Kidney Failure Warning Signs: आपल्या शरीरात २४ तास अखंडपणे काम करणारा अवयव म्हणजे मूत्रपिंड (किडनी). रक्त स्वच्छ करणं, अपायकारक पदार्थ बाहेर टाकणं, शरीरातील द्रवांचं संतुलन राखणं हे सगळं काम किडनी शांतपणे करीत असतात. पण धोक्याची बाब ही की, जेव्हा किडन्या हळूहळू निकामी होऊ लागतात तेव्हा त्या लगेच सिग्नल देत नाहीत. लक्षणं इतकी सूक्ष्म असतात की, लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि एकदा आजार बळावला, की मग मोठं संकट टाळता येणं कठीण होतं. जगभरातील सुमारे १०% लोकसंख्या क्रॉनिक किडनी डिसीजने त्रस्त असल्याचा अहवाल सांगतो. त्यामुळे ‘नेफ्रोसिस’ म्हणजे किडनीचं प्रथिनं गाळू लागणं, शरीर सुजणं अशा स्थितीची वेळ येण्याआधी ही ७ सुरुवातीची लक्षणं ओळखणं गरजेचं आहे.

किडनी निकामी होण्याची ‘ही’ ७ लक्षणे वेळीच ओळखा

१. अचानक सुजलेला चेहरा, पाय किंवा टाचा

कारण- नसताना शरीरावर सूज आल्यास सावध व्हा! किडन्या नीट काम करीत नसतील, तर प्रथिनं लघवीतून बाहेर टाकली जातात. रक्तात प्रथिनं कमी झाली, की द्रव शरीरात साचतो आणि चेहरा, पाय, टाचा फुगल्यासारखे दिसतात.

२. फेसाळलेली लघवी

दरवेळी लघवी फेसाळलेली दिसत असेल, तर ते केवळ पाण्याची कमतरता नाही. शरीरातला प्रथिनांच्या गळतीमुळे (प्रोटीन्युरिया) लघवीत फेस दिसतो. हे किडनीच्या फिल्टर सिस्टीमच्या बिघाडाचं सुरुवातीचं चिन्ह असू शकतं.

३. वजन झपाट्याने वाढणं

जर डाएट बदललं नसेल, व्यायामही पूर्वीसारखाच असेल तरीही वजन अचानक वाढत असेल, तर ही द्रव साचण्याची खूण आहे. असं वजन जड, थकवणारं असतं आणि त्यासोबत सूजही जाणवते.

४. सततचा थकवा व अशक्तपणा

किडनीतून प्रथिनं नष्ट झाली, की रक्तातली ताकद कमी होते. त्यासोबतच अपायकारक पदार्थ साचल्याने शरीराला खोल थकवा जाणवतो. झोपून, विश्रांती घेऊनही न जाणारा हा थकवा किडनी धोक्यात असल्याची खूण आहे.

५. खाण्याची इच्छा कमी होणं व मळमळ

किडन्या नीट फिल्टरेशन करू शकत नाहीत, तेव्हा रक्तात विषारी द्रव्यं साचतात. त्यामुळे भूक कमी होते, जेवलं की मळमळ, कधी कधी उलट्याही होतात. हे नेफ्रोसिसच्या सुरुवातीच्या टप्प्याचे संकेत असतात.

६. रात्री वारंवार लघवी लागणं

जास्त पाणी प्यायल्यामुळे नव्हे, तर किडनी नीट काम न केल्यामुळे रात्री वारंवार लघवीला जावं लागतं. नॉक्टुरिया नावाचा हा त्रास झोप बिघडवतो आणि किडनीवर ताण वाढल्याचं स्पष्ट दाखवतो.

७. संसर्गांचा धोका वाढणं

किडन्या फक्त रक्त शुद्ध करीत नाही तर रोगप्रतिकार शक्तीलाही आधार देतात. नेफ्रोसिसमध्ये प्रथिनं कमी झाल्याने शरीर कमकुवत होतं. त्यामुळे वारंवार युरिनरी इन्फेक्शन किंवा सर्दी-खोकला होऊ शकतो आणि ते बरे होण्यासही वेळ लागतो.

किडनीला वाचवण्यासाठी आहारात बदल गरजेचा!

डॉक्टर सांगतात की, जास्त मीठ, पॅकबंद किंवा तेलकट पदार्थ किडनीला हानी पोहोचवतात; तर ताजी फळं, भाज्या, पुरेशा प्रमाणात पाणी आणि मर्यादित प्रथिनं यांमुळे किडनीचं रक्षण होतं.

त्यामुळे उशीर नको! या ७ लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं, तर मोठं संकट टाळता येऊ शकतं.