Kitchen Sink Cleaning: स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरला जाणारा भाग म्हणजे सिंक, दिवसातून कमीत कमी ३-४ वेळा तरी लोक भांडी घासण्यासाठी सिंकचा वापर करतात. शिवाय सिंकमधील बाजारातून आणलेल्या भाज्यादेखील धुतल्या जातात. सिंकच्या या सततच्या वापराने कालांतराने सिंकमध्ये चिकट, काळपट डाग पडतात. खरकट्या भांड्यांमुळे सिंकमध्ये तेलकटपणा आणि दुर्गंधदेखील मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. जर तुम्हाला तुमच्या सिंकमधील घाणीचा त्रास होत असेल, तर तुम्ही काही खास टिप्स वापरून ते स्वच्छ करू शकता; यामुळे तुमचे सिंक नवीनसारखेच चांगले दिसेल.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
सिंकमधील चिकटपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर खूप फायदेशीर आहे. हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. सर्वप्रथम सिंकवर बेकिंग सोडा टाका आणि स्क्रबरने हलक्या हाताने घासून घ्या. नंतर काही वेळाने फेस तयार होईल. सुमारे १०-१५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर सिंक साबण आणि स्वच्छ पाण्याने सहज धुवून घ्या.
लिंबू आणि मीठ वापरा
तुम्ही तुमचे सिंक लिंबू आणि मिठानेदेखील स्वच्छ करू शकता. लिंबू
कापून त्यावर मीठ शिंपडा आणि ते सिंकच्या पृष्ठभागावर घासून घ्या. थोडा वेळ तसेच राहू द्या. नंतर डिटर्जंट आणि स्क्रबर वापरून ते स्वच्छ करा, यामुळे तुमच्या सिंकची चमक परत येईल.
डिशवॉशिंग डिटर्जंट आणि गरम पाणी वापरा
कधीकधी सिंकवर तेल साचते, ज्यामुळे ते स्वच्छ करणे कठीण होते. अशा परिस्थितीत तुम्ही ते स्वच्छ करण्यासाठी डिशवॉशिंग डिटर्जंट आणि गरम पाणी वापरू शकता. हे करण्यासाठी प्रथम पाणी गरम करा आणि त्यामध्ये डिशवॉशिंग डिटर्जंट घाला, ते पूर्णपणे मिसळल्यानंतर त्याने सिंक स्वच्छ करा.
बोरेक्स पावडर वापरा
तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील सिंक स्वच्छ करण्यासाठी बोरेक्स पावडरदेखील वापरू शकता. हट्टी घाण काढून टाकण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे. हे करण्यासाठी एक वाटी पाण्यात २ चमचे बोरेक्स पावडर मिसळून द्रावण तयार करा. स्क्रबरने सिंक घासून घ्या. यामुळे तेथे असलेले कोणतेही बॅक्टेरिया सहजपणे काढून टाकले जातील.
कोमट पाणी, लिंबू आणि डिटर्जंट पावडर वापरा
तुमचे सिंक स्वच्छ करण्यासाठी प्रथम एका वाटीत कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडासा लिंबाचा रस आणि डिटर्जंट पावडर घाला. हे द्रावण सिंकमध्ये घाला आणि थोडा वेळ तसेच ठेऊन नंतर सिंकच्या पृष्ठभागावर स्क्रबरने चांगले घासून घ्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे सिंक स्वच्छ होईल.