Lack Of Sleep Can Be Reason For Hairfall: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत काम, ताणतणाव आणि सोशल मीडियामुळे लोक अनेकदा झोपेकडे दुर्लक्ष करतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरणे किंवा कामाचा ताण या सर्व गोष्टींचा आपल्या झोपेवर नकारात्मक आणि गंभीर परिणाम होत असतात. बरेच जण असा विचार करतात की, झोपेचा अभाव डोक्यात थोडासा जडपणा किंवा थकवा निर्माण करेल. पण तुम्हाला माहीत आहे का की याचा थेट परिणाम तुमच्या केसांवरही होतो? जर तुम्ही वेळेवर झोपला नाहीत किंवा पुरेशी झोप घेतली नाही, तर तुमचे केस हळूहळू कमकुवत होतात आणि गळू लागतात. चांगली झोप तुमच्या शरीराचीच नव्हे तर केसांनाही निरोगी ठेवण्यास आणि मजबूत करण्यास मदत करते. केसगळतीला झोपेचा अभाव हे कारण देखील असू शकते असं मत तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
केसगळती झोपेच्या अभावामुळे
आपले केस आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यांना पोषण आणि विश्रांतीची आवश्यकता देखील असते. जेव्हा आपल्याला रात्रीची गाढ आणि पूर्ण झोप मिळते तेव्हा आपले शरीर दुरूस्तीच्या स्थितीत जाते. या काळात केसांची मुळे मजबूत होतात आणि केसांची वाढ सुधारते. असं असतानाही जर आपल्याला पुरेशी झोप मिळाली नाही, तर ही दुरूस्ती प्रक्रिया अपूर्ण राहते. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस हळूहळू तुटू लागतात आणि गळू लागतात.
झोपेच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या
झोपेचा अभाव आपल्या शरीरात तणावास कारणीभूत हार्मोन कॉर्टिसोल वाढवतो. हे हार्मोन आपल्या शरीराला ताण देात. जेव्हा ताण वाढतो तेव्हा त्याचा थेट केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त कॉर्टिसोलमुळे केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण कमी होते, त्यामुळे त्यांना पोषण मिळत नाही आणि केस गळतात. झोपेचा अभाव केसांना कमकुवत करत नाही तर तुमच्या टाळूला देखील नुकसान पोहोचवतो. झोपेचा अभाव कधीकधी टाळू खूप कोरडे किंवा खूप तेलकट बनवू शकतो, त्यामुळे कोंडा, खाज सुटणे आणि जळजळ यासारख्या समस्या उद्भवतात. टाळूमध्ये संतुलनाचा अभाव केसांची मुळे कमकुवत करतो आणि केस गळण्यास गती देतो.
केसगळती कमी करण्यासाठी किती तासांची झोप आवश्यक?
तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान ७ ते ८ तास झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही झोपण्याची वेळ निश्चित केली आणि दिनचर्या ठरवली, तर तुमची झोप आणि केसांचे आरोग्य दोन्ही सुधारेल. पुरेशी झोप घेतल्याने केसांची वाढ तर सुधारतेच, पण तुमचा चेहरा ताजा आणि तुमचे शरीरही ऊर्जावान राहते.
केसगळती कमी करण्यासाठी काय उपाय करू शकता?
- झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी तुमचा मोबाईल फोन किंवा लॅपटॉपपासून दूर रहा
- झोपेत व्यत्यय येऊ नये म्हणून हलके जेवण करा
- ताण कमी करण्यासाठी ध्यान, योग याचा सराव करा.
- दररोज ठरवलेल्या वेळी झोपायचा प्रयत्न करा आणि उठण्याचाही प्रयत्न करा.
- झोपेची समस्या कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
