Liver Disease Symptoms on Hands: आपण दररोज आपल्या चेहऱ्याकडे पाहतो, केसांची, त्वचेची काळजी घेतो… पण कधी आपल्या हातांकडे नीट लक्ष दिलंय का? कारण तुमचे हात सांगू शकतात तुमचं यकृत (लिव्हर) व्यवस्थित काम करतंय की नाही. होय, यकृत खराब होण्याची पहिली लक्षणं शरीराच्या आत नाही तर हातांवरच दिसू लागतात.

यकृत हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो, पचन नियंत्रित करतो आणि हार्मोनचं संतुलन राखतो, पण जेव्हा यकृतावर ताण येतो, तेव्हा फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस किंवा सिरॉसिससारख्या आजारांमुळे तेव्हा शरीर आपल्याला आधीच इशारे देऊ लागतं. फक्त आपणच ते संकेत वेळीच ओळखले पाहिजेत.

संशोधन काय सांगतं?

यकृत विकारांवर झालेल्या Journal of Clinical and Experimental Hepatology या प्रसिद्ध वैद्यकीय जर्नलमधील अभ्यासानुसार हात आणि नखांवर दिसणारे काही सूक्ष्म बदल हे यकृताच्या आजारांचे सुरुवातीचे संकेत असतात. या संशोधनात असे आढळले की, पाल्मर एरिथेमा (तळहात लाल होणे), नखांचे फुगणे (clubbing) आणि त्वचेवर दिसणारे सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे हे सर्व क्रॉनिक लिव्हर डिसीजच्या प्रगतीशी थेट संबंधित आहेत.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा यकृत नीट काम करणे थांबवतो तेव्हा हार्मोन्सचं संतुलन बिघडतं, रक्तप्रवाहात अडथळे येतात आणि विषारी घटक शरीरात साचू लागतात; परिणामी हे बदल हातांवर सर्वात आधी दिसू लागतात.

हातांवरील ‘ही’ ६ लक्षणं सांगतात यकृत धोक्यात

१. तळहात लाल होणे (Palmar Erythema)

हातांच्या तळव्यांवर, विशेषतः अंगठा आणि करंगळीच्या खाली, जर लालसरपणा दिसत असेल तर हे यकृतामधील हार्मोनल बदलांचे संकेत असू शकतात. रक्तवाहिन्यांचा प्रसार (vasodilation) वाढल्यामुळे ही स्थिती होते. दिसायला साधी वाटणारी ही लाली यकृत डिसफंक्शनचं प्रारंभीचं चिन्ह असू शकतं.

२. बोटं वाकडी होणं (Dupuytren’s Contracture)

हाताच्या तळव्याखाली त्वचेच्या आत जाडसर गाठी, कडक रेषा तयार होत असतील आणि बोटं सरळ होत नसतील तर ते क्रॉनिक यकृत डिसीजचं एक लक्षण असू शकतं. हा बदल हळूहळू होतो आणि हातांची हालचाल मर्यादित करतो. मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हे जास्त दिसतं.

३. पांढरे नख (Terry’s Nails)

नखांचा रंग जर पांढरट आणि फिकट झाला असेल आणि फक्त टोकाजवळ थोडा गुलाबी रंग दिसत असेल तर हा यकृत सिरॉसिसचा गंभीर संकेत आहे. अनेकदा लोक हे सौंदर्यदोष समजतात, पण प्रत्यक्षात हे रक्तप्रवाह आणि प्रोटीन घटण्याचं लक्षण असू शकतं.

४. नखांखालील सूज (Nail Clubbing)

बोटांच्या टोकावर नखे गोल, फुगलेली किंवा वाकडी दिसू लागली तर सावध व्हा. हे केवळ फुप्फुसं किंवा हृदयाच्या आजारांशीच नव्हे, तर लिव्हर सिरॉसिसशीही जोडलेलं असतं. याचा अर्थ शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली असून यकृत नीट कार्य करत नाही.

५. कंप सुटणं (Asterixis – Flapping Tremor)

हात थरथर कापणे किंवा अचानक झटका येणं हे गंभीर यकृत रोगात दिसणारं लक्षण आहे. याला हेपॅटिक एन्सेफालोपथी म्हटलं जातं, ज्यात यकृतामुळे मेंदूवर परिणाम होतो. हा टप्पा म्हणजे यकृत जवळजवळ निकामी होण्याच्या वाटेवर आहे.

६. हात-पाय खाजणे (Pruritus)

कधी कधी तळहात आणि तळपाय सतत खाजतात, पण त्वचेवर कोणतेही पुरळ दिसत नाहीत; तर हा चोलेस्टॅसिस नावाच्या अवस्थेचा इशारा आहे. यात पित्त (bile) प्रवाह मंदावतो किंवा थांबतो, जे यकृत डिसीजचं स्पष्ट चिन्ह आहे.

इतर शरीरातील संकेतदेखील ओळखा

  • यकृताची समस्या केवळ हातांवरच नाही तर संपूर्ण शरीरात उमटते
  • डोळ्यांत आणि त्वचेवर पिवळेपणा (Jaundice)
  • थोड्या धक्क्याने फुल्या किंवा रक्तस्राव (Easy Bruising)
  • सततचा थकवा आणि कमजोरी
  • पोट फुगणं (Ascites)
  • त्वचेखाली स्पायडरसारख्या रक्तवाहिन्या (Spider Angiomas)

कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

जर तुमच्या हातांवर वरील कोणतेही बदल सातत्याने दिसत असतील; तळव्यावर लालसरपणा, नखांचा रंग बदलणे किंवा खाज, तर त्वरित डॉक्टरांकडे जा. वेळीच ओळखलेलं यकृत डिसीज बरे होऊ शकते, पण दुर्लक्ष केल्यास ते सिरॉसिस किंवा लिव्हर फेल्युअरमध्ये बदलू शकतं.

शेवटी एकच लक्षात ठेवा, हात केवळ कामासाठी नाहीत, ते तुमच्या आरोग्याचा आरसा आहेत. पुढच्या वेळी आरशात चेहऱ्याकडे बघाल तेव्हा हातांकडेही लक्ष द्या…