डोळा हा माणसाच्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. डोळे फडफडणे हे खूप सामान्य लक्षण आहे. डोळा हा काही सेकंदासाठी किंवा १ ते २ मिनिटांपर्यंत फडफडत असतो. डोळा फडफडणे यामागे शुभ, अशुभ अशी कारणे जोडली जातात. स्त्री आणि पुरुष यांचा उजवा आणि डावा डोळा फडफडणे यामागेही वेगवेगळे अर्थ असतात. सामुद्रिक शास्त्रांमध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
डोळा फडफडतोय असं कोणी म्हटलं तरी आपल्याला ते शुभ की अशुभ असा प्रश्न पडतो. वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार डोळ्याची फडफड होणे हे शुभ आणि अशुभ अशा दोन्हीही घटनेचे पूर्वसंकेत देतात. भविष्यात होणाऱ्या एखाद्या घटनेची पूर्वसूचना आपल्याला याद्वारे मिळते, असेही म्हटले जाते.
पुरुषाचा डोळा फडफडत असेल तर…
शास्त्रानुसार असे म्हटलं जातं की, जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडत असेल किंवा त्या डोळ्याची पापणी लवत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. अशा पुरुषांना भविष्यात मोठा आर्थिक फायदा होतो. त्यांची अडकलेले अनेक कामे मार्गी लागतात. विशेष म्हणजे त्यांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते. तसेच त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांना आर्थिक नफा होतो.
तसेच जर पुरुषांचा डावा डोळा फडफडत असेल तर त्याला भविष्यात मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. तसेच त्यांच्या सुखाला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. त्यासोबत त्या पुरुषाचे शत्रुत्व वाढण्याची शक्यता असते.
स्त्रियांचा डोळा फडफडत असेल तर…
पण स्त्रियांच्याबाबत ही गोष्ट नेमकी उलट असते. जर महिलांचा उजवा डोळा किंवा पापणी फडफडत असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. याद्वारे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या एखाद्या अशुभ घटनेची किंवा संकटाची चाहूल मिळते. तसेच त्या महिलेच्या बाबतील काही तरी अप्रिय घटना घडेल असे संकेतही याद्वारे मिळतात.
मात्र जर एखाद्या महिलेचा डावा डोळा किंवा डाव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर तिला लवकरच मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. त्यांची अडकलेली अनेक कामे मार्गी लागतात. विशेष म्हणजे त्यांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते, असे बोललं जाते.