जाणवत असेल, तर ते फक्त गॅस किंवा अपचनाचे लक्षण नाही, तर ती मूत्रपिंड निकामी होत चाहूल असू शकते. मूत्रपिंड नीट कार्य करत नसल्यास शरीरात उत्सर्जनात्मक द्रवपदार्थ साठू लागतो. मग त्यामुळे सूज येऊन वेदना जाणवतात.

४. जास्त तहान लागणे

वारंवार पाणी प्यावेसे वाटणे, घसा कोरडा पडणे, शरीरात उष्णता वाढणे ही लक्षणे दाखवतात की, शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडले आहे. हा मूत्रपिंड नीट काम करीत नसल्याचा परिणाम असू शकतो.

५. त्वचेवर खाज, पुरळ किंवा चकत्त्या

मूत्रपिंड शरीरातील घाण आणि टॉक्सिन्स बाहेर काढते; पण ते नीट कार्य करीत नसल्यास हाच कचरा रक्तात मिसळतो आणि तो त्वचेवर दिसू लागतो. सकाळी सकाळी उठल्यावर त्वचेवर असामान्य खाज, पुरळ किंवा चकत्या दिसत असतील, तर सावध राहा हे मूत्रपिंडाच्या बिघाडाचं द्योतक असू शकतं.

डॉ. अनुजा सांगतात, “हे संकेत दिसल्यावर लगेच वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. वेळेत उपचार सुरू केल्यास मूत्रपिंडाचं नुकसान थांबवता येतं.”